Rishabh Pant : दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्वाची धुरा पंतकडे

Rishabh Pant : दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्वाची धुरा पंतकडे
Published on
Updated on

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जीवघेण्या अपघातातून सावरल्यानंतर व्यावसायिक क्रिकेटचा नव्याने श्रीगणेशा करण्यास सज्ज असलेल्या ऋषभ पंतकडे (Rishabh Pant) यंदाच्या आयपीएलसाठी दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व भूषवण्यात आले आहे. यापूर्वी, डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या अपघातामुळे ऋषभ पंतला तब्बल 14 महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते.

ऋषभ पंतचे कर्णधार या नात्याने स्वागत करताना अतीव आनंद होत आहे. त्याच्या आक्रमक खेळाचा बाणा त्याने प्रत्यक्षातही दाखवून दिला असून याच करारी बाण्यामुळे तो तंदुरुस्तीसह नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. नव्या हंगामात तो केव्हा प्रत्यक्ष मैदानात उतरेल, याची आम्हाला आतापासूनच उत्सुकता लागून राहिली आहे, असे दिल्ली कॅपिटल्सचे अध्यक्ष व सहमालक पार्थ जिंदाल यांनी एका पत्रकातून नमूद केले.

डावखुरा ऋषभ पंत विशाखापट्टणममधील प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाला, त्यावेळी तो पूर्ण तंदुरुस्त आढळून आला होता. दिल्लीचा या हंगामातील पहिला सामना 23 मार्च रोजी पंजाब किंग्जविरुद्ध चंदीगडमध्ये खेळवला जाणार आहे. ऋषभला यंदाच्या आयपीएलसाठी बीसीसीआयने देखील परवानगी दिली आहे. (Rishabh Pant)

14 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीत पूर्णपणे सावरल्यानंतर ऋषभ पंत यष्टिरक्षक-फलंदाज या नात्याने आगामी आयपीएल स्पर्धा खेळण्यासाठी पूर्ण तंदुरुस्त आहे, असे बीसीसीआयने यापूर्वी एका पत्रकातून म्हटले होते. दिल्ली संघाचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनीही ऋषभ पंतचे पुनरागमन संघासाठी विशेष महत्त्वाचे असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

'आम्हाला मागील हंगामात पंतची प्रकर्षाने उणीव जाणवली. ऋषभमुळे संघ बराच मजबूत झाला असून सरावावेळी त्याचे फूटवर्क व फटके तो पूर्ण तंदुरुस्त झाल्याचे दर्शवतात,' असे निरीक्षण पाँटिंगने नोंदवले. ऋषभ पंतच्या गैरहजेरीत मागील हंगामात दिल्लीचे नेतृत्व ऑस्ट्रेलियन अनुभवी खेळाडू डेव्हिड वॉर्नरकडे सोपवले गेले. मात्र, त्यावेळी हा संघ 5 विजय व 9 पराभवांसह नवव्या स्थानी फेकला गेला होता.

हेही वाचा…

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news