

What happened to Sharad Pawar ideology?
सुहास जगताप
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात २ जुलै २०२३ मध्ये फूट पडली, अजित पवार यांनी ४० आमदारांचा एक गट घेऊन सत्ताधारी महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला,उपमुख्यमंत्रीपद मिळविले, अजित पवारांनी भाजपला पाठिंबा देण्याचा हट्ट धरल्यामुळेच खरे तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजप बरोबर जायचे नाही असा निर्णय जेष्ठ नेते,खासदार शरद पवारांची घेतल्याने मग अजित पवार बाजूला गेले ,त्यानंतर लोकसभा-विधानसभा दोन्ही गट इर्षेने लढले,एकमेकांविरूध्द भयंकर टीका केली,अजित पवार यांनी नवीन पक्षाला स्थिरस्थावर करण्याची आणि निवडणुकीची अपरिर्हता म्हणून जेष्ठ नेते,खासदार शरद पवार यांच्यावर ही टीका केली,तसेच प्रत्युत्तर त्यांना शरद पवार यांच्याकडून मिळाले. कार्यकर्ते दुभंगले ते इतके दुभंगले की अगदी घरा घरा पर्यंत राष्ट्रवादीतील ही फूट जाऊन पोहचली.
आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासारखे काय घडले आहे की ते एकत्र येत आहेत. जेष्ठ नेते,खासदार शरद पवार,खासदार सुप्रिया सुळे यांच्या भाजप विरोधी विचारधारेचे काय झाले, असा काय फरक पडलेला आहे. अजित पवार अजूनही भाजपबरोबर मंत्रिमंडळात आहेत. उपमुख्यमंत्री आहेत.महापालिका निवडणुका सुरू असतानाही ते भाजप बरोबरच राज्य मंत्रीमंडळात असणार आहेत आणि त्यानंतर ही ते तेथेच राहणार आहेत. राजकीय गैरसोयीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आता महापालिका निवडणुकांमध्ये भाजप बरोबर सूत जमत नाहीये त्यामुळे महापालिका ते फक्त वेगळी लढवणार आहेत,निवडुण आल्यावर महापालिकेतरी आपण भाजप बरोबर जाणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजून तरी जाहीर केलेले नाही तरीही अजित पवार यांनी जेष्ठ नेते,खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला बरोबर घेण्याचे सुतोवाच करताच खासदार सुप्रिया सुळे,आमदार रोहीत पवार यांच्याकडून या आघाडीसाठी एवडी चढाओढ का लागली आहे.जेष्ठ नेते, खासदार शरद पवार यांच्या भाजप विरोधी विचारधारेचे काय झाले की 'शरद पवार यांनी आता आम्हाला काम करू द्यावे,आणि सल्लागाराच्या भूमिकेत राहावे' अशी जी भूमिका पक्ष फुटी नंतर अजित पवार मांडत होते,ती भूमिका आता सुप्रिया सुळे,रोहीत पवार यांना ही पटलेली आहे,असे म्हणायचे का?
सोनिया गांधींच्या विदेशी पणाचा मुद्दा निर्माण करून शरद पवारांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली होती त्यानंतर लगेच त्यांनी महाराष्ट्रत सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेसशी जुळवून घेतले,त्यानंतर केंद्रातही ते कॉग्रेस आघाडीच्या सत्तेत सामिल झाले,सोनिया गांधीचा विदेशीपणाचा मुद्दा त्यानंतर बासनात गुंडाळत शरद पवार यांनी कॉग्रेस बरोबर सत्तेत भागीदारी मिळविली तसाच प्रयोग तर आता होत नाही ना..! अजित पवार 'भाजप बरोबर जावे' असे म्हणत असताना विचारधारेचा मुद्दा करून त्यांच्यापासून फारकत घेतली- शरद पवार यांनी फुटीचे कारण मुलभूत विचारांमधील फरक असल्याचे त्यावेळी सांगितले होते,त्यानंतर शरद पवार-सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या शिवाय सत्ता मिळते का याचा प्रयोग करून पाहीला त्यात यश न आल्यानंतर आणि सत्ता अजित पवार यांच्या शिवाय मिळणार नाही हे लक्षात येताच पुन्हा विचारधार गुंडाळत सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाच्या मुद्द्या बाबत शरद पवार यांनी जी तो मुद्दा गुंडळून ठेवण्याची भूमिका घेतली तसाच प्रकार आता दिसत आहे.
सत्ताकारणाचा विचार केला तर उपमुख्यमंत्री अजित पवारांसह खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवारांनाही या विलीनीकरणाची गरज आहे,असे दिसते. अजित पवार असेच वेगळे राहिले तर कधीच मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकणार नाहीत त्यांना या एकत्रित राष्ट्रवादीचा पाठिंबा असला तरच ते आघाडीच्या राजकारणात जास्तीत जास्त जागा मिळून मुख्यमंत्री होऊ शकतात,तर अजित पवार बरोबर असतील तरच रोहीत पवार,सुप्रिया सुळे यांना सत्तेची गोडी चाखता येऊ शकते अशी अवस्था आहे, त्यामुळे शरद पवारांच्या घरातील सर्वांनाच विलीनीकरणाची गरज आहे.सत्तेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे ही त्यांची अपरिर्हतता आहे.
आता या विलीनीकरणात प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या नेत्यांची काय भूमिका राहील हे महत्त्वाचे आहे कारण सध्या तरी अजित पवारांच्या पक्षावर चांगल्यापैकी नियंत्रण या नेत्यांनी मिळविले आहे. अजित पवारांनाही पदोपदी या नेत्यांचा विचार कोणताही महत्वाचा निर्णय करण्यापुर्वी करावा लागतो आहे. छगन भुजबळ यांना त्यांना मंत्रीमंडळात पुन्हा घ्यावे लागले, शरद पवारांना किंवा एकत्रित विलीनीकरण नंतर अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि त्यांच्याबरोबर येणारे इतर जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड अशा नेत्यांसह पक्षावर नियंत्रण ठेवणे या गटाला शक्य होणार नाही,त्यामुळे त्यांची भूमिका आणि विलीनीकरणानंतर होणारा संघर्ष कसा राहील हे मोठे कोडे आहे.
आता राहीला प्रश्न कार्यकर्त्यांचा त्यांचे मात्र या सर्व प्रकारात चांगलेच मरण होणार आहे. राष्ट्रवादीतील ही फूट अगदी घराघरा पर्यंत झाली आहे.एक अजित पवारांकडे तर दुसरा शरद पवारांकडे अशी स्थिती महाराष्ट्रातील अनेक घरात आहे,त्यांचे काय होणार आहे. या कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांचे पक्ष वाढविण्यासाठी छातीचा कोट करून किल्ला लढविला आहे.विशेषता जेष्ठ नेते,खासदार शरद पवार यांच्या पक्षासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले आहे,अगदी अपुऱ्या साधन सुविधांशिवाय ते बलाढ्या अशा अजित पवार गटाबरोबर लढल्याचे सर्व महाराष्ट्राने पाहीले आहे, त्यांच्या भावनांचा विचार सुप्रिया सुळे,रोहीत पवार करणार आहेत का? परवा अजित पवार यांच्या बरोबरच्या आघाडीचे समर्थन करता सुप्रिया सुळे यांनी' I am a professional' असा शब्द वापरला,राजकाण हा काही व्यवसाय नाही त्यामुळे त्यातील निर्णयाचे असे समर्थन कसे होऊ शकते. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार या दोन नेत्यांवर अगदी टोकाचे प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे दर्शन महाराष्ट्रला झाले,ते या दोन नेत्यांसाठी त्याच खुन्नसने एकमेका विरूध्द लढले आहेत,आता हे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत.आपण एवडी कटुता घेतली आणि हे आता एकत्र आले, आता आपले कसे होणार हा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे.विशेषता तालुका,गावपातळीवर काम करणाऱ्यांना आपले आगामी राजकीय भवितव्य, स्थानिक राजकारणातील स्थान याबद्दल भिती वाटू लागली आहे. सर्वच पातळ्यावरील व्यावसायिक राजकारणी मात्र एकदम खूष आहेत.
अजित पवार पक्षातून बाहेर पडून त्यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आपल्या भाजप विरोधी विचारधारेचे शरद पवार,सुप्रिया सुळे यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी मोठा गवगवा केला आहे,आता या विचारधारेच्या मुद्द्यावर हे नेते आणि त्यांचा पक्ष काय भूमिका सांगणार याची मात्र महाराष्ट्राला उत्सुकता असेल,का सोनिया गांधींच्या विदेशी पणाचा मुद्दा जसा बासनात गुंडाळून ठेवला तसेच या मुद्द्याचे होणार आहे.