

भारतीय वंशाचे अंतराळशास्त्रज्ञ अमित क्षत्रिय यांची अमेरिकन अवकाश संशोधन संस्था ‘नासा’मध्ये सर्वोच्च नागरी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याचे वृत्त केवळ भारतीय समुदायासाठी नव्हे, तर संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरावे असे आहे. विस्कॉन्सिन येथे भारतीय स्थलांतरित कुटुंबात जन्मलेल्या या तरुणाने कष्ट, प्रामाणिकपणा आणि दूरद़ृष्टी यांचा आधार घेत अवकाश संशोधन क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे.
जगदीश काळे
नासामध्ये दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या अमित क्षत्रिय यांनी ‘मून टू मार्स’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे नेतृत्व करताना कौशल्याची छाप पाडली होती. त्यांना आता नासाच्या 10 प्रमुख केंद्रांबरोबरच विविध मिशन डायरेक्टरेटस्चे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवली आहे. मानवजातीच्या भविष्यासाठी अवकाश प्रवासाचे नवे क्षितिज खुले करण्याचे त्यांचे ध्येय आहे.
आज अमेरिका आणि चीन यांच्यात अंतराळ क्षेत्रातील स्पर्धा नव्या टप्प्यावर पोहोचली आहे. चंद्रावर पुन्हा मानवाला पोहोचविण्याचे, तसेच त्यानंतर मंगळावर मोहीम राबविण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. या सर्व योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नासाच्या नेतृत्वात अमित क्षत्रिय यांची उपस्थिती मोठी महत्त्वाची ठरणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ‘नासा’चे विद्यमान प्रशासक सीन पी. डफी यांना हे ठाऊक आहे की, वैज्ञानिक द़ृष्टीने समृद्ध, कणखर आणि सुस्पष्ट विचार असलेला नेता हाच संस्थेला यशाकडे नेऊ शकतो. त्यामुळेच एकीकडे निर्वासितांविरोधात कडक धोरणे आखणार्या ट्रम्प यांनी अनिवासी भारतीय असूनही अमित यांची निवड केली.
आज जेव्हा ‘नासा’ आर्टेमिस मोहिमेंतर्गत चंद्रावर पुन्हा मानवाला पाठवण्याची तयारी करत आहे, तेव्हा अमित यांचे नेतृत्व निर्णायक ठरणार आहे. मंगळ मोहिमेची तयारी ही केवळ अमेरिकेची नव्हे, तर संपूर्ण मानवजातीची महत्त्वाकांक्षा आहे. या प्रवासात विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य या सर्व बाबींचा संगम होणार आहे.
अशावेळी एका भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाची भूमिका केवळ कौतुकास्पदच नाही, तर प्रेरणादायीदेखील आहे. माहिती-तंत्रज्ञान, संशोधनाच्या क्षेत्राबरोबरच भारतीय वंशाच्या लोकांनी जागतिक राजकारणातही आपला ठसा उमटवला आहे. सद्यस्थितीत जगभरातील 29 देशांमध्ये 261 जण लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. यामध्ये ब्रिटन, मॉरिशस, फ्रान्स, अमेरिका आदी प्रमुख आहेत. सरकारकडून राज्यसभेत दिलेला हा आकडा जागतिक स्तरावर भारतीय प्रवाशांच्या वाढत्या राजकीय प्रभावाचे दर्शन घडवतो. जगातील इतर देशांमध्ये 3.43 कोटींपेक्षा अधिक भारतीय वास्तव्य करतात.
राज्यसभा सदस्य सतनाम सिंह संधू यांच्या प्रश्नावर परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंग यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली. सिंग यांनी उत्तरासोबत 29 देशांची सूचीही दिली. यामध्ये भारतीय वंशाच्या लोकप्रतिनिधींची संख्या देशनिहाय नमूद केली. या यादीप्रमाणे मॉरिशसमध्ये सर्वाधिक 45 भारतीय वंशाचे लोक निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत.
भारतीय वंशाचे नवीन रामगुलाम मॉरिशसचे पंतप्रधान आहेत. त्याचप्रमाणे गुयाना येथे भारतीय वंशाचे 33 लोक लोकप्रतिनिधी आहेत. ब्रिटनमध्ये 31, फ्रान्समध्ये 24, सुरीनाममध्ये 21, त्रिनिदाद व टोबॅगोमध्ये 18 आणि फिजी व मलेशिया येथे भारतीय वंशाच्या लोकप्रतिनिधींची संख्या 17-17 आहे. अमेरिकेत भारतीय वंशाचे सहा लोक लोकप्रतिनिधी आहेत. जगभरात विखुरलेल्या भारतीयांच्या योगदानाला कोणाही देशाला नाकारता येणार नाही. ट्रम्प यांनी अमित यांची केलेली निवड हेच सांगून जाणारी आहे.