

पुढारी ऑनलाईन डेस्क : मेलबर्नच्या मैदानावर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पाकिस्तानविरुद्ध टॉससाठी मैदानात उतरताच त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. सर्व टी 20 विश्वचषक स्पर्धेत भाग घेणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला. एवढेच नाही तर ही कामगिरी करणारा तो जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) आठव्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाकडून मैदानात उतरला आहे. 2007 साली पहिल्यांदा खेळल्या गेलेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेतही त्याने भाग घेतला होता. त्यावेळी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला होता. तेव्हापासून रोहित देशासाठी प्रत्येक टी-20 विश्वचषक खेळला आहे. यंदाच्या म्हणजेच 2022 च्या टी 20 विश्वचषक मध्येही तो खेळत असून आता तो कर्णधार आहे. सध्याच्या भातीय संघात रोहित शिवाय एकही खेळाडू नाही, ज्याने 6 किंवा त्याहून अधिक विश्वचषक खेळले आहेत.
राईट हँड बॅट्समन असणा-या रोहित (Rohit Sharma) व्यतिरिक्त, बांगलादेश संघाचा कर्णधार शकीब अल हसन हा एकमेव खेळाडू आहे जो 2007 पासून प्रत्येक T20 विश्वचषकाचा भाग आहे. तथापि, रोहित शर्मा हा पहिला खेळाडू आहे ज्याने ही कामगिरी केली आहे, कारण बांगलादेश संघाने 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत अद्याप एकही सामना खेळलेला नाही.