

Hindi Language Compulsion Row
नाशिक : राज्यात तिसऱ्या भाषेच्या धोरणावरून सध्या चर्चांना उधाण आले आहे. तिसरी भाषा म्हणजे हिंदीची सक्ती आहे का? लहान वयात मुलांवर हा भाषेचा अतिरिक्त भार आहे का? यांसारख्या अनेक प्रश्नांवर आणि गैरसमजांवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी सुकाणू समितीचे सदस्य सचिन उषा विलास जोशी यांच्याशी साधलेला संवाद....
1. हिंदी भाषेची सक्ती आहे का?
नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) नुसार, तिसरी भाषा कोणतीही 22 अधिकृत भारतीय भाषांमधून निवडता येते. हिंदी सक्ती नाही.
2. इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा का शिकवली जाते?
NEP 2020 मध्ये बहुभाषिकतेवर भर दिला आहे. त्यानुसार, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात (NCF) तीन भाषा सूत्राचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची भाषिक समृद्धी होते.
3. बहुभाषिकतेमागील उद्देश काय आहे?
भारतातील सांस्कृतिक व भाषिक विविधतेमध्ये एकात्मतेचा अनुभव निर्माण करणे हा उद्देश आहे. बहुभाषिकता विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सन्मान, संवाद कौशल्य आणि राष्ट्रभावना वृद्धिंगत करते.
4. राज्य अभ्यासक्रम आराखड्यात इयत्ता पहिलीपासून तीन भाषा सूत्र आहे का?
SCF च्या प्रारूपात तीन भाषा सूत्र नमूद आहे. मात्र अंतिम दस्तावेजानुसार पायाभूत टप्प्यातील अध्ययन निष्पत्तीमध्ये फक्त दोन भाषांचा उल्लेख आहे. तिसऱ्या भाषेची ओळख ही केवळ मौखिक स्वरूपात सुचवली आहे.
5. पायाभूत राज्य अभ्यासक्रम म्हणजे काय?
NEP 2020 नुसार 3 ते 8 वयोगटासाठीचा शिक्षण टप्पा म्हणजे ‘पायाभूत स्तर’. यासाठी स्वतंत्र 'Foundational NCF' तयार केला असून राज्य स्तरावर 'Foundational SCF' हा दस्तावेज SCERT कडून तयार करण्यात आला आहे.
6. या पायाभूत स्तरावर भाषेच्या संदर्भात काय धोरण आहे?
विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर आहे. पहिली व दुसरी इयत्ता ही पूर्व-प्राथमिक शिक्षणात समाविष्ट केली आहे.
* मराठी माध्यम: प्रथम भाषा – मराठी; दुसरी भाषा – इंग्रजी; तिसरी भाषा – मौखिक स्वरूपात कोणतीही भारतीय भाषा.
* इंग्रजी माध्यम: प्रथम भाषा – इंग्रजी; दुसरी – मराठी; तिसरी – मौखिक स्वरूपात कोणतीही भारतीय भाषा.
7. मौखिक स्वरूपातील तिसरी भाषा म्हणजे काय?
याचा अर्थ फक्त बोलणे आणि ऐकणे (oral communication). यात वाचन व लेखन समाविष्ट नाही. शिक्षक तिसऱ्या भाषेतील गाणी, गोष्टी, संवाद व काही मूलभूत शब्द विद्यार्थ्यांशी मौखिक पद्धतीने शेअर करतात.
8. तिसऱ्या भाषेसाठी आठवड्यात किती वेळ दिला जातो?
आठवड्यातील 48 तासिकांपैकी फक्त 4–5 तासिका (प्रत्येकी 35 मिनिटांची) तिसऱ्या भाषेसाठी आहेत. तुलना केल्यास, प्रथम भाषेसाठी (मराठी) किमान 15 तासिका आहे.
9. एवढ्या लहान वयात तिसरी भाषा शिकवण्याची गरज का?
न्यूरोसायन्सनुसार, वयाचे पहिले 8 वर्षे ही भाषा शिकण्यासाठी सर्वाधिक सुसंवादक्षम असतात. या वयात विविध भाषा ऐकवल्यास त्या भाषांची समज निर्माण होते व भविष्यात त्या शिकणे सुलभ होते. मात्र, यासाठी पूरक व समृद्ध वातावरण आवश्यक असते.
10. तीन भाषा शिकविल्यास मुलांना गोंधळ होईल का?
नाही, जर योग्य वातावरण असेल. उदाहरणार्थ, घरात मराठी, शाळेत इंग्रजी, शेजारी गुजराती – अशा परिस्थितीतही मुलं सहज संवाद साधू शकतात हे आपण आजूबाजूला बघतो. मूल बहुभाषिक वातावरणात नैसर्गिकरीत्या अनेक भाषा आत्मसात करतात. पूरक आणि आनंददायी वातावरण गरजेचे.
11. भाषिक विकासासाठी "पूरक वातावरण" म्हणजे काय?
विद्यार्थ्याला ज्या भाषेतून शिक्षण दिलं जातं (प्रथम भाषा), ती भाषा घर, शाळा व समाजात ऐकू आली पाहिजे. त्यामुळे भाषा शिकणे अधिक सुलभ होते. असे वातावरण आनंददायी व संवादात्मक असावे.
12. हे पूरक वातावरण नसेल तर काय परिणाम होतो?
विद्यार्थ्यांना भाषिक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. या मुळे बाल मेंदू वर ताण येऊ शकतो.
13. त्यामुळे भाषातज्ज्ञ तिसऱ्या भाषेला विरोध करतात का?
काही प्रमाणात हो. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रथम भाषा नीट शिकवली जात नसेल तर तिसऱ्या भाषेचा ताण विद्यार्थ्यावर पडू शकतो. मात्र इतरही मुद्दे आहेत, जसे शिक्षकांची तयारी, पाठ्यपुस्तकांची उपलब्धता व घरातील वातावरण.
14. ASER अहवालानुसार महाराष्ट्रातील 35% विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्तेप्रमाणे वाचता येत नाही. मग अश्या परिस्थितीमध्ये तिसरी भाषा चा अट्टाहास का?
पस्तीस टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्तेचा वाचता येत नाही यामध्ये बहुतांशी सरकारी शाळेतील विद्यार्थी आहे. पण याचा दुसरा अर्थ 60 ते 70% विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्तेचे वाचता येतं. अश्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा मौखिक स्वरूपात नाही दिली तर त्यांची शिकण्याची संधी जाते.
15. मेंदूवर तिसऱ्या भाषेचा ताण येतो का?
आनंददायी व सुसंवादात्मक वातावरण असेल तर ताण येत नाही. उलट, अशा वातावरणात मूल तीन-चार भाषा शिकते – अगदी वाचन व लेखनासह. उदाहरणार्थ, काही CBSE/ICSE शाळांमधील विद्यार्थी तीनही भाषांमध्ये निपुण असतात.
(टप्प्या टप्प्यात इयत्ता पहिलीपासून नाही)
16. महाराष्ट्रात पहिलीपासून तीन भाषा कुठे शिकवल्या जातात?
CBSE, ICSE बोर्डाच्या इंग्रजी माध्यम शाळांमध्ये:
* प्रथम भाषा: इंग्रजी
* दुसरी भाषा: मराठी (राज्य शासनानुसार अनिवार्य)
* तिसरी भाषा: हिंदी (मौखिक स्वरूपात)
राज्य मंडळाच्या काही खासगी इंग्रजी माध्यम शाळांमध्येही ही रचना दिसते.
17. अजून कुठे पहिल्यापासून तीन भाषा शिकवल्या जातात?
महाराष्ट्रातील गुजराती, हिंदी, उर्दू, कन्नड, तामिळ, तेलगू, सिंधी माध्यमाच्या शाळांमध्ये तीन भाषा शिकवल्या जातात. इयत्ता 5 वीपासून अनेक विद्यार्थी चौथी भाषा देखील शिकतात.
18. अंदाजे किती विद्यार्थी महाराष्ट्रातील भाषा पहिलीपासून शिकत आहे?
महाराष्ट्रात एकूण 2 कोटी 11 लाख एवढे विद्यार्थी आहे. त्याच्यातील इंग्रजी माध्यमातील 66 ते 67 लाख इतके विद्यार्थी तर इतर भाषेतील शिक्षण घेणारे जसे गुजराती, कन्नड, तमिळ, सिंधी, हिंदी, उर्दू भाषेत शिक्षण घेणारे 16 ते 17 लाख विद्यार्थी आहे. इंग्रजी माध्यमातील 66 - 64 लाख पैकी चाळीस लाख विद्यार्थी हे पहिलीपासून तीन भाषा शिकत आहे. तर इतर भाषेतील 17 लाख विद्यार्थी ते ही तीन भाषा शिकत आहेत. ढोबळ मनाने 60 लाख अधिक विद्यार्थी तीन भाषा पहिलीपासून गेल्या 25 वर्षांपासून शिकतच आहे.
19. NEP 2020 नुसार तीन भाषा शिकण्याचा भविष्यात काय फायदा?
NEP 2020 अंतर्गत ‘Academic Bank of Credits’ ही योजना लागू होणार आहे. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षण घेतलेल्या अभ्यासक्रमासाठी क्रेडिट्स (शैक्षणिक गुण) मिळणार आहेत. हे क्रेडिट्स विद्यार्थ्यांनी शाळेत असतानाच म्हणजे बालवाडीपासून ते दहावी, बारावी आणि पुढे पदवीपर्यंत जमा करायचे असतात.
तीन भाषांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा थेट फायदा होतो. महाराष्ट्रातील मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये जर इयत्ता पहिलीपासून पाचवीपर्यंत तिसरी भाषा शिकवली जात असेल, तर त्या विद्यार्थ्यांना त्या विषयाचे क्रेडिट्स मिळतील. पण जर तिसरी भाषा शिकवली जात नसेल, तर त्या भागातील विद्यार्थ्यांचे क्रेडिट्स राष्ट्रीय स्तरावर कमी राहतील.
आता हेच क्रेडिट्स भविष्यात उच्च शिक्षणात प्रवेश घेण्यासाठी किंवा इतर शिक्षणक्रमांसाठी आवश्यक ठरणार आहेत. म्हणजेच, जास्त शैक्षणिक संधी मिळवण्यासाठी आणि स्पर्धात्मक स्तरावर टिकून राहण्यासाठी तीन भाषा शिकणे फायद्याचे ठरेल.
या योजनेमुळे संपूर्ण भारतभर एकसंध आणि न्याय्य मूल्यमापन होईल आणि विद्यार्थी त्यांच्या भाषिक कौशल्यांचा उपयोग भविष्यातील प्रवेश प्रक्रिया अभ्यास व नोकरीच्या संधींसाठी करू शकतील.
20. मग अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटसाठी भाषा शिकणं का गरजेचं आहे? इतर कौशल्यांना क्रेडिट का नाही मिळू शकत?
हो, नक्कीच – इतर कौशल्यांसाठीसुद्धा क्रेडिट्स मिळू शकतात. पण एक फरक लक्षात घ्या: भाषाशिक्षण हे सर्व विद्यार्थ्यांना समानपणे मिळते आणि शाळेच्या वेळापत्रकात आठवड्यातून ठराविक तास भरवले जातात. त्यामुळे, प्रत्येक विद्यार्थी त्या विषयात किती वेळ उपस्थित होता हे सहज नोंदवता येते आणि त्यावर आधारित क्रेडिट्स देणे शक्य होते.
कौशल्याधारित शिक्षण मात्र अनेकदा वैयक्तिक आवडीनुसार निवडले जाते – उदाहरणार्थ, एखाद्याने चित्रकला, संगणक, हस्तकला, नृत्य, शेती यांसारखी कौशल्ये निवडली, तर प्रत्येकाचे सहभाग, सरावाचा वेळ आणि प्रगती वेगवेगळी असते. त्यामुळे सर्वांना समानपणे आणि नियमितपणे क्रेडिट देणे थोडेसे गुंतागुंतीचे होते.
यामुळे भाषेप्रमाणे निश्चित वेळ व हजेरीच्या आधारे क्रेडिट देणे सध्या अधिक सोपे आहे. भविष्यात, जेव्हा कौशल्यशिक्षणाचे ठराविक निकष व मूल्यमापनपद्धती विकसित होतील, तेव्हा त्यासाठीही क्रेडिट्स दिले जातील. ही पूर्ण यंत्रणा हळूहळू अधिक मजबूत केली जात आहे.
21. महाराष्ट्र व्यतिरिक्त अजून कोणत्या राज्यांमध्ये तीन भाषा सूत्राची अंमलबजावणी होते?
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत तीन भाषा सूत्राचे महत्त्व अधोरेखित केले गेले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी तीन भाषा शाळेत शिकाव्यात असा आग्रह आहे पण अनिवार्य नाही — विशेषतः त्यात मातृभाषा/प्रादेशिक भाषा, हिंदी आणि इंग्रजी यांचा समावेश असतो, परंतु याची अंमलबजावणी राज्यांच्या स्थानिक गरजांनुसार व लवचिकतेनुसार होते.
तीन भाषा सूत्राची अंमलबजावणी खालील राज्यांमध्ये होते:
1. जम्मू आणि काश्मीर व लडाख: येथे तीन भाषा सूत्र लागू करण्यात आले आहे. शाळांमध्ये हिंदी व उर्दू याशिवाय इंग्रजी किंवा स्थानिक बोली शिकवली जाते.
2. गुजरात: येथेही तीन भाषा सूत्राचे पालन केले जाते. विद्यार्थ्यांना गुजराती, हिंदी आणि इंग्रजी शिकवले जाते. काही भागांमध्ये संस्कृत किंवा सिंधीसारख्या भाषांचाही पर्याय इयत्ता तिसरीपासून उपलब्ध आहे. पहिली आणि दुसरीला मौखिक स्वरूपात आहे.
3. मध्य प्रदेश: राज्यात तीन भाषा सूत्र राबवले जाते. हिंदी ही मुख्य भाषा असून इंग्रजी आणि तिसरी भाषा (बहुधा संस्कृत/उर्दू/मराठी) विद्यार्थ्यांच्या निवडीनुसार शिकवली जाते.
4. दक्षिण भारतीय राज्ये (जसे की कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश): येथेही विविध पद्धतीने तीन भाषा सूत्र लागू आहे, जसे की स्थानिक भाषा, हिंदी व इंग्रजी. तथापि, काही राज्यांत (उदा. तमिळनाडू) ऐच्छिक स्वरूपात दोन भाषा धोरणही आहे.
22. अनेक इतर राज्यांमध्ये अजून तीन भाषा धोरणाची अंमलबजावणीच झालेली नाही, तर मग महाराष्ट्रामध्ये एवढा अट्टाहास का?
NEP 2020 मध्ये सांगितलेल्या सुधारणा प्रत्यक्षात आणण्यासाठी भारत सरकारने SARTHAQ नावाचा कृती आराखडा तयार केला आहे, ज्यामध्ये २९७ टास्क (कार्यसूची) निश्चित करण्यात आलेली आहेत. त्यातील काही टास्क्स तीन भाषा धोरणाशी थेट संबंधित आहेत.
या धोरणाला लागू होऊन पाच वर्षे झाली असली, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत संथगती आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राने पुढाकार घेत तीन भाषा धोरण प्रत्यक्ष शाळांमध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, हे निश्चितच एक सकारात्मक पाऊल मानलं पाहिजे.
म्हणूनच, महाराष्ट्रात याची सुरुवात होणं म्हणजे अट्टाहास नव्हे, तर धोरणात्मक बांधिलकी आणि राष्ट्रीय पुढाकाराचं प्रतीक आहे.
23. जर इयत्ता पहिली आणि दुसरीमध्ये तिसरी भाषा शिकवली, तर त्यासाठीची पुस्तके कशी असतील?
इयत्ता पहिली व दुसरीमध्ये तिसरी भाषा केवळ मौखिक स्वरूपात शिकवली जाणार असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी कोणतेही पाठ्यपुस्तक नसेल. वाचन-लेखनाची गरज नसल्याने, शिकवण हे प्रामुख्याने ऐकू येणाऱ्या अनुभवांवर आधारित असेल.
या उपक्रमासाठी शिक्षकांसाठी एक शिक्षक मार्गदर्शिका (Teacher Handbook) तयार केली जाईल, ज्यामध्ये बडबड गीते, गोष्टी, संवाद, व उपयोगी शब्दसंपदा यांचा समावेश असेल.
शिक्षक त्या मार्गदर्शिकेचा वापर करून विद्यार्थ्यांच्या कानावर तिसऱ्या भाषेचा संपर्क घडवून आणतील, जेणेकरून भाषेची सुरुवातीची ओळख आणि आकलन विकसित होईल.
24. तीन भाषा धोरणाबाबत अनेक राजकीय पक्ष, साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ विरोध करत आहेत. मग त्यांचा विरोध चुकीचा आहे का?
राजकीय पक्षांची भूमिका ही त्यांच्या राजकीय दृष्टीकोनावर आधारित असते, त्यामुळे त्यांच्या मतांवर मी टिप्पणी करणार नाही. मी केवळ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि त्याच्याशी संबंधित अधिकृत दस्तऐवजांमधील माहितीवर आधारित उत्तरं दिली आहेत.
सुकाणू समितीत काम करताना मला राज्यातील विविध समित्यांतील अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्या चर्चांमधून आणि संबंधित शासकीय कागदपत्रांवर आधारित विश्लेषणातूनच ही उत्तरं तयार करण्यात आली आहेत.
मी कुठेही माझं वैयक्तिक मत मांडलेलं नाही. NEP 2020 संदर्भात कमीत कमी ५ ते ६ अधिकृत दस्तऐवज, जसे की –
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण डॉक्युमेंट, NCF 2023 (National Curriculum Framework), SARTHAQ कृती आराखडा, SCF, पायाभूत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा इत्यादी
यांचा अभ्यास करूनच ही माहिती मांडण्यात आली आहे.
25. शिक्षणतज्ज्ञ व भाषा तज्ज्ञांचा हिंदी किंवा तीन भाषा धोरणास विरोध करणे चुकीचे आहे का?
नाही. विरोध करणे चुकीचे नाही, कारण त्यांच्या भूमिकेला काही ठोस व्यवहार्य आधार आहेत. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तिसऱ्या भाषेच्या अंमलबजावणीसाठी काही प्रॅक्टिकल अडचणी आहेत—उदा. काही ठिकाणी विद्यार्थ्यांची मातृभाषा स्पष्ट नाही, शिक्षकांची कमतरता आहे, पायाभूत सुविधा कमी आहेत, आणि आनंददायी व सकारात्मक शिक्षण वातावरणाचा अभाव आहे. त्यामुळे मुलांवर अनावश्यक ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तथापि, हे सगळे मुद्दे व्यवस्थापनाच्या अडचणी आहेत—धोरणविषयक विरोध नव्हे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार होताना एक व्यापक व समतोल विचार ठेवला जातो. त्यात भविष्यातील आदर्श दिशा डोळ्यासमोर असते. आणि महत्त्वाचं म्हणजे, सर्व स्तरांतून विरोध आहेच असंही नाही—अनेक शाळा, पालक आणि शिक्षक हे धोरण सकारात्मक दृष्टीने पाहत आहेत.
26. अनेक साहित्यिक सुद्धा तीन भाषा धोरणाला विरोध करत आहेत. त्यांचा विरोध योग्य आहे का?
साहित्यिकांचा विरोध हा संपूर्णपणे चुकीचा नाही, पण तो अपूर्ण माहितीवर आधारित आहे. सध्या माध्यमांमधून—विशेषतः टीव्ही, सोशल मीडिया, आणि काही निवडक पोस्टमधून—तीन भाषा धोरणाबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत.
जर कुणालाही असं सांगितलं गेलं की, “इयत्ता पहिल्यापासून हिंदी सक्तीने शिकवली जाणार आहे, आणि त्यासाठी मराठीचे तास कमी करण्यात येणार आहेत,” तर अशा परिस्थितीत कोणत्याही मराठीप्रेमी साहित्यिकांचा विरोध पूर्णतः योग्य ठरेल.
पण प्रत्यक्षात धोरणात असे कुठेही म्हटलेले नाही.
✓ तिसरी भाषा ही ऐच्छिक आहे,
✓ आठवड्याला केवळ ४–५ तासिकांपुरतीच मर्यादित आहे,
✓ आणि हिंदीसह २२ भारतीय भाषांमधून निवडीची मुभा आहे.
हे मुद्दे योग्य रीतीने समजावून सांगितले गेले असते, तर बहुतेक साहित्यिकांचा दृष्टिकोन अधिक समजूतदार झाला असता. त्यामुळे त्यांच्या भावना चुकीच्या नसल्या तरी गैरसमजामुळे तयार झालेला विरोध हा वास्तवावर आधारित नाही.