एखादा फलंदाज बाद होण्याचे विविध प्रकार क्रिकेटमध्ये आहेत. कॅच उडून, बोल्ड होऊन, रन आऊट होऊन फलंदाज तंबूमध्ये परतल्याचे आपण नेहमी पाहतो. आणखी एक प्रकार म्हणजे हिट विकेट. फलंदाज पुढे जाऊन चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात असतो आणि परत फिरताना त्याच्या बॅटचा धक्का स्टम्पला लागला, तर तो आऊट असतो. यालाच स्वयंचित किंवा हिट विकेट असे म्हणतात. लाडकी बहीण योजनेची कागदपत्रे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असताना अशा काही हिट विकेट पडल्याचे दिसून येत आहे.
काळ कोणताही असला तरी शासकीय काम करून देण्यासाठी अनेक लोक स्वतःहून पुढे येत असतात. तुम्हास असे वाटेल की, हे म्हणजेच सेवाभावी वृत्तीने काम करणारे कार्यकर्ते असतील. तसे अजिबात नसते. शासकीय योजनेसाठी अर्ज करणे, तो ऑनलाईन, ऑफलाईन दाखल करणे आणि शक्य झाल्यास ते काम करून देणे यासाठी जे लोक पुढे येतात, ते सहसा दलाल असतात. संपूर्ण कामाचे कंत्राट घेणारे हे लोक त्या कामाचे भरपूर पैसे घेतात आणि काम करून देतात. लाडकी बहीण योजनेसाठी काम करताना बर्याच भावांनी पुढाकार घेतला आणि ते बहिणींसाठी अविरत कार्यरत आहेत, त्यांचा अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. मुख्यमंत्री आणि इतरांनी या अर्ज प्रक्रियेसाठी कोणालाही पैसे देऊ नका, असे कितीही आवाहन केलेले असले तरी ते कुणी ऐकेल, अशी शक्यता नसतेच. या प्रकारामध्ये अनेक हिट विकेट पडत असतात.
उदगीर तालुक्यातील एका बहिणीची टीसी काढून देण्याचे काम एका भावाने घेतले आणि ते करण्यासाठी तो बहिणीने जिथून शाळा सोडली, त्या शाळेत गेला. सहसा कुणाचे काम रीतीप्रमाणे व मोफत करायचे नाही, अशी शपथ घेतलेले अनेक कर्मचारी असतात. शाळेमधील कारकुनाने सदरहू भावाला टीसी काढून देण्याचे चारशे रुपये मागितले. आज्ञाधारक भाऊरायाने घरी येऊन आपल्या लाडक्या बहिणीला सदरहू कारकून चारशे रुपये मागत असल्याचे सांगितले. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचा वसा घेतलेल्या बहिणीने तत्काळ याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. या खात्यातील लोकांनी सापळा रचून चारशे रुपये घेताना त्या कारकुनाला रंगेहाथ पकडले आणि त्याची रवानगी पोलिस कोठडीत झाली. याला म्हणतात स्टम्पला स्वतःच बॅट लावून आऊट होणे. चारशे रुपयांचा मोह नोकरी जाण्यासाठी आणि पोलिस कोठडीत रवानगी होण्यासाठी पुरेसा असतो. हा धोका किमान अन्य कर्मचार्यांच्या लक्षात येईल, अशी अपेक्षा ठेवूयात. काम घेऊन कोणीही आले की, त्याच्याकडे अतिरिक्त पैसे मागायचे या सरकारी कर्मचार्यांना लागलेल्या सवयीमुळे लाडकी बहीण योजनेमध्ये कागदपत्रे देताना राज्यभरात असंख्य विकेट पडतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. अर्ज करणारी बहीण ही मुख्यमंत्र्यांची लाडकी आहे, आपली नव्हे, हे जेव्हा सरकारी कर्मचार्यांचे लक्षात येईल तो दिवस म्हणजे सुदिनच म्हणावा लागेल. बहीण मागेल ती कागदपत्रे द्या आणि आपली नोकरी आणि संसार सुखाचा करून घ्या, एवढ्याच या भावांना शुभेच्छा. खरे तर सरकारने अनेक लोकप्रिय योजना जाहीर केल्यानंतर सर्वत्र महिलांची आणि त्यांच्या भावांची धावपळ सुरू आहे. महिन्याला 1500 रुपये मिळतील, त्यामुळे त्याचा कोण फायदा घेणार नाही. त्यातही सरकारकडून मदत मिळत असल्याने आनंदात आणखीच भर पडली आहे, हे विशेष!