

सध्या संपूर्ण राज्यभरात पावसाचे धूमशान सुरू आहे. वेगवेगळ्या प्रकारचे अलर्ट दिले जात आहेत. कधी ऑरेंज, कधी पिवळा, तर कधी रेड. या कुठल्याही प्रकारच्या अलर्टला न जुमानता पाऊस जिथे पाहिजे तिथे मुसळधार पडत आहे. शेतकरीवर्गाचे पेरणीचे सर्वसाधारण दरवर्षी असलेले आडाखे यावर्षी त्यांनाही बांधता येत नाहीत. कारण, पाऊस कधी पडेल, कसा पडेल आणि कुठे पडेल, याचा नेम राहिलेला नाही.
थोडक्यात सांगावयाचे, तर पाऊस हा एखाद्या शासकीय साहेबासारखा झाला आहे. आपण एखाद्या कार्यालयात जातो. विशिष्ट टेबलावरील एका विशिष्ट साहेबांकडे आपले काम असते. आपण थोडी आजूबाजूला चौकशी करतो की, साहेब कधी येणार आहेत? कारण, त्यांची खुर्ची रिकामी असते. आजूबाजूच्या मंडळींना पत्ता नसतो की, साहेब नेमके कधी येणार आहेत. आपण प्रश्न विचारला त्याचे उत्तर दिले पाहिजे म्हणून ते सांगतात की, येतील थोड्याच वेळात. या प्रकारामध्ये ‘किती वेळात’ याचे उत्तर भारतीय पद्धतीमध्ये निश्चित अजिबातच नाही. एखाद्या लग्नाचा मुहूर्त दुपारी 11 वाजून 40 मिनिटांनी सांगितलेला असतो. आपण आटापिटा करत तिथे पोहोचतो. प्रत्यक्षात लग्न दीड दोन वाजल्याशिवाय लागत नाही.
‘साहेब येतील थोड्याच वेळात’ असे कळाल्याबरोबर आपल्याकडे अन्य काही पर्याय नसतो. कारण, आपण दूरवरून तिथे आलेलो असतो, मग आपण त्या कार्यालयाच्या परिसरात फेरफटका मारून येथील बोर्ड, नोटिसा सविस्तर वाचून घेतो आणि अधून मधून साहेबांच्या रिकाम्या खुर्चीवर नजर टाकत असतो. तुम्ही सकाळी साडेदहा वाजता गेला असाल, तर साधारणतः साडेबारा वाजेपर्यंत साहेब आलेले नसतात. बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवणे आवश्यक असल्यामुळे बरेचदा साहेब तुम्ही येण्याच्या आधीच बायोमेट्रिकवर बोट लावून पुन्हा त्यांच्या कामाला निघून गेलेले असतात.
साडेबारा वाजता तुम्ही अस्वस्थ होता आणि पुन्हा आजूबाजूच्या खुर्च्यांना विचारता की, साहेब कधी येणार आहेत? दोन-तीन तास घातल्यानंतर तुम्हाला अचानक माहिती प्राप्त होते की, साहेब दौर्यावर गेलेले आहेत आणि दोन-तीन दिवस तरी येणार नाहीत. तुम्ही फारच चिकित्सक असाल, तर बाजूच्या खुर्चीवाल्या कर्मचार्याला विचारलं की, दोन दिवसांत की तीन दिवसांत? यावर क्षणाचाही विलंब न लावता तो फटक्यात उत्तर देतो, ‘मला माहीत नाही.’ जसे साहेब कधी येणार आहेत हे कुणालाच माहीत नसते, तसाच पाऊस कधी येणार आहे, हेही कोणी सांगू शकत नाही. या कारणामुळे पावसाची आणि साहेबांची तुलना करण्याचा मोह होत आहे.