

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे 68 (गट) आणि पंचायत समितीचे 136 (गण) मतदार संघ 18 ऑगस्ट रोजी अंतिम होणार आहे. याकरिता दाखल 141 हरकतींवर मंगळवारी पुणे विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी पूर्ण झाली. सुनावणी केलेल्या युक्तिवादावर दि. 11 ऑगस्टपर्यंत निर्णय घेतला जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या 68 आणि पंचायत समितीचे 136 प्रारूप मतदार संघ दि. 14 जुलैला जाहीर केले होते. त्यावर दि. 21 जुलैअखेर हरकती मागवल्या होत्या. या कालावधीत जिल्हा परिषदेच्या मतदारसंघावर 128 आणि पंचायत समितीच्या मतदार संघाबाबत 13 हरकती दाखल झाल्या होत्या. या हरकती जिल्हाधिकार्यांच्या अभिप्रायासह विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आल्या होत्या. या हरकतींवर मंगळवारी सकाळी 11 वाजता सुनावणीला सुरुवात झाली. एकाच मतदारसंघाबाबत एकाच पद्धतीच्या वेगवेगळ्या नागरिकांकडून हरकती आल्या होत्या. या हरकती एकत्र करून त्यावर एकत्रित सुनावणी घेण्यात आली. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सुनावण्या दुपारी तीन वाजेपर्यंत पूर्ण झाल्या. जिल्हा प्रशासनाच्या वतीने महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी यांच्यासह संबधित मतदारसंघाचे तहसीलदारही उपस्थित राहून हरकतींवर प्रशासनाची बाजू मांडली.
कागलमध्येही एक मतदारसंघ नव्याने अस्तित्वात आल्याने अन्य मतदारसंघांच्या रचनेवर काहीसा परिणाम झाल्याने या तालुक्यातूनही जिल्हा परिषदेच्या मतदारसंघावर 9, तर पंचायत समितीच्या मतदारसंघाबाबत एक हरकत आली होती. आजरा तालुक्यातील एक मतदारसंघ घटला आहे. परिणामी, या तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघासाठी 6, तर पंचायत समिती मतदारसंघावर 3 हरकती आल्या होत्या. त्यावर रद्द केलेला मतदारसंघ पुन्हा निर्माण करा, अशी मागणी यावेळी हरकतदारांनी केली. चंदगड व राधानगरी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघाबाबत प्रत्येकी 2, भुदरगड तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघाबाबत 2, तर शिरोळ आणि पन्हाळा तालुक्यातून जिल्हा परिषद मतदारसंघाबाबत आलेल्या प्रत्येकी एका हरकतीवर सुनावणी झाली.