Terrorism Doctor | दहशतवादाचे ‘डॉक्टर’

पाकिस्तानमध्ये लोकशाही केवळ देखाव्यापुरती आहे. तिथे नुकतीच 27 वी घटनादुरुस्ती करून जवळपास लष्करशाहीच आणण्यात आली.
Pudhari Editorial Article
दहशतवादाचे ‘डॉक्टर’ (Pudhari File Photo)
Published on
Updated on

पाकिस्तानमध्ये लोकशाही केवळ देखाव्यापुरती आहे. तिथे नुकतीच 27 वी घटनादुरुस्ती करून जवळपास लष्करशाहीच आणण्यात आली. लष्कराचे नियंत्रण सरकारकडे असेल, राष्ट्राध्यक्ष तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख असतील, अशी तरतूद घटनेच्या 243 व्या कलमात होती. परंतु घटनादुरुस्ती केली गेली आणि या तरतुदी बाद करत, ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ हे नवीन पद असीम मुनीर यांच्यासाठी निर्माण करण्यात आले. अण्वस्त्र यंत्रणेची सूत्रेदेखील सरकारच्या किंवा संसदेच्या हातात होती, ती काढून मुनीर यांच्या हातात देण्यात आली. न्यायालयाचे अधिकारदेखील कमी केले गेले. मुनीर कट्टर भारतद्वेषी. यापूर्वी भारतावर लष्करी वा अण्वस्त्र हल्ले करण्याची धमकी त्यांनी दिलेली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे मुनीर यांचाच मेंदू होता, हे उघड झाले. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरदेखील त्यांच्या भारतविरोधी कुरापती चालूच आहेत.

दिल्ली स्फोटावरून ते स्पष्ट झाले. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ घडवून आणलेल्या भीषण स्फोटापूर्वी उच्चशिक्षितांचे दहशतवादी मॉड्यूल उघड झाले होते. या स्फोटाचा कट, त्यातील वीसहून अधिक डॉक्टरांचा उघड झालेला सहभाग या सार्‍या बाबी चक्रावून टाकणार्‍या आहेतच; त्या सावध करणार्‍याही आहेत. या दहशतवाद्यांना स्थानिकांचा मिळणारा आश्रय, मदत आणि रसद याही तितक्याच गंभीर बाबी. हरियाणातील फरिदाबादमधील अल-फलाह विद्यापीठासारख्या सुरक्षित ठिकाणाहून कटाची सूत्रे हलवली जात होती. फरिदाबाद येथून 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी अटक केलेल्या डॉ. मुझ्झमिल गनी याच्या घरातून जम्मू-काश्मीर पोलिसांनी हा साठा जप्त केला होता. स्फोटाची मुळे दूरवर पोहोचली असून, स्फोटातील कारचालक डॉ. उमर नबी याच्या परिचयाच्या अल-फलाह विद्यापीठांमधील दोन डॉक्टर तसेच पठाणकोट येथून एका डॉक्टरसह चारजणांना ताब्यात घेण्यात आले.

Pudhari Editorial Article
Pudhari Editorial : गुंतवणुकीला चालना

तपास यंत्रणांनी पंजाबच्या पठाणकोट येथूनही एका 45 वर्षीय डॉक्टरला हरियाणातील नूह जिल्ह्यातून दिनेश ऊर्फ डब्बू याला परवान्याशिवाय खते विकल्याबद्दल ताब्यात घेतले आहे. याच नूह येथे काही वर्षांपूर्वी दंगल झाली होती. पठाणकोट येथील अटकेत असलेला डॉक्टर हरियाणातील अल-फलाह विद्यापीठात पूर्वी काम करत होता. अल-फलाह विद्यापीठ आजवर अनेक कारणांनी चर्चेत आले आहे. जावेद सिद्दीकी विद्यापीठाचे संस्थापक असून, करोडो रुपयांचा गैरव्यवहार केल्याबद्दल ते तीन वर्षे जेलयात्रा करून आले आहेत. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने या विद्यापीठातील चार डॉक्टरांची वैद्यकीय नोंदणी रद्द केली आहे. यापैकी डॉ. रईस अहमद भट याला ताब्यात घेतले आहे. तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, हा आत्मघातकी स्फोट घडवणार्‍या डॉ. नबीबरोबर तो संपर्कात होता. जैश-ए-मोहम्मद आणि अनसार गझवात-उल-हिंद या दोन संघटनांनी हे व्हाईट कॉलर मॉड्यूल तयार केले होते. नूहमधील दोन डॉक्टर्स, त्याचप्रमाणे खत व बी-बियाण्यांच्या विक्रेत्यांनाही ताब्यात घेऊन त्यांची उलटतपासणी घेतली जात आहे. विद्यापीठाच्या काही आजी-माजी विद्यार्थ्यांचीही चौकशी सुरू आहे. गरिबी आणि बेकारी या समस्यांमुळे जम्मू-काश्मीरमधील तरुण दहशतवादाकडे वळले, असा सिद्धांत मांडला जात होता. परंतु हा सिद्धांत अनेकवेळा खोटा ठरला आहे.

1989 साली व्ही. पी. सिंग यांच्या मंत्रिमंडळात मुफ्ती मोहम्मद सईद केंद्रीय गृहमंत्री या नात्याने काम पाहात होते. 2 डिसेंबर 1989 रोजी व्ही. पी. सिंग सरकारने कार्यभार स्वीकारल्यानंतर सातच दिवसांनी मुफ्ती यांची कन्या रुबिया हिचे ‘जेकेएलएफ’ संघटनेच्या हस्तकांनी अपहरण केले. डॉ. रुबिया ही श्रीनगरमधील रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर होती. 9 डिसेंबर 1989 रोजी ती घरी परतत असताना मिनी बस अडवून तिला जबरदस्तीने खाली उतरवले. रुबियाच्या सुटकेच्या मोबदल्यात काश्मीरमधील तुरुंगात असलेल्या ‘जेकेएलएफ’च्या बंडखोर नेत्यांच्या सुटकेची मागणी अपहरणकर्त्यांनी केली. केंद्र सरकारने या अतिरेकी संघटनेच्या मागण्या मान्य केल्या. बीबीसीच्या एका वार्ताहराचे तसेच आणखी काही नेत्यांचे व अधिकार्‍यांचेही अपहरण करण्यात आले.

Pudhari Editorial Article
Pudhari Editorial : चिमणी भुर्रर्र उडाली!

‘जेकेएलएफ’प्रमाणेच हिजबुल मुजाहिदीन व लष्कर-ए-तोयबासारख्या पाकिस्तान धार्जिण्या संघटनाही फोफावल्या. जम्मू-काश्मीरमध्ये ‘आझाद काश्मीर’वादी संघटनांनी चालवलेल्या हैदोसाला पाकिस्तान पुरस्कृत जिहादी संघटनांच्या घुसखोरीमुळे धार्मिक विद्वेषाचा रंग चढला. लक्षावधी काश्मिरी पंडित कुटुंबांना काश्मीर सोडावे लागले. दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित उच्च पदवीधर आहेत. बहुतेकजण सधन कुटुंबांतील असून, कट्टरतावादाचे संस्कार झाल्यामुळे ते देशद्रोहाच्या पातळीपर्यंत उतरले. अल-फलाह विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच 2900 किलो स्फोटके आणि ज्वलनशील पदार्थ सापडले. त्यात अमोनियम नायट्रेट तसेच एनपीके खतेही मिळाली. काश्मीर, उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या मेवात येथील अनेक वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी तसेच प्राध्यापक ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी डॉ. शाहीन शाहिद ही फॉर्माकॉलॉजीतील एम.डी. असून, ती जैश ए मोहम्मदच्या महिला शाखेची उभारणी करत होती.

या विद्यापीठाचा हेतूच सुरक्षित वातावरणात कट्टरतावाद्यांची संघटना बांधून कट कारस्थाने रचणे, हा होता असे दिसते. जम्मू-काश्मीरमधील पंपोरातील रहिवासी अमीर रशीद अलीने डॉ. उमर नबीच्या साथीने हा कट रचला असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. दिल्लीत स्फोट घडवण्यासाठी वर्षभरापासून आत्मघातकी हल्लेखोराचा शोध सुरू होता. याच प्रकरणात एटीएसने मुंब्रा येथून एका उर्दू शाळेतील शिक्षकाला ताब्यात घेतले. पुण्यातील सॉप्टवेअर अभियंत्याला ‘अल-कायदा’शी संबंधाच्या आरोपाखाली अटक झाली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून एटीएसने आणखी काहीजणांची झडती घेतली. एकीकडे पाकिस्तान भारतात अतिरेकी पाठवत असतानाच देशांतर्गत पातळीवरही जिहादी प्रवृत्तींना खतपाणी घातले जात आहे, ही अधिक गंभीर बाब. या जिहादी दहशतवादाची पाळेमुळे थेट विद्यापीठांपर्यंत पोहोचली आहेत. याचाच अर्थ धोका आणखी वाढला. त्यामुळे यापुढे तपास यंत्रणांना डोळ्यांत तेल घालून समन्वयाने काम करावे लागेल. बुद्धी आणि तंत्रज्ञानाच्या बळावर फोफावला जाणारा दहशतवाद देशाला अधिक घातक ठरू शकतो. तरुण-तरुणींची माथी भडकावून दहशतवादाचे सुरुंग पेरणार्‍यांची नांगी ठेचलीच पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news