

पुढारी ऑनलाईन डेस्क: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी औरंगजेबाचा 'जी' लावून आदरार्थी उल्लेख केल्याने आणखी एक नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या विधानावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवारांनी ट्विट (Rohit Pawar Tweet) करत या #'जी' वरून बावनकुळे यांच्यावर निशाणा साधत खोचक सवाल केला आहे. वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण…
गेले काही दिवस महाराष्ट्रातील राजकारण ढवळून गेले आहे. वारंवार महापुरुषांबद्दल कधी सत्ताधारी पक्षातील तर कधी विरोधी पक्षातील नेत्यांकडून आक्षेपार्ह वक्तव्य केली जात आहे. यावरुन पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरु होतात. राज्यपाल, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी, भाजप आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेली आक्षेपार्ह वक्तव्य, चंद्रकांत पाटील यांनी समाजसुधारकांबाबत केलेले विधान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल स्वराज्यरक्षक असा केलेला उल्लेख हा वाद सुरु असतानाच. आमदार जितेंद्र आव्हाडांनी औरंगजेबाबद्दल विधान केलं त्यावर माध्यमांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाचा उल्लेख करताना औरंगजेब'जी' असा आदरार्थी उल्लेख केला आणि पुन्हा एका वादाला सुरुवात झाली. त्यांच्या या विधानावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवारांनी ट्विट करत सवाल केला आहे.
"राज्यपाल, मंत्री, आमदार, केंद्रीय प्रवक्ते यांच्या महापुरुषांबद्दलच्या अवमानकारक वक्तव्यांबाबत भाजप गप्प होती. पण अजितदादांनी स्वरा्ज्यरक्षक म्हटल्यावर राज्याच्या अस्मितेबाबत नेहमीच सायलेंट असणारे भाजपचे मास्टरमाईंड राजकारणासाठी ॲक्टिव्ह झाले आणि त्यांचे आदेश येताच भाजप बोलू लागली.
आता चंद्रशेखर बावनकुळेजींच्या वादग्रस्त वक्तव्यावर आंदोलन करण्याचे आदेश भाजपचे हेच मास्टरमाईंड देतील का? आणि त्यांनी दिलेल्या Standard Operating Procedure (SOP) नुसार बावनकुळे#'जीं'च्या फुली मारलेल्या फोटोला भाजप जोडो मारो आंदोलन करेल का?"
चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगाजेब बाबत केलेल्या विधानाचे स्पष्टीकरण दिले आहे.
हेही वाचा