

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : संगमेश्वर तालुक्यातील पांगरी येथे सापडलेल्या त्या बालिकेचा जीव वाचवण्यावरून सोशल मीडियावर चमकूगिरीचे नाट्य रंगले होते. ही चमकूगिरी करण्यासाठी सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या फोटोवरून एकाला काल (दि.०३) गुरूवारी महिला बालकल्याण विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामुळे चमकूगिरी त्याला चांगलीच भोवणार असे दिसत आहे. (Ratnagiri Crime)
सरपंच आणि ग्रामस्थांच्या तत्परतेमुळेच त्या बालिकेला जीवदान मिळाले आहे. असे असले तरी सोशल मिडियावर अनेकजण याचे क्रेडिट घेऊन प्रसिद्धी मिळवत असल्याचे दिसून येत होते. याबाबत सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त केली जात होती. त्या मुलीच्या फोटो व्हायरलवरुन अनेक गंभीर असे सवाल उपस्थित होते.
या मुलीला जिल्हा रूग्णालयात नेल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू झाले. तेथील नर्स व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी बारीक लक्ष ठेवत त्या मुलीला वाचवले. असे असले तरी त्या ठिकाणी एका जोडप्याने जणू काही आपणच तिची काळजी घेत जीवदान दिले, असे सोशल मीडियावर भासवले. तसे फोटोही त्यांनी व्हायरल केले.
या फोटोमध्ये आमची लाडली… आमची छकुली… असा उल्लेखही केलेला जाणवला. विशेष म्हणजे हे सेल्फी फोटो काढताना या दोघांनीही मास्क देखील लावलेला नव्हता. या जोडप्याने त्या मुलीचे आपल्याबरोबर फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले.
मुळात या जोडप्याला रूग्णालयात कसा प्रवेश दिला गेला? पोलिसांची परवानगी होती का? पोलिस तपास सुरू असताना कुठलीही बालिका असेल तर तिचा फोटो असा व्हायरल करणे गुन्हा आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते.
याबाबत महिला बालकल्याण विभागाने गंभीर दखल घेत संबंधीत 'त्या' जोडप्याला कारणेदाखवा नोटीस बजावली आहे. यामुळे आता हे जोडपे अडचणीत सापडले आहे.