

अमली पदार्थ आणि व्यसनांविरोधातील जागतिक लढा तीव्र करण्यासाठी 1987 पासून संयुक्त राष्ट्राने ‘26 जून’ हा दिवस अमली पदार्थांचा दुरुपयोग आणि अवैध तस्करीविरोधी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून पाळण्यास सुरुवात केली. 1980च्या दशकात संजय दत्तसारख्या काही सेलिब्रिटीज ड्रग्जच्या आहारी गेल्या होत्या. हिंदी चित्रपटांतून बड्या बापांची मुले ड्रग्ज घेतात आणि त्याची प्रचंड प्रमाणात तस्करी चालते, अशी द़ृश्ये बघायला मिळू लागली; परंतु हळूहळू हे व्यसन मध्यमवर्ग आणि तेथून थेट गोरगरिबांपर्यंत कधी पसरले, हे कळलेही नाही. महानगरांतच आढळून येणारे हे व्यसन आता ग्रामीण भागातही झपाट्याने पसरू लागले आहे. दुबईतून ड्रग्जचा कारखाना चालवून महाराष्ट्रासह भारताच्या विविध राज्यांत ड्रग्ज विक्री करणार्या कटातील मुख्य फरार आरोपी मुस्तफा मोहम्मद कुब्बावाला यास संयुक्त अरब अमिरातीत अटक करण्यात आली असून, त्याला भारताच्या हवाली करण्यात आले आहे. त्याच्या अटकेने या गंभीर प्रश्नावरील चर्चा नव्याने सुरू झाली आहे. वास्तविक, त्याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. मुस्तफा कुब्बावाला आणि त्याच्या सहकार्यांकडे मिळून 252 कोटींचे 126 किलो एमडी ड्रग्ज सापडले होते.
अलीकडील काळात मुंबईसारख्या महानगरात एमडी ड्रग्जची तस्करी वाढली होती. पाच महिन्यांपूर्वी चेंबूर, कुर्ला या भागात पोलिसांनी त्यासाठी विशेष मोहीम राबवून एका महिलेकडून एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. यातील गंभीर बाब म्हणजे, मुंबईतील या ड्रग्जच्या तस्करांनी दुबईत राहून सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे एमडी ड्रग्ज बनवण्याचा कारखाना सुरू केला. तेथील हा माल ते मुंबईसह सुरतच्या तस्करांच्या मदतीने विकत असत. कारखान्यावर छापा टाकला असता 245 कोटी रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा सापडला. सर्वात गंभीर बाब म्हणजे, ड्रग्जचा कारखाना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहमच्या हस्तकांकडून चालवला जात होता.
एकेकाळी खंडणी, जमीन हडपणे, सेटलमेंट, बनावट औषधांची तस्करी या उद्योगांमध्ये असलेला दाऊद त्यानंतर सोने-चांदी व अमली पदार्थांच्या तस्करीत गुंतला. डी-कंपनीचे लोक जमीन आणि बांधकाम प्रकल्पांमधील गुंतवणूक, मनी लाँडरिंग, बनावट नोटा आणि ऑनलाईन सट्टेबाजीद्वारे पैसे कमावत आहेत. चीनमध्ये असलेले ड्रग्ज खरेदी करणारे एजंट भारतातील डी-गँगशी संबंधित लोकांसोबत ड्रग्जची तस्करी करतात, असेही पूर्वीच पोलिसांना आढळून आले आहे. ‘फोर्ब्ज’ मासिकाने दहा वर्षांपूर्वीच जाहीर केलेल्या यादीनुसार दाऊदची संपत्ती तेव्हाच 43 हजार कोटी रुपये इतकी होती. जगातील टॉप तीन श्रीमंत डॉनच्या यादीत दाऊदचा समावेश आहे आणि यातील बराच पैसा त्याने युवा पिढीला ड्रग्जच्या अधीन करून कमावला. गेल्यावर्षी दाऊदचा प्रमुख सहकारी दानिश चिकना याला मुंबईतील डोंगरी येथून अटक करण्यात आली. तेथे तो ड्रग्जचा कारखाना चालवत होता. आता देशभरातील तपास यंत्रणा विशेषतः नार्कोटिक्स ब्यूरोचे लक्ष सांगलीकडे वळले आहे. यापूर्वी मीरा-भाईंदर गुन्हे शाखेच्या पथकाला तेथे 11 किलो कोकेन सापडले होते आणि सबीना शेख या महिलेला त्यावेळी ताब्यात घेण्यात आले होते. गेल्या एप्रिलमध्ये लातूरमध्ये एका शेतातील मॅफेड्रोन ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला.
धक्कादायक बाब म्हणजे, त्याचा सूत्रधार हा मीरा-भाईंदरमधील एक पोलीस हवालदार होता. पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील एका फार्म हाऊसवर छापा मारत ड्रग्जचे रॅकेटही उद्ध्वस्त करण्यात आले. चिंतेची बाब म्हणजे, खुद्द काही पोलिसांचा या व्यवहारातील वाढता सहभाग. नाशिक शहर आणि भागात गेल्या अडीच वर्षांत अडीच कोटी रुपयांचे अमली पदार्थांचे साठे जप्त करण्यात आले. एवढेच नव्हे, तर ड्रग्जचे कारखाने उभारून तस्करी करणार्या टोळ्याही जेरबंद करण्यात आल्या. नाशिकमधील एमडी ड्रग्जच्या तस्करीत ‘छोट्या भाभी’सह काही महिलांचाही सहभाग होता.
ड्रग्ज रॅकेटमधील गुंड आणि पेडलर्सशी संपर्कात असल्याचा ठपका ठेवत एका पोलीस अंमलदाराला बडतर्फ करण्यात आले. एक चांगली बाब म्हणजे, नाशिक पोलीस आयुक्तालयाने एक व्हॉटस्अॅप नंबर जारी केला असून, ड्रग्जच्या व्यवहारांची माहिती त्या नंबरवर देण्याचे आवाहन केले आहे. दोन वर्षांपूर्वी आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिकचा ‘उडता पंजाब’ झाला आहे, असे विधिमंडळात सांगितले होते. तेथील ड्रग्जमाफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. थोडक्यात, महाराष्ट्राच्या शहरांपासून ते खेड्यापाड्यांपर्यंत गांजा, चरस, भांग आणि ड्रग्जचे व्यसन पसरले आहे. तुळजापुरातही 35 ड्रग्ज विक्रेत्यांवर पोलिसांनी अलीकडेच कारवाई केली होती. अमली पदार्थांच्या व्यवहारात कुठल्याही प्रकारचा सहभाग आढळला, तर पोलिसांना थेट बडतर्फ केले जाईल, असा इशारा मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. व्यसनाधीनतेची सुरुवात ही आकर्षणापोटी होते आणि मग नशेचा स्तर वाढत जातो. कफ सीरप, औषधी गोळ्या, वेदनाशामक मलम, हुंगून नशा करता येईल अशी द्रव्ये, गुटखा, तंबाखू सिगारेटपासून सुरू झालेले हे व्यसन थेट दारू, गांजा आणि ड्रग्जपर्यंत जाऊन ठेपते. छत्रपती संभाजीनगरमधील टपर्यांवर व किराणा दुकानांमध्ये हे साहित्य सहजपणे उपलबध होते. नशेसाठी लागणार्या साहित्याला टोपण नावाने ओळखले जाते. शाळकरी मुलांमधील व्यसनाधीनता हा गंभीर प्रश्न बनला आहे.
आपण काहीतरी थ्रिल करावे म्हणून किंवा ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणूनही मुले-मुली व्यसनांकडे वळतात. नशा न केल्यास मित्र आपल्याला ‘कूल’ समजत नाहीत किंवा कमी लेखतात, असे काही उच्चभ्रू शाळांमधील मुला-मुलींचे मत असते. खरे तर, ड्रग्जमुळे पिढ्याच्या पिढ्या बरबाद होतात. व्यसनामुळे त्या व्यक्तीबरोबरच कुटुंबाची फरफट होते. या सगळ्यास लगाम घालणे, हे सरकारचे आणि पोलिसांचे कर्तव्यच आहे; परंतु शिक्षक आणि पालकांनीही आपल्या पाल्यावर डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही स्थितीत महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ होता कामा नये.