

पुणे : पुणे महापालिका निवडणूक लक्षात घेऊन उमेदवार व राजकीय पक्षांनी चौक सभा, कोपरा सभा तसेच मोकळ्या जागांचा वापर करताना आकारण्यात येणाऱ्या शुल्काचे दर निश्चित करण्यात आले आहेत. महापालिकेच्या मालकीतील रस्ते, चौक, मोकळी मैदाने, प्लॉट तसेच शैक्षणिक संस्थांच्या मैदानांचा प्रचारासाठी वापर करायचा असल्यास निश्चित शुल्कासह अनामत रक्कम भरावी लागणार आहे.
महापालिकेकडील माहितीनुसार, चौक सभेसाठी साधारण चार ते पाच हजार नागरिकांची उपस्थिती अपेक्षित मानून सुमारे दोन हजार चौरस मीटर क्षेत्र धरण्यात आले आहे. रेडीरेकनर २०२५-२६ नुसार प्रतिचौरस मीटर दोन रुपये दराने जागेचे भाडे निश्चित झाले असून, चौक सभेसाठी सुमारे आठ हजार रुपये आकारले जातील. त्यासोबत साफसफाईसाठी अडीच हजार रुपये आणि दहा हजार रुपयांची अनामत ठेव अनिवार्य आहे.
कोपरा सभेसाठी दोन ते अडीच हजार नागरिकांची उपस्थिती गृहीत धरत ८०० चौरस मीटर जागा निश्चित केली आहे. या सभेसाठी ७२०० रुपये शुल्क, अडीच हजार रुपये साफसफाई शुल्क आणि चार हजार रुपयांची अनामत रक्कम आकारली जाणार आहे. याशिवाय महापालिकेच्या ताब्यातील अमिनिटी स्पेस, मोकळे प्लॉट, खेळाची मैदाने तसेच प्राथमिक-माध्यमिक शाळांची मैदाने यासाठी मागणीनुसार क्षेत्र निश्चित केले जाईल.
अशा जागांसाठी प्रतिचौरस मीटर दोन रुपये दराने भाडे आकारले जाईल. साफसफाईसाठी स्वतंत्रपणे अडीच हजार रुपये द्यावे लागतील, तर अनामत रक्कम प्रतिदिन भाड्याच्या ५० टक्के इतकी असेल. प्रचारादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण, स्वच्छता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हे दर लागू केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. नियमांचे उल्लंघन झाल्यास अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.