

पुढारी ऑनलाईन डेस्क : अपघातानंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे. बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये रोहित शेट्टी हाताला प्लॅस्टर आणि बोटाला बांधलेल्या पट्ट्या दाखवत त्यांच्या तब्येतीची माहिती देताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हाताची शस्त्रक्रिया झाल्यानंतर लगेचच रोहित शेट्टी शूटिंगच्या सेटवर परतले आणि कामाला लागले. हे पाहून त्यांचा संपूर्ण क्रू आश्चर्य चकीत तर झालाच पण, रोहितचे कामाप्रतीचे असलेले प्रेम आणि ओढ पाहून त्यांचे कौतुक ही करत आहेत.
रोहित शेट्टींचा अपघात कसा झाला ?
'इंडियन पोलिस फोर्स' या आगामी वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान शनिवारी रोहित शेट्टी यांचा अपघात झाला. कारचा पाठलाग करतानाचा सीन शूट करताना रोहित शेट्टी जखमी झाले. त्यानंतर त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला.
रोहित यांनी चाहत्यांना दिली तब्ब्येती माहिती
व्हिडिओमध्ये रोहित शेट्टी त्यांच्या तब्येतीची माहिती आपल्या चाहत्यांसाठी देताना दिसत आहेत. व्हिडीओच्या माध्यामतून रोहित शेट्टी म्हणाले, सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की, माझी एवढी काळजी केल्याबद्दल, माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल आणि इतक्या कॉल्ससाठी तुमचे खूप खूप आभार. रोहित शेट्टी पुढे म्हणाले, 'फार काही झाले नाही. दोन बोटांना टाके पडले आहेत आणि मी कामावर परतलो आहे.
अपघात होऊन १२ तासही झाले नाहीत आणि…
त्या व्हिडिओमध्ये रोहित शेट्टींनी तब्बेतीची माहिती दिल्यानंतर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा म्हणाला, 'मित्रांनो हे फक्त तेच करू शकतो. या सगळ्यानंतरही ते सेटवर परतले आहेत. तुम्ही बघू शकता की संपूर्ण क्रू त्यांच्यासोबत आहे. आम्ही पुन्हा कामावर परतलो आहोत. रोहित सर एकदम ठीक आहेत. सिद्धार्थने रोहित यांना विचारले, 'हे तुम्ही कसे काय करु शकता, अपघातला अजून १२ तास उलटले नाहीत आणि तुम्ही पुन्हा कामावर परतला?'
सिद्धार्थ मल्होत्राने कॅप्शनमध्ये सांगितली संपूर्ण गोष्ट
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'खरा मार्गदर्शक तुम्हाला उदाहरणांद्वारे मार्गदर्शन करतो. रोहित सरांचे अॅक्शन आणि दिग्दर्शित अॅक्शन सीन्सवरचे प्रेम आपल्या सर्वांना माहीत आहे. कार स्टंटचे चित्रीकरण करत असताना काल (शुक्रवार, दि.६) रात्री त्यांचा अपघात झाला. वेदनादायक रात्र आणि किरकोळ शस्त्रक्रियेनंतर ते सेटवर परतले आहेत. तेही 12 तासांपेक्षा कमी वेळात. सर, तुम्ही आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहात. रोहित शेट्टी यांच्या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारत आहे.
अधिक वाचा :