

देश लोकसंख्येमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर आहे, याबद्दल कोणालाही शंका उरलेली नाही. याचे कारण म्हणजे, प्रत्येक देशाच्या लोकसंख्येची आकडेवारी जाहीर होत असते. आपण लोकसंख्येत पहिल्या क्रमांकावर आहोत, याची आपल्याला काळजी वाटली पाहिजे. आपण आर्थिक महासत्ता असलेल्या देशांच्या रांगेत चौथ्या क्रमांकावर आहोत, याचा आपल्याला अभिमानच वाटला पाहिजे. आजकाल बातम्या येतात त्या खर्या आहेत की खोट्या आहेत, याविषयी निश्चित माहिती समजत नाही. आपल्या पतीला मारहाण करण्यामध्ये आपल्या भारतीय विवाहित भगिनी जगात तिसर्या क्रमांकावर आहेत, अशी बातमी आली आहे. या बातमीवर आमचा अजिबात विश्वास नाही; पण किमान ही बातमी पाहून काही काळ तरी सुन्न झाल्यासारखे झाले.
आपल्या देशाची कुटुंब संस्था मजबूत असून कुरकूर करत का होईना; पण संसार चांगले चालू असतात हे आपले निरीक्षण आहे. वर्तमानपत्रांमध्ये पतीने पत्नीला मारहाण केल्याच्या आणि तिने पोलीस तक्रार केल्याच्या बातम्या येत असतात. अशा प्रकारच्या 100 बातम्या असतील, तर फार तर एखादी बातमी असते, ज्यामध्ये पत्नीने पतीला मारहाण गेलेली असते आणि पतीने बायकोची तक्रार पोलिसांत केलेली असते. येथे आम्हास प्रश्न पडला आहे की, भारतीय महिला पतीला मारहाण करण्यामध्ये जगात तिसर्या क्रमांकावर आहेत याची आकडेवारी कशी मिळवली असेल?
पुरुषप्रधान असलेल्या आपल्या संस्कृतीमध्ये समजा एखादी पत्नी पतीला मारहाण करत असेल, तर पहिली गोष्ट म्हणजे ही बातमी तो पती बाहेर सांगणारच नाही. यात अपमानच आहे. क्वचित असे प्रकार घडत असतील, तर बंद दाराआड घडत असतील. त्याची वाच्यता कोणीही पती स्वतः करणार नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण आपल्या पतीला वाटेल तशी मारहाण करतो, हे कोणतीही पत्नी चारचौघांत सांगणार नाही.
पतीला मारहाण करण्याची शक्ती आणि हिंमत असणे म्हणजे फार काही मिरवण्यासारखा प्रकार नाही. अर्थात, पत्नी याची वाच्यता बाहेर करणार नाही. पत्नी बाहेर असे काही बोलत नाही. पती स्वतःहून बायकोने मारहाण केली असे सांगत नाही, तर मग जगामध्ये आपला देश या प्रकारात तिसर्या क्रमांकावर आहे, याचा शोध लावणार्या लोकांना वंदनच केले पाहिजे. रोज पत्नीला मारझोड करणारा पती असला, तरीही वटसावित्रीच्या दिवशी देवाकडे ‘हाच पती जन्मोजन्मी दे’ अशी मागणी करणार्या असंख्य महिला नुकत्याच आपण पाहिल्या आहेत. जसा काय पती मिळाला आहे, त्याच्या आहे त्या स्वभावानिशी त्याचा स्वीकार करणे आणि संसार सुखाचा करणे हे संस्कार भारतीय महिलांवर लहानपणापासून झालेले असतात. ‘माझा पती माझा परमेश्वर’ हीच भूमिका बहुतांश भारतीय महिलांची असते.