वर्दी आणि संधी | पुढारी

वर्दी आणि संधी

कसा झाला इंटरव्ह्यू? प्रथमेश, मी काय विचारतोय? इंटरव्ह्यू कसा झाला?
मी गेलोच नाही आजोबा.
काय रे हे? तुझ्या नोकरीसाठी मी जाईन तिथे शब्द टाकतोय आणि तू असा वागतोयस. आम्ही काय डोकी फोडायची तुमच्यापुढे?
पहिल्यापासून मी काय सांगतोय आजोबा? मला अशी दुकानात आणि छोट्या ऑफिसात नोकरी करायचीच नाहीये. मी आपला वर्दीत जाणार.
जाणार कबूल; पण कधी? बेकारीचं तिसरं वर्षं चाललंय सोन्या तुझं!

असू दे बेकार. एकदा वर्दी चढवली की, पहिल्या चार-सहा महिन्यांत कार घेईन तेव्हा समजेल.
तुझ्या तोंडात साखरेचं पोतं पडो प्रथम्या; पण अजून साधा आय.पी. एस.ला नंबर लागत नाहीये तुझा. कोचिंग क्लासची फी भरून भरून थकला तुझा बाप.
यंदा करतोच क्रॅक ती परीक्षा. मुंब्रा पोलीस ठाण्यातच पटकावतो जागा.
तिला काय सोनं लागलंय?
सोनं नाही. त्याच्यापेक्षा खूप महागाचं, प्लॅटिनम आजोबा, प्लॅटिनम. दहा पोलिसांनी मिळून काही कोटी गिळले तिथल्या.
कोटी? म्हणजे एकावर किती शून्य रे?

तुम्ही बसा शून्य मोजत आजोबा. तिकडे एका खेळणी व्यापार्‍याची एकेक कोटी रुपयांची तीस खोकी चौकीत तपासासाठी आणली त्यांनी. परत करताना मात्र चोवीसच केली. ना तो विचारू शकत, ना हे सांगू शकत. साला, हात मारावा तर असा.
यासाठी तुला पोलिसात जायचंय?
नुसतं एवढ्याशासाठी तरी कशाला? आता त्यांचं क्षेत्र फार विशाल होत चाललंय आजोबा.
म्हणजे कसं रे?

अहो, पूर्वी तुमच्या काळात फार तर चौकीत, फार तर टेबलाखालून नोटांच्या दोन-चार बंडलांची देवाणघेवाण होत असेल. आता वाटमारीला पण सॉल्लीड स्कोप आहे आजोबा. दहा टक्के रेटच चाललाय म्हणतात.
छे, माझा नाही विश्वास बसत.
पेपर वाचत चला, आपोआप बसेल विश्वास. ती औरंगाबादची नाशिकमार्गे मुंबईला जाणारी गाडी भिवंडीजवळ अडवल्याची केस गाजतेच आहे की सध्या. पंचेचाळीस लाख गाळल्यावरच सोडली म्हणे ती गाडी. अंगाडियांच्या तर खूपच केसेस चालल्या आहेत म्हणे सध्या. परमवीर सिंहांपासून हे नवं वळण लागलंय पोलीस खात्याला.
तू म्हणजे एखाद्या राष्ट्रपुरुषाचं नाव घ्यावं तसं घेतोयस हे नाव.

राष्ट्रपुरूष होऊन काय करायचंय आजोबा? त्यापेक्षा आयुष्यात एक-दोनदा असे हात मारले, तरी पुरेल आपल्यासारख्याला.
सचिन वाझे प्रकरणाने जरब नाही का रे बसली? ृ
तेवढ्याने होत नाही हो आजोबा. लोक चार दिवस बोलतात, विसरतात. फार तर निलंबन होतं, चौकशी होते. होईनात. मिळवलेलं घबाड तर जिरवलं जातंच ना तोवर!
अरेरे! वर्दीची नोकरी यासाठी हवी का रे तुला? मला ऐकायलाही कसंतरी वाटतंय.
मग काय जाडाभरडा युनिफॉर्म चढवून उन्हातान्हात वणवणायची हौस आहे मला?
बघ बाबा. वर्दी ही वरकमाईची पण संधी आहे आणि जनसेवेची पण संधी आहे. शेवटी वर्दी अंगावर कशासाठी चढवायची हे तुम्हा तरुणांनीच ठरवायचं यापुढे!

हेही वाचलतं का?

Back to top button