

कोल्हापुरातील एका मठामध्ये महादेवी नावाची हत्तीण सांभाळली जात होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नुकतीच तिची रवानगी जामनगर गुजरात येथील अंबानी यांच्या वनतारा या ठिकाणी केली. या हत्तिणीवर वनतारामध्ये उपचार सुरू आहेत आणि तिला नैसर्गिक अधिवासामध्ये ठेवले आहे. इतक्या वर्षांची सवय असलेली ही 36 वर्षांची हत्तीण स्थलांतरित केल्यानंतर जनक्षोभ वाढला आणि तिला परत आणावे, अशी मागणी होऊ लागली. या निमित्ताने आपण हत्ती या प्राण्याविषयी अधिक माहिती घेऊयात.
आपल्याला हत्तीची ओळख सर्वात प्रथम गणरायाच्या रूपात होते. दोन वेगळ्या प्रजातींमधील एकत्र आलेले गणराय ही एक आगळीवेगळी देवता आहे. गणरायाचे शरीर मानवी आहे; परंतु मस्तक मात्र हत्तीचे आहे. हत्तीची सोंड अत्यंत ताकदवर असते आणि सोंडेत उचलून कित्येक टन वजनाची लाकडे हत्ती सहज इकडून तिकडे नेऊन ठेवत असतात. जंगलाच्या रक्षणासाठी गस्त घालणारे वनरक्षक हत्तीवर बसून गस्त घालतात. हत्ती या प्राण्याला जंगलात कुणापासूनही धोका नाही. त्याचे महाकाय शरीर पाहून वाघ आणि सिंह हे हिंसक प्राणीसुद्धा हत्तीच्या नादी लागत नाहीत.
हत्ती हा पृथ्वीवरील सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे. तो बुद्धिमान आणि सामाजिक प्राणी मानला जातो. हत्तींचे सरासरी आयुष्य 60 ते 70 वर्षे असते. काही हत्ती 75 वर्षांपर्यंत जगलेलेही आढळले आहेत. योग्य संगोपन, अन्न, पाणी आणि आरोग्यसेवा मिळाल्यास हत्ती दीर्घायुष्य उपभोगू शकतो.
हत्ती मादीचा लैंगिक प्रौढत्वाचा कालावधी सुमारे 10 ते 15 वर्षांच्या दरम्यान सुरू होतो. ती प्रजननक्षम झाल्यानंतरच गर्भधारणेस पात्र होते. हत्तीची गर्भधारणा ही सर्व सस्तन प्राण्यांमधील सर्वात दीर्घकालीन गर्भधारणा मानली जाते. हत्ती मादीचा गर्भधारणेचा कालावधी सुमारे 22 महिने म्हणजेच 660 दिवसांपर्यंत असतो. हे अत्यंत विलक्षण आणि जैविकद़ृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण आहे.
हत्ती मादीचे बाळंतपण होते आणि ती एकाच पिलाला जन्म देते. अपवादाने जुळी पिले होण्याची शक्यता असते; पण हे फारच दुर्मीळ आहे. जन्माच्या वेळी हत्तीचे पिलू सुमारे 90 ते 120 किलो वजनाचे असते आणि उभे राहून आईच्या स्तनपानासाठी तयार होण्यास त्याला अवघे काही तास लागतात. आई हत्तीण आपल्या पिलाचे अतिशय काळजीपूर्वक संगोपन करते. पिलाला 2 ते 3 वर्षे दूध पाजले जाते; पण ते लवकरच गवत आणि फळेही खायला लागते. हत्ती मादीला दरवेळी गर्भधारणेनंतर पुढील गर्भासाठी 3 ते 5 वर्षांचे अंतर आवश्यक असते. त्यामुळे त्यांच्या प्रजनन दराची गती खूपच कमी आहे. त्यामुळे हत्तींच्या संख्येत घट झाली, तर त्यांच्या पुनरुत्पादनासाठी बराच काळ लागतो. हत्तींच्या संवर्धनासाठी हे एक महत्त्वाचे आव्हान आहे.