Congress : काँग्रेसला धडा!

Congress
Congress

तेरा राज्यांतील राज्यसभेच्या जागांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी, तर उर्वरित जागांचा 3 एप्रिल रोजी संपणार आहे. विविध राज्यांतील एकूण 56 जागा रिक्त असून, त्यापैकी आंध—, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि राजस्थान येथील 41 जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय आयटीमंत्री अश्विनी वैष्णव, सोनिया गांधी, मिलिंद देवरा, अशोक चव्हाण तसेच प्रफुल्ल पटेलांसह अनेक नेते बिनविरोध निवडून आले. आता त्यानंतरच्या टप्प्यातील उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश व कर्नाटक या तीन राज्यांतील 15 जागांसाठी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपने 'इंडिया'ला चांगलाच धक्का दिला. राज्यसभा निवडणुका या अर्थातच अप्रत्यक्ष निवडणुका असतात. परंतु, त्यामुळे एक वातावरण तयार होते आणि विरोधकांवर मनोवैज्ञानिक दबावही आणता येतो. सभागृहातील बलाबल राजकीय पक्षांना विशेषत: सत्ताधार्‍यांच्या कामी येत असते. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असून, त्या पार्श्वभूमीवर भाजपचा आत्मविश्वास वाढण्यास या विजयाची मदत होणार असे दिसते. (Congress)

2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजप 370 आणि एनडीए आघाडी 400 पेक्षा जास्त जागा मिळवेल. उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व म्हणजे लोकसभेच्या 80 जागा आम्ही जिंकू आणि यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे डिपॉझिटही जप्त होईल, असा दावा भाजपकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता कर्नाटकात चार जागांसाठी झालेल्या लढतीत काँग्रेसचे तीनही उमेदवार अपेक्षेप्रमाणे निवडून आले आहेत. ऐनवेळी जनता दलाने (सेक्युलर) उमेदवार उभा केल्यामुळे तिरंगी लढत झाली; परंतु जनता दलाच्या डी. कुपेंद्र रेड्डी यांना मत देण्याचे पक्षादेश डावलून, भाजपचे आमदार शिवराम हेब्बर ऐनवेळी गैरहजर राहिले, तर भाजपच्या आणखी एकाने काँग्रेसला थेट मतदानच केले. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे मोठे उद्योगपती असून, त्यांनी आपले बळ या उमेदवारांमागे लावले.

भाजप आणि जेडीएस यांची अधिकृतपणे आघाडी असून, भाजपनेच मताची फाटाफूट व्हावी म्हणून जेडीएसला आपला उमेदवार उभा करण्यास सांगितले असणार. परंतु, कर्नाटकात या हिकमती यशस्वी झालेल्या दिसत नाहीत. उत्तर प्रदेशातील संख्याबळानुसार, भाजपचे दहापैकी सात उमेदवार सहज निवडून येत होते. आठव्या जागेसाठी संख्याबळ नसतानाही संजय सेठ यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु, मतदानापूर्वीच राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीचे मुख्य प्रतोद आणि रायबरेलीमधील उच्चाहार मतदारसंघाचे आमदार मनोज पांडे यांनी 'वैयक्तिक कारणा'साठी प्रतोदपदाचाच राजीनामा दिला. त्यांच्यासह किमान सात सपा आमदारांनी भाजपला मतदान केले. त्यामुळे भाजपचा आठवा उमेदवारही निवडून आला. भाजपच्या विजयी उमेदवारांत पक्ष प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, अलीकडेच काँग्रेसमधून भाजपत आलेले आणि एकेकाळचे राहुल गांधींचे निकटवर्तीय आरपीएन सिंह यांचा समावेश आहे.

समाजवादी पक्षाच्या विजयी उमेदवारांत जया बच्चन यांचा समावेश असून, त्या पाचव्यांदा राज्यसभेवर निवडून जात आहेत. वास्तविक यावेळी श्रीमती बच्चन यांना पक्षातून विरोध होता. एकाच व्यक्तीला पुन्हा पुन्हा खासदारपद देणे चुकीचे असून, अखिलेश यादव ज्या 'पीडीए'चा (पिछडे, दलित, अल्पसंख्याक) पुरस्कार करतात, त्या गटात जया यांचा समावेश होत नाही. परंतु, त्या मुलायमसिंग यादव यांच्यापासून या कुटुंबाच्या जवळच्या व्यक्ती आहेत आणि त्याचप्रमाणे महिला आमदारांची मते त्या खेचून आणतात. त्यांना सर्वाधिक मते मिळाली असल्याचे खरे असले, तरी एवढे सगळे असूनही अखिलेश पक्षातील फुटिरांना रोखू शकले नाहीत. सपाच्या काही आमदारांनी 'अंतरात्मा की आवाज को व्होट करना हैं' असे आधीच सांगितले होते, तर सपाच्या आणखी एका आमदाराने, 'भगवान राम हमारे आराध्य हैं, हम तो उन्हीं के कुल-खानदान के हैं, असे सूचक उद्गार काढले होते; मात्र नुकतीच उत्तर प्रदेशात राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आली असताना अखिलेश त्यात सामील झाले होते आणि उत्तर प्रदेशात इंडिया आघाडी मजबूत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्यानंतर राज्यसभेत मात्र सपाचे तोंड भाजले. हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या सहा आणि तेथील सुखविंदरसिंग सुक्खू सरकारला पाठिंबा देणार्‍या तीन अपक्ष आमदारांचाही अंतरात्मा जागरूक झाल्यामुळे भाजपचे हर्ष महाजन आणि काँग्रसेचे अभिषेक मनू सिंघवी यांना समान मते पडली. नंतर चिठ्ठ्या टाकून महाजन विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. (Congress)

महाजन यांनी दोन वर्षांपूर्वीच काँग्रेसचा त्याग करून भाजपत प्रवेश केला होता. सिंघवी हे 'बाहेरचे' उमेदवार असल्यामुळे त्यांना विरोध होता. शिवाय मुख्यमंत्री सुक्खू यांची कार्यशैली पसंत नसल्याचीही तक्रार होती; मात्र मुख्य म्हणजे, हिमाचल प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांचे चिरंजीव विक्रमादित्य सिंग आणि पत्नी व काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंग यांचा सुक्खू यांना प्रथमपासूनच विरोध राहिला आहे. हिमाचल विधानसभा निवडणुकांत काँग्रेसचा विजय झाल्यानंतरच मुख्यमंत्रिपदाची इच्छा असल्याचे प्रतिभा यांनी बोलून दाखवले होते. मुख्यमंत्रिपद न मिळाल्यापासून अस्वस्थ असलेल्या श्रीमती प्रतिभा यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या, हे स्पष्ट आहे. काँग्रेसला घराणेशाहीने ग्रासले असून, हिमाचलवर राज्य करण्याचा मक्ता आपल्याला मिळाला असल्याचे वीरभद्र सिंग यांच्या कुटुंबाला वाटत असावे. सुक्खू यांनी आनंद शर्मा यांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी, असे सुचवले होते. सिंघवी यांच्या पराभवामागे तोही एक घटक असावा. परंतु, हिमाचलमध्ये काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशीच लढत झाल्याचे स्पष्टपणे दिसते. आता हिमाचलमधील काँग्रेस सरकार धोक्यात आले आहे. निवडणुका तोंडावर आल्या, तरी पक्षांतर्गत संघर्ष आम्ही संपवणार नाही, हेच काँग्रेसच्या नेत्यांनी दाखवून दिल्याचे राज्यसभा निवडणूक निकालाने स्पष्ट केले आहे. पक्ष त्यापासून कोणता धडा घेणार?

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news