

पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा आराखडा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. देशातील विरोधी पक्षांची राजकीय विश्वासार्हता, भाजपच्या संघटनात्मक ताकदीची व्याप्ती आणि २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तयार होणारे राजकीय वातावरण यांची लिटमस टेस्ट म्हणून हे निकाल महत्त्वाचे ठरणार आहेत. उत्तर प्रदेशातील ४०३ जागा, पंजाबमधील ११७, उत्तराखंडमधील ७०, मणिपूरमधील ६० आणि गोव्यातील ४० जागा अशा एकूण ६९० जागांसाठी हा सामना होईल. या पाचपैकी चार राज्यांत भाजप सरकार आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष सत्तेत आहे. त्यामुळे विरोधकांसमोर एक सक्षम राजकीय पर्याय उभा करण्याचे आव्हान आहे. सत्ताधाऱ्यांविरोधातील नाराजीचा मुद्दा हाती घेतला, तरी त्याचे मतांमध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक संघटनात्मक ताकद, नेतृत्व आणि एकजूट विरोधकांत कितपत आहे, हा खरा प्रश्न आहे. सर्वांत महत्त्वाची लढत उत्तर प्रदेशात असेल. देशाच्या लोकसभेत सर्वाधिक ८० खासदार पाठवणाऱ्या या राज्यातील निकालांचा राष्ट्रीय सत्तेच्या समीकरणांवर थेट परिणाम होतो. उत्तर प्रदेशच्या राजकारणात मायावती, मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव यांनी वेगवेगळ्या सामाजिक समीकरणांच्या आधारे सत्ता मिळवली.
१९९० च्या दशकात मंडल आणि कमंडल राजकारणाने राज्याचे राजकीय चित्र बदलले. बहुजन समाज पक्षाने दलित मतांचे संघटन केले, तर समाजवादी पक्षाने यादव-मुस्लिम मतांच्या समीकरणातून प्रभाव निर्माण केला. भाजपने मात्र या पारंपरिक समीकरणांच्या पलीकडे जाऊन व्यापक हिंदुत्व, विकास आणि लाभार्थी वर्गाचे राजकारण उभे केले. नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाने या राजकीय विस्ताराला बळ दिले. २०२२ मध्ये भाजपने २५५ जागा जिंकल्या होत्या. मित्रपक्षांसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा आकडा २७३ वर पोहोचला होता. समाजवादी पक्षाला १११ जागा मिळाल्या होत्या. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने ३७ जागा जिंकल्यामुळे अखिलेश यादव यांना राजकीय पुनरागमनाची आशा वाटते. तथापि, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे राजकीय गणित वेगळे असते. विधानसभा निवडणुकीत स्थानिक उमेदवार, जातीय समीकरणे, प्रशासन, कायदा-सुव्यवस्था आणि मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अधिक निर्णायक ठरतो. योगी आदित्यनाथ यांची विकासाभिमुख प्रशासकीय प्रतिमा, कायदा-सुव्यवस्थेबाबतची भूमिका, पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक, एक्स्प्रेस वे, विमानतळ आणि धार्मिक पर्यटनाचा विस्तार यांसह अनेक जमेच्या बाजू आहेत.
अयोध्येतील राममंदिर, काशी विश्वनाथ धाम आणि धार्मिक पर्यटनाच्या विकासामुळे उत्तर प्रदेशच्या सांस्कृतिक राजकारणाला नवे परिमाण मिळाले आहे. दुसरीकडे अखिलेश यादव यांच्याकडे विरोधी मतांचे ध्रुवीकरण करण्याची क्षमता आहे; मात्र काँग्रेसबरोबरची आघाडी, जागावाटप आणि उमेदवार निवडीतील समन्वय ही आव्हाने कायम आहेत. उत्तर प्रदेशात दलितांचे प्रमाण सुमारे २१ टक्के, तर मुस्लिमांचे प्रमाण १९ टक्के आहे. बहुजन समाज पक्षाची भूमिका आणि मायावतींच्या स्वतंत्र राजकीय रणनीतीचाही निकालावर कितपत परिणाम होईल हे पहावे लागेल. असदुद्दीन ओवैसी यांच्या ‘एमआयएम’ने आणि खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पक्षाने ‘सामाजिक परिवर्तन मोर्चा’ची स्थापना केली आहे. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून आझाद यांच्या नावाची घोषणा ओवैसी यांनी केली.
या आघाडीमुळे विरोधकांच्या मतांचे विभाजन होणार आहे. विशेषतः समाजवादी पक्षापुढील अडचणी वाढू शकतात. सपा, बसपा आणि सामाजिक परिवर्तन मोर्चा यांच्यात स्पर्धा होईल. कमी मताधिक्याने निकाल लागणाऱ्या मतदारसंघांमध्ये दोन-तीन टक्के मतांचे विभाजनही निर्णायक ठरू शकते. पंजाबमध्येही राजकारण ढवळू लागले आहे. दिल्लीतील यशाच्या जोरावर आम आदमी पक्षाने पंजाबात गतनिवडणुकीत ११७ पैकी ९२ जागा जिंकल्या. काँग्रेसला १८, अकाली दलाला तीन आणि भाजपला दोन जागा मिळाल्या. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सरकारची आता कसोटी असेल. पंजाबची आर्थिक स्थिती, शेतीवर अवलंबित्व, अमली पदार्थांचा प्रश्न, औद्योगिक गुंतवणूक या प्रश्नांवर सरकारची कामगिरी तपासली जाईल. काँग्रेससाठी ही संधी असली तरी नेतृत्वाचा निर्णय घेण्यात होणारा विलंब आणि अंतर्गत गटबाजीमुळे मतदारांत संभ्रम निर्माण होतो. दिल्लीतील आपचा पराभव, ओसरलेला केजरीवालांचा करिष्मा आणि भाजप-अकाली दल युती पंजाबचा निकाल पालटणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे. अकाली दलाच्या पारंपरिक ग्रामीण आधाराचा आणि भाजपच्या शहरी संघटनात्मक प्रभावाचा योग्य मेळ बसला, तर पंजाबच्या राजकारणात नवे समीकरण तयार होऊ शकते.
उत्तराखंडमध्ये २०२२ मध्ये भाजपने ७० पैकी ४७ जागा जिंकून सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवली. पुष्करसिंह धामी यांच्यासमोर आता तिसऱ्यांदा विजय मिळवण्याचे आव्हान असेल. राष्ट्रीय सुरक्षा, रस्ते, पर्यटन, धार्मिक तीर्थक्षेत्रांचा विकास आणि पायाभूत सुविधा हे भाजपचे महत्त्वाचे मुद्दे ठरू शकतात. समान नागरी कायद्याची अंमलबजावणी ही प्रचाराचा विषय असेल. काँग्रेस बेरोजगारी, पर्यावरणीय संकट, स्थलांतर, प्रशासनातील त्रुटी यांवरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे; मात्र मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आणि संघटनात्मक एकजूट याबाबत गोंधळाची स्थिती आहे. मणिपूरची निवडणूक वेगळ्या पार्श्वभूमीवर होईल. २०२३ पासून मैतेई-कुकी संघर्षाने राज्याच्या सामाजिक रचनेला धक्का दिला. हजारो नागरिकांचे विस्थापन, जीवितहानी, सामाजिक दरी यामुळे प्रशासनासमोर कठीण प्रश्न उभे राहिले.
फेब्रुवारीत राष्ट्रपती राजवट संपून युमनाम खेमचंद सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार पुन्हा स्थापन झाले. त्यामुळे भाजपला शांतता, पुनर्वसन, सुरक्षितता आणि सर्व समुदायांचा विश्वास संपादन करण्याच्या कसोटीवर उतरावे लागेल. काँग्रेसला सरकारविरोधी नाराजीचा फायदा घेता येऊ शकतो. गोव्यात २०२२ मध्ये भाजपने २० जागा जिंकल्या होत्या. बहुमतासाठी एक जागा कमी असूनही मित्रपक्ष आणि अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केले. त्यानंतर काँग्रेसमधील आठ आमदार भाजपमध्ये दाखल झाल्याने विधानसभेतील भाजपचे संख्याबळ वाढले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सरकारविषयी मतदारांमध्ये समाधान आहे. काँग्रेस, आप आणि इतर प्रादेशिक पक्षांमुळे पुन्हा विरोधी मतांचे विभाजन होऊ शकते. एकुणात, आजघडीला भाजपकडे नेतृत्व, संघटना आणि सत्तेतील चार राज्यांचा अनुभव अशी महत्त्वाची राजकीय ताकद आहे. विरोधकांनी ही दरी भरून काढली नाही, तर भाजपला रोखणे त्यांच्यासाठी कठीण ठरू शकते.