

कोल्हापूर गावाच्या नावाचा उच्चार केला की, ऐतिहासिक असे नितांत सुंदर आणि निवांत शहर डोळ्यापुढे येते. कोल्हापूर म्हटले की, आखाडे घुमवणारे पैलवान डोळ्यासमोर येतात त्याचबरोबर तांबडा-पांढरा रस्सापण डोळ्यापुढे येतो. कोल्हापूर म्हटले की, आई अंबाबाईचे रूप डोळ्यासमोर येते. कोल्हापूरची अशी अनेक वैशिष्ट्ये आहे. तथापि, त्यात कोल्हापुरी चप्पलसुद्धा महत्त्वाची आहे. जागतिक पातळीवर या चपलेचा बहुमान झालेला आहे. नुकतीच कोल्हापुरी चप्पल काही विशिष्ट कारणामुळे चर्चेत आली होती.
युरोपमध्ये फॅशन ब्रँड असलेल्या कंपनीच्या फॅशन शोमध्ये पुरुष मॉडेल्सच्या पायात कोल्हापुरी चपला होत्या; परंतु या चपलांचा उल्लेख कोल्हापुरी चप्पल असा न करता लेदर फुटवेअर असे करून या कंपनीने आपल्या अभिमानाचा विषय असणार्या कोल्हापूर ब्रँडचा उल्लेख टाळला होता.
झाले असे की, इटली येथील मिलान येथे सदर कंपनीच्या पुरुषांचा कपड्यांचा फॅशन शो चांगलाच रंगला. हा फॅशन शो रंगवणारे मॉडेल्स कोल्हापुरी चप्पल परिधान करून रॅम्प वॉक करत होते. या मॉडेल्सचे व्हिडीओ, फोटो सर्वत्र व्हायरल झाले; मात्र यासंदर्भातील एकाही बातमी, व्हिडीओमध्ये कोल्हापुरी चप्पलच्या नावाचा उल्लेख नव्हता. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली.
कोल्हापुरी चप्पल हा जागतिक ब्रँड असताना कंपनीने त्यांच्या नावाने ही चप्पल फॅशन शोच्या रॅम्पवर आणली आहे. या चप्पलचे डिझाईन हे कोल्हापुरी चप्पलचे आहे, हे आपल्याकडील कारागिरांनी ओळखले. एखाद्या कारागिराने बनवलेले उत्पादन स्वतःच्या नावावर सादर करणे अयोग्य आहे, याची जाणीव संबंधित कंपनीला करून देण्यात आली. याचा अर्थ, तुम्हाला कोल्हापुरी चपलेचा रुबाब हवा आहे; परंतु त्याचे श्रेय तुम्ही द्यायला तयार नाही, असा तक्रारीचा सूर आल्यानंतर अखेर या ब्रँडने नमते घेतले आणि आपल्या कोल्हापुरी चप्पलला श्रेय दिले. यासाठी महाराष्ट्र चेंबरने पुढाकार घेतला. त्याला यश आले.
आपल्यावर होणारा अन्याय कोल्हापुरातील कारागिरांनी ओळखला आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांनी त्याला जागतिक पातळीवर आणून तक्रारीची नोंद केल्यानंतर कंपनीला ते मान्य करावे लागले. या चपला विकण्याचा कंपनीचा घाट होता, असे दिसते; परंतु आता त्यांनी त्याबद्दल माफी मागितली आहे आणि कोल्हापुरी चपलेला तिचा मान जगभरात देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे जाहीर केले आहे. जागतिक पातळीवर चालणारी आपली उत्पादने विकण्यासाठी आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल आणि आपल्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत मानाचे पान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. दरम्यान, चविष्ट असा आपला तांबडा-पांढरा रस्सा जगभरात कुठे वापरला जात असेल, तर त्याचा कोल्हापुरी उल्लेख होतो की नाही, यावर आपल्याला लक्ष ठेवायला लागणार आहे.