

पुढारी ऑनलाईन डेस्क
बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि श्रीलंकामध्ये दुसरी कसोटी सुरु आहे. (IND vs SL 2nd Test ) या डे-नाईट कसोटी पहिल्या दिवशी रंगतदार अवस्थेत पोहचली आहे. भारताने सर्वबाद २५२ धावा केल्या तर श्रीलंकासंघही चाचपडला. केवळ ८६ धावांमध्ये या संघाने ६ गडी गमावले. आता दुसर्या दिवशीच्या खेळाकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले आहे. पहिल्या दिवशी भारत फलंदाजी करताना एक किस्सा घडला. याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
पहिल्या दिवशी फरकीला साथ देणार्या खेळपट्टीवर फलंदाज श्रेयस अय्यर याने सर्वाधिक ९२ धावा केल्या. श्रेयसने ही कामगिरी केवळ ९८ चेंडूमध्ये केली. ऋषभ पंत याने ३९, हनुमा विहारीने ३१, विराट कोहलीने २३ धावा केल्या.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा अपयशी ठरला त्याने २५ चेंडूत केवळ १५ धावा करु शकला. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तासनुसार, पहिल्या दिवशी रोहित शर्माने एक उत्तुंग षटकार फटकावला. यामुळे २२ वर्षीय क्रिकेट चाहत्याचे नाक तुटले. तो 'कॉरपोरेट बॉक्स'मध्ये बसला होता. रोहितचा फटका एवढा जबर होता की चाहत्याच्या नाकाला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर तत्काळ प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. एक्स रे काढण्यात आला. यामध्ये त्याच्या नाकाच्या हाडाला फॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. होसमर हॉस्पिटलचे संचालक डॉ. अजित रेयान यांनी या घटनेची माहिती दिली.