Mahatma Gandhi Jayanti | जगाला दिशा देणारा गांधी विचार

Mahatma Gandhi Jayanti |
Mahatma Gandhi Jayanti | जगाला दिशा देणारा गांधी विचार
Published on: 
Updated on: 

संदीप वाकचौरे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

मानवाचा माणूस होण्यासाठी त्याग, करुणा, सत्य आणि अहिंसेच्या कठोर वाटेवरून अखंड चालावे लागते. राष्ट्रपिता महात्मा गांधींंचा समग्र जीवनप्रवास या माणूसपणाच्या सर्वोच्च शिखराकडे जाणारा एक जिवंत आणि चालता-बोलता मार्ग होता. आजच्या काळात गांधीजींचे विचार आणि त्यांचे प्रत्यक्ष वर्तन हीच जगण्याला दिशा देणारी खरी आशा ठरते.

महात्मा गांधी यांचे संपूर्ण जीवन म्हणजे माणूसपणाच्या उंचीवरचा प्रवास होता. गांधीजींना कोणी महात्मा म्हणते, कोणी राष्ट्रपिता; तर काहींनी प्रेमभावाने देवत्व बहाल केले. पण गांधी यापलीकडे माणूस होते. त्यांच्यात माणूसपणाच्या संवेदना इतक्या ठासून भरल्या होत्या की, हा माणूस पृथ्वीवर जन्माला आला असेल यावर भविष्यकाळ विश्वास ठेवणार नाही, या शब्दांत आईन्स्टाईनने त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. एकाच वेळी प्रचंड लोकप्रियता आणि त्याच वेळी त्यांच्या विचारांचे शत्रूही. पण तरीसुद्धा या माणसाचा अखंड जीवनप्रवास माणूसपणाचाच होता. एखाद्या माणसावर लाखांवर पुस्तके लिहिली जावीत, हे त्यांच्या माणूसपणाची उंची अधोरेखित करणारे नाही का?

गांधीजींच्या जीवनात संघर्षाचे अनेक प्रसंग आले; मात्र त्यांनी कधीच त्या संघर्षाला हिंसेने उत्तर देण्यासाठी हात उगारला नाही. किंबहुना तसा विचारही त्यांच्या मनात डोकावला नाही. त्यांनी सातत्याने अहिंसेची पाऊलवाट चालणे पसंत केले. स्वतःला मारण्यासाठी माणसे आली, तरी हा माणूस आपल्या तत्त्वांवर निस्सीम प्रेम करत राहिला. त्यांनी त्या मारेकऱ्यांना देखील माफ केले. त्यामुळे गांधीजींची तुलना त्यांच्या प्रत्येक अनुभवानंतर कोणी संतांशी करत होते, तर कोणी ईश्वराशी करू पाहात होते. जगप्रसिद्ध नोबेल पुरस्कार विजेते रोमेन रोलॉ यांनी गांधीजींबद्दल बोलताना म्हटले होते, गांधी हे दुसरे येशू होते. परोपकार येशूइतकाच आहे. गांधीजींच्या समग्र जीवनप्रवासाकडे आपण पाहिले, तर प्रभू येशूंनी ज्या पद्धतीने क्रूसावर चढवणाऱ्यांना माफ केले, ती उदारता गांधीजींमध्ये देखील ठासून भरली होती.

गांधीजींच्या प्रत्येक व्यवहारात ती करुणा ठासून भरली होती. ही तुलना म्हणजे गांधीजींच्या जीवनप्रवासाची दिशा स्पष्ट करणारी आहे. रोमेन रोलॉ यांनी तेव्हा म्हटले होते, की निराशेच्या छायेत गांधी हीच आशा आहे; त्याचप्रमाणे वर्तमानात जात आणि धर्माच्या भिंती अधिक भक्कम उभ्या राहात आहेत. विषमता, द्वेष आणि मत्सर ठासून भरलेला असताना आज आपल्याला देखील गांधी हीच एकमेव आशा वाटते. आपला धर्म आणि त्याचे मोठेपण जगाने मान्य करावे म्हणून ते इतरांवर लादणे हा धर्माभिमान नाही. मुळात धर्माचे आचरण माणूसपणाच्या दृष्टिकोनातून करणे हे खरे धर्माचरण होते. म्हणूनच गांधीजींना अवघ्या जगात अनुयायी लाभले.

गांधीजींचा ‌‘मानव ते माणूस‌’ असा जीवनप्रवास जेथून अधोरेखित होतो, तो प्रसंग म्हणजे दक्षिण आफ्रिकेत रेल्वेतून त्यांचे साहित्य फेकून देणे. त्या घटनेनंतर रेल्वेस्थानकावर थंडीत कुडकुडत रात्र काढणे, त्यातून दोन हात करत संघर्षासाठी सत्याग्रहाचा मार्ग अनुसरणे आणि हिंसेपासून स्वतःला तसेच तेथील भारतीयांना दूर ठेवणे; हे त्या तरुणाच्या जीवनप्रवासाची दिशा स्पष्ट करणारे ठरले. गांधीजींवर दक्षिण आफ्रिकेत मीर आलम या पठाणाने गैरसमजातून हल्ला केला. ते बेशुद्ध पडले. मारेकऱ्यांना वाटले की, गांधीजी मरण पावले. ते घटनास्थळावरून पळून गेले. काही वेळाने गांधीजी शुद्धीवर आले. त्यांना कळले की, मीर आलम व त्याच्या सहकाऱ्यांना अटक केली आहे. खरे तर त्यांना अटक होणे कायदेशीरच होते. पण त्यांनी तत्काळ त्या मारेकऱ्यांना सोडून द्या, असा आदेश दिला. हे वर्तन संतांपेक्षा वेगळे होते का?

एकदा अशीच एक सभा सुरू होती. सभा संपल्यानंतर एकजण गांधीजींना आपल्याबरोबर व्यासपीठाच्या मागे घेऊन गेला. गांधीजी त्यांच्यासोबत बरेच पुढे गेले. चालता चालता त्यांच्याशी संवाद सुरू होता. अनेकांना कळत नव्हते की, ते दोघे नेमके का चालत आहेत. काही वेळाने गांधीजी पुन्हा माघारी फिरले. तेव्हा त्यांच्या हातात एक वस्त्र होते आणि त्या वस्त्रात काहीतरी वस्तू गुंडाळलेली होती. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्यांनी त्यांना विचारले, यात काय आहे? तेव्हा गांधीजी म्हणाले, यात पिस्तूल आहे. ते ऐकून उपस्थितांना धक्का बसला. उपस्थितांनी विचारले, कशासाठी आणले होते? गांधीजी म्हणाले, तो मला मारण्यासाठी आला होता. मग त्याच्या विरोधात तक्रार का केली नाही? यावर गांधीजींनी सांगितले, बोलता बोलता त्याचे मनपरिवर्तन झाले. तक्रार केली तर तो पुन्हा आणखी एक संधी शोधेल. गांधीजी माणूसपणाच्या किती उंचीवर होते, हे यावरून सहज लक्षात येईल. गांधीजींवर सुमारे चारवेळा प्राणघातक हल्ले झाले होते; पण त्यांनी कधीच मारेकऱ्यांविषयी तक्रार केली नाही. मीर आलम पुढे गांधीजींचे प्राण वाचवण्यासाठी धावून आल्याचे चित्र अनुभवास मिळते.

भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा नोआखलीत दंगल उसळली होती. धर्मभेदाच्या भिंती घट्ट झाल्या होत्या. गांधीजी ती आग शमवण्यासाठी तेथे अनवाणी पायांनी फिरत होते. गांधीजी मुस्लिम-हिंदू समूहाला भेटत होते; मात्र दोन्ही समूहांमध्ये ठासून द्वेष होता आणि दोन्ही समूह गांधीजींना आपले न मानता समोरच्या समूहाचे प्रतिनिधी मानत होते. त्यातच त्यांचा द्वेष करणारे लोक त्यांच्या वाटेवर विष्ठा टाकत होते. अपमान आणि त्रास होत असतानाही आपल्या कामावरील श्रद्धेपासून दूर न जाता, कोणाचाही मत्सर न करता ते सतत कार्यरत राहिले. आपण काय करत आहोत, याची त्यांना पूर्णतः जाणीव होती. गांधीजींच्या जीवनप्रवासात त्यांच्या शत्रूंचे देखील मनपरिवर्तन त्यांच्या सहवासाने आणि विचारांनी होत होते. मुळात सहवासात आल्यानंतर व्यक्तीचे परिवर्तन होणे, म्हणजेच त्यांच्या वर्तनात त्यांच्या विचारांचे प्रतिबिंब उमटणे होय. गांधीजी अखंडपणे निर्मळतेने जीवन जगत होते. आपल्याला जे काही साध्य करायचे आहे, त्यासाठी साधनदेखील शुद्ध असायला हवे, असा त्यांचा आग्रह होता. गांधीजींची साध्यता ज्या उंचीवर दिसते, त्याचे कारण त्यांनी जीवनभर वापरलेली साधने हेच होते. इंग्रज राजसत्ता कितीही हिंस्त्र आणि वाईट असली तरी त्यासाठी त्यांनी अहिंसेचा विचार करत सत्याग्रह, सविनय कायदेभंग, मिठाचा सत्याग्रह या साधनांचा अवलंब केला. ही साधने कितीतरी साधी होती. पण त्या साधनांची शुद्धता कोणीही नाकारू शकत नाही.

गांधीजींच्या अंतःकरणात कधीच कोणाबद्दलही द्वेष नव्हता. त्यांना कशाचाही मोह देखील नव्हता. उलट ते सतत म्हणायचे, आपण विश्वस्त आहोत, आपल्यावर काही जबाबदारी आहे. त्यामुळे आश्रमात जेवणासाठी भोपळा किंवा ज्या स्वस्त भाज्या मिळतील त्या आणून खाण्याकडे त्यांचा कल असायचा. आश्रमातील लोक वैतागायचे. पण गांधीजींनी मात्र पैसे खर्च करण्यावर निर्बंध कायम ठेवले. आपल्याकडे पैसे अधिक असले तरी त्या पैशांवर गरिबांचा देखील अधिकार आहे. त्यामुळे आपण श्रीमंत असलो तरी त्या पैशांवर आपली एकट्याची मालकी नाही हे लक्षात घ्यायला हवे, अशी त्यांची शिकवण होती. आपल्या प्रत्येक कृतीत गांधीजींसोबत सामान्यांचा विचार असायचा.

गांधीजी जीवनभर सामान्य माणसासारखे जगत राहिले. त्यांनी महात्मापणाचे ओझे कधीच मस्तकावर घेतले नाही. आश्रमात ते स्वतःचे काम स्वतः करण्याकडे लक्ष द्यायचे. भाजी चिरणे असो वा स्वच्छता करणे असो, ते स्वतःच काम करत. त्यांचे महात्मापण हे त्यांच्या सामान्य वागण्यात दडलेले होते. लोकांनी त्यांचा विरोध केला, त्यांच्यावर टीका केली, तरी ते प्रत्येकावर प्रेमच करत राहिले. त्यामुळे गांधीजी माणूसपणाच्या एका उत्तुंग उंचीवर होते हे विसरता येत नाही. ती दृष्टी जर सर्वांना लाभली, तर हे जग निश्चितच शांततेच्या वाटेने चालत राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news