

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (arjun tendulkar), गेल्या दोन हंगामांपासून मुंबई इंडियन्स (MI) संघाचा भाग आहे. परंतु गेल्या 28 सामन्यांपासून तो बेंचवर बसला आहे आणि त्याला पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. मुंबई इंडियन्सने आयपीएल 2022 मध्ये त्यांच्या संघातील 22 खेळाडूंना प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळवले. पण असे तीन खेळाडू होते ज्यांना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. अर्जुन तेंडुलकर या तीन खेळाडूंपैकी एक आहे. गतवर्षीही मुंबई इंडियन्स संघाचा भाग असलेल्या अर्जुनला यंदा रोहित शर्माच्या संघाने 30 लाखांची बोली लावून विकत घेतले होते.
अर्जुनला (arjun tendulkar) अद्याप आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळालेली नसताना वडील सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी पहिल्यांदाच मौन सोडले आहे. सचिन यांनी आपल्या मुलाला कानमंत्र देत पुढचा रस्ता खूप कठीण असणार आहे, त्यामुळे तू मेहनत करत राहावे, असा मोलाचा सल्ला दिला आहे.
मुंबई इंडियन्सशी संबंधित असलेल्या सचिन यांने स्पष्ट केले की, ते संघ निवडीत कधीही हस्तक्षेप करत नाहीत. 'सचिन इनसाइट' या शोमध्ये सचिन यांना विचारण्यात आले की, अर्जुनला यावर्षी खेळताना पाहायचे आहे का, तेव्हा मास्टर ब्लास्टर म्हणाले, 'हा वेगळा प्रश्न आहे. मी काय विचार करत आहे किंवा मला काय वाटते हे महत्त्वाचे नाही. आता आयपीएल 2022 चा हंगाम संपला आहे.'
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) पुढे म्हणाले, 'माझी आणि अर्जुनसोबत नेहमीच चर्चा होत असते की हा मार्ग आव्हानात्मक असणार आहे. तुम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केली कारण तुम्हाला क्रिकेट आवडते, तुम्ही खेळत राहता आणि त्याचवेळी मेहनत करत राहता. त्याचा परिणाम नक्कीच समोर येईल.'
22 वर्षीय अर्जुनने आत्तापर्यंत त्याच्या मुंबई संघासाठी फक्त दोन T20 सामने खेळले आहेत आणि 'T20 मुंबई' लीगमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे.
भारतासाठी विक्रमी 200 कसोटी सामने खेळणारे सचिन म्हणाले की, मी संघ निवडीचा प्रश्न संघ व्यवस्थापनावर सोपवतो. संघ निवडीपासून दूर राहणे मी योग्य समजतो. मी कधीही संघ निवडीत स्वतःला गुंतवलेले नाही.'