

डॉ. शैलेंद्र देवळाणकर,
परराष्ट्र धोरण विश्लेषक
केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारत या वर्षाच्या अखेरीस पहिली स्वदेशी सेमीकंडक्टर चिप लॉन्च करण्याचा साक्षीदार असेल, असे म्हटले आहे. वास्तविक, आजवर भारत मायक्रोचिपच्या स्पर्धेमध्ये खूप मागे होता. विशेष म्हणजे भारतामध्ये 1960 च्या दशकामध्ये सेमीकंडक्टरचे उद्योग सुरू करण्यासारखी परिस्थिती होती; परंतु त्यावेळी याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. पण, आता भारत या क्षेत्रात ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे. तथापि, या क्षेत्रात अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही सेमीकंडक्टर चिपसंदर्भात कडक भूमिका घेतली आहे. आगामी 2 ते 3 आठवड्यांत सेमीकंडक्टरच्या आयातीवरही टॅरिफ लावले जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. हे दर सुरुवातीला कमी असतील, जेणेकरून कंपन्यांना अमेरिकेत उत्पादन करण्यासाठी वेळ आणि संधी मिळेल. यानंतर टॅरिफ वाढवले जाईल, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. धोरणाचा मुख्य उद्देश, देशांतर्गत उत्पादन मजबूत करणे हा आहे. ज्या कंपन्या अमेरिकेत उत्पादन करतील, त्यांना यातून सूट मिळू शकते, असे संकेतही त्यांनी दिले. सेमीकंडक्टरच्या आयातीवर 100 ते 300 टक्के टॅरिफ आकारणी करण्याच्या विचारात ट्रम्प आहेत. तसे झाल्यास जागतिक सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी तो मोठा धक्का ठरू शकतो. यानिमित्ताने हाताच्या बोटाच्या अग्रभागावरही बसू शकेल, अशा इवल्याच्या चिपसाठी देशांमध्ये इतकी चढाओढ का सुरू आहे, भारत या स्पर्धेत कुठे आहे, हे जाणून घेणे औचित्याचे ठरेल.
21 व्या शतकात सेमीकंडक्टर्सनी जागा घेतली आहे, असे म्हटल्यास ते गैर ठरणार नाही. कारण मोबाईल फोन्स, कॉम्प्युटर्स, लॅपटॉप, वैद्यकीय क्षेत्र, वाहननिर्मिती विश्व, बँकिंग विश्व, संरक्षण क्षेत्र, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा जीवनाशी निगडित सर्वच क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणाने सेमीकंडक्टर म्हणजेच मायक्रोचिपचा वापर केला जात आहे. पूर्वीच्या काळी एका पूर्ण खोलीमध्ये बसेल इतका संगणक असायचा; पण 2023 मध्ये आयफोन-6 आला तेव्हा एका छोट्याशा मायक्रोचिपमध्ये संगणकातील सर्व गोष्टी सामावलेल्या आहेत. त्यामुळे आज संपूर्ण जगभरात सेमीकंडक्टरच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी राष्ट्रा-राष्ट्रांचे जोरदार प्रयत्न सुरू झालेले दिसताहेत. विशेषतः, प्रगत देश सेमीकंडक्टर उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यासाठीच्या योजना आखत आहेत.
सेमीकंडक्टर निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये तीन टप्पे आहेत. पहिला म्हणजे डिझाइनिंग. हे काम गुणवत्तापूर्ण असल्याने त्यासाठी कौशल्यप्राप्त तंत्रज्ञांची गरज भासते. तसेच यासाठी संशोधन आणि विकासही मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. दुसरा टप्पा आहे मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे चिपमधील सुटे भाग तयार करणे आणि तिसरा टप्पा असेम्ब्िंलग म्हणजेच हे सर्व सुटे भाग एकत्र जोडून चिप तयार करणे. यापैकी डिझाइनिंगच्या क्षेत्रात भारतीय मोठ्या प्रमाणावर आहेत; पण हे डिझाइनिंग ते भारतासाठी करत नाहीत.
अमेरिकेतील इंटेलसारखी कंपनी, जापनीज कंपन्या किंवा पश्चिमी देशातील कंपन्यांसाठी हे काम केले जाते. मॅन्युफॅक्चरिंग आणि असेम्ब्िंलगच्या क्षेत्रात भारतीय फारसे नाहीयेत. भारताने 2022 मध्ये 51.6 कोटी डॉलरची सेमीकंडक्टर उत्पादने निर्यात केली होती. ही निर्यात प्रामुख्याने अमेरिका, हाँगकाँग आणि दक्षिण आफ्रिकेत केली. मात्र, या निर्यातीपेक्षा आयातीचे प्रमाण अधिक आहे. देशात 2022 मध्ये 4.55 अब्ज डॉलरच्या सेमीकंडक्टर उपकरणांची आयात झाली. त्यात चीन, सिंगापूर आणि व्हिएतनाममधून प्रामुख्याने आयात झाली आहे.