Ukraine crisis : मोठा दिलासा! युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना भारतात इंटर्नशिप पूर्ण करता येणार | पुढारी

Ukraine crisis : मोठा दिलासा! युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना भारतात इंटर्नशिप पूर्ण करता येणार

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

Ukraine crisis : युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या अनेक भारतीय विद्यार्थ्यांचे रशिया- युक्रेन युद्धामुळे भवितव्य अंधातरी बनले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) महत्वाची अधिसूचना जारी केली आहे. परदेशी वैद्यकीय पदवी शिक्षण (Foreign Medical Graduates) घेतलेल्या विद्यार्थ्यांना अपूर्ण राहिलेली इंटर्नशिप भारतात पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने अर्ज करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

एनएमसीच्या अंडरग्रॅजुएट वैद्यकीय शिक्षण मंडळाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, कोविड-१९ (Covid19) आणि युद्ध (war) परिस्थितीमुळे काही परदेशी वैद्यकीय विद्यार्थ्यांची इंटर्नशीप अपूर्ण राहिली आहे. या परदेशी वैद्यकीय पदवीधरांची अडचण लक्षात घेता, भारतात इंटर्नशिपचा उर्वरित भाग पूर्ण करण्यासाठी त्यांचा अर्ज ग्राह्य मानला जाईल. पण भारतात इंटर्नशिप पूर्ण करण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवार Foreign Medical Graduates Examination (FMGE) पास झालेला असावा.

सध्याच्या तरतुदीनुसार, परदेशी विद्यापीठांतून वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना स्क्रीनिंग टेस्ट पास करावी लागते. त्यानंतर त्यांना भारतीय मेडिकल ग्रॅज्युएट समकक्ष म्हणून मान्यता मिळते. त्यामुळे भारतात त्यांना प्रॅक्टिस करता येते. तथापि, परदेशी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना दुसर्‍या वैद्यकीय महाविद्यालयात मायग्रेशनची परवानगी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नियमात नाही. त्यामुळे युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्‍न गंभीर बनला होता. युक्रेनमध्ये कमी खर्चात दर्जेदार वैद्यकीय शिक्षण मिळते. शिवाय, भारतातील सरकारी महाविद्यालयांत जागा मिळवण्यात यश न येणारे अनेक विद्यार्थी असतात. त्यामुळे अनेक भारतीय विद्यार्थ्यांचा कल युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्याकडे आहे. सध्या युक्रेनमध्ये (Ukraine crisis) अडकलेल्या हजारो विद्यार्थ्यांना भारतात आणले जात आहे.

Back to top button