कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरला व्हावे, याकरिता दै. ‘पुढारी’ने सातत्याने केलेला पाठपुरावा आणि याबाबत घेतलेली ठाम भूमिका यशस्वी झाली आहे. या ऐतिहासिक यशाचे खरे मानकरी डॉ. प्रतापसिंह जाधवच आहेत, अशा भावना ‘क्रेडाई’च्या वतीने व्यक्त करण्यात आल्या. सर्किट बेंच मंजूर झाल्याबद्दल दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे ‘क्रेडाई’च्या वतीने मंगळवारी अभिनंदन करण्यात आले. सर्किट बेंचमुळे कोल्हापूरच्या विकासाला गती येणार आहे, या संधीचे सोने करा, असे आवाहन डॉ. जाधव यांनी यावेळी केले.
‘क्रेडाई’ कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज डॉ. जाधव यांची ‘पुढारी’च्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने डॉ. जाधव यांच्याशी शहराच्या विकासाबाबत चर्चा केली. यावेळी उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, सचिव गणेश सावंत, संचालक संदीप सावंत, संदीप पवार, गौतम परमार, संग्राम दळवी, चेतन चव्हाण, सुनील चिले, आदित्य बेडेकर, मौतिक पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. जाधव म्हणाले, कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर आणि कोकणातील जिल्ह्यांची उच्च न्यायालयाशी संबंधित सर्व कामे आता कोल्हापुरातच येणार आहेत. यामुळे मोठ्या संख्येने वकील, पक्षकार आणि संबंधित व्यावसायिक कोल्हापुरात स्थलांतरित होतील किंवा त्यांचे येणे-जाणे वाढेल. मुंबईच्या फोर्ट परिसराप्रमाणे कोल्हापुरातही ‘फ्लोटिंग पॉप्युलेशन’ वाढणार आहे. याचा थेट फायदा व्यापार, हॉटेल आणि बांधकाम व्यवसायाला होईल. कोल्हापुरातील उलाढाल वाढणार आहे, इतकेच नाही तर अगदी रिक्षाचालकांनाही त्याचा फायदा होणार आहे. येत्या दोन वर्षांत व्यावसायिक आणि निवासी जागांची गरज प्रचंड वाढणार आहे, त्यासाठी आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे.
शहराच्या विकासातील प्रमुख अडथळा ठरलेल्या पूररेषेच्या फेरआखणीबाबत यावेळी चर्चा झाली. डॉ. जाधव म्हणाले, महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारमध्ये पूरनियंत्रणासाठी समन्वय समिती स्थापन झाली आहे, त्यामुळे आता पूर्वीसारखी महापुराची परिस्थिती उद्भवणार नाही. त्यामुळे पूररेषेची फेरआखणी करण्यास काहीच हरकत नाही. नदीकाठची कंटूर रचना आणि प्रत्यक्ष पूररेषा यातील फरक अभ्यासल्यास शहराला विकासासाठी अतिरिक्त 300 ते 400 एकर जागा मिळू शकते. पुण्यात ‘ब्ल्यू लाईन’मध्ये रस्त्यांना परवानगी दिली जाते, तशी कोल्हापुरात का नाही? यावरही विचार व्हायला हवा. यासाठी पाठपुरावा करत आसल्याचेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूरच्या विमानसेवेबाबत बोलताना ते म्हणाले, ‘कोल्हापूर-मुंबई विमानसेवेला मोठी मागणी आहे. विमानतळ संचालकांनी मुंबईसाठी स्लॉट मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्याचा आग्रह केला आहे. लवकरच सुरू होणार्या नवी मुंबई विमानतळावर कोल्हापूरसाठी स्लॉट मिळवणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो आणि त्यासाठीही निश्चितपणे पाठपुरावा करू,’ असेही डॉ. जाधव यांनी सांगितले.
शहरातील पायाभूत सुविधांवर बोट ठेवत डॉ. जाधव यांनी खंत व्यक्त केली. ‘सर्किट बेंचमुळे सहा जिल्ह्यांतील लोकांचा राबता वाढणार आहे; पण शहरातील रस्त्यांची सध्याची दुर्दशा कोल्हापूरसाठी भूषणावह नाही. कोल्हापूर जिल्हा शासनाला मोठा कर देतो; पण त्या तुलनेत विकासासाठी निधी मिळत नाही. आता कोल्हापूरला उत्पन्नाच्या प्रमाणात विकासाचा वाटा मिळालाच पाहिजे, यासाठी ‘पुढारी’ आग्रही आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.