गोवा : १६ मतदारसंघातून २७ महिला उमेदवार रिंगणात; शिवोली मतदारसंघात सर्वाधिक चौघीजणी आमनेसामने | पुढारी

गोवा : १६ मतदारसंघातून २७ महिला उमेदवार रिंगणात; शिवोली मतदारसंघात सर्वाधिक चौघीजणी आमनेसामने

जयश्री देसाई, पणजी

राज्यातील निवडणुकांच्या उमेदवारांचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. ५८७ अर्जामधून ३८२ अर्ज निश्चित झाले आहेत. ४० जागांसाठी हे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. ३८२ उमेदवारांपैकी २७ महिला उमेदवार यावेळी रिंगणात आहेत. या महिला १६ मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. शिवोली मतदारसंघातून सर्वाधिक चौघीजणी आमनेसामने असणार आहेत.

हळदोणातून पूजा मयेकर (अपक्ष), कुठ्ठाळीतुन एलिना सालढाणा (आप), भक्ती खडपकर (शिवसेना), कुंभारजुवेतुन मारिया वरेला (गोयंचो स्वाभिमानी पक्ष), जनिता मडकईकर (भाजप), दाबोळीतून तारा केरकर (अपक्ष) फातोर्डातुन ऍड. वलेरी फर्नांडिस (रोव्हॉल्युशनरी गोवन्स पक्ष), सेऊला वास (तृणमूल काँग्रेस) मयेतून शीला घाटवळ (अपक्ष) मांद्रेतून मारिया डिकोस्टा (संभाजी ब्रिगेड), सुनयना गावडे (रोव्हॉल्युशनरी गोवन्स पक्ष), म्हापसातून नीता खानविलकर (अपक्ष), नावेलीतून प्रतिमा कुतिन्हो (आप), वालंका आलेमाव (तृणमूल काँग्रेस) पर्येतून डॉ. दिव्या राणे (भाजप), केपेतून आलेक्सी फर्नांडिस (शिवसेना), सांगेतून सावित्री कवळेकर (अपक्ष), राखी नाईक (तृणमूल काँग्रेस), शिवोलीतून डायना फर्नांडिस (संभाजी ब्रिगेड), पल्लवी दाभोलकर (अपक्ष), डिलायला लोबो (काँग्रेस), करिष्मा फर्नांडिस (शिवसेना), ताळगावमधून शुभांगी सावंत (महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष) सेसिल रॉड्रिग्ज (आप), जेनिफर मोन्सेरात (भाजप), थिवीतून कविता कांदोळकर (तृणमूल काँग्रेस), वाळपईतून मनीषा शेणई उसगांवकर (काँग्रेस) या महिला उमेदवार रिंगणात आहेत.

एकूण उमेदवारांची संख्या पाहता २७ उमेदवार ही संख्या अगदीच नगण्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला तर प्रत्येक पक्षातून किमान एक महिला उमेदवार निवडणुक लढवत आहे. राज्यात तृणमूल काँग्रेस पक्षाकडून सर्वाधिक चार महिला निवडणूक रिंगणात आहेत. त्याखालोखाल आप, भाजप व शिवसेनेकडून ३ महिला निवडणूक लढवणार आहेत तर काँग्रेसकडून २ महिला उमेदवार उभ्या आहेत. संभाजी ब्रिगेड या पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या पक्षाच्या २ महिला रिंगणात आहेत. राज्यभरातून ६ महिला स्वहिंमतीवर अपक्ष लढत आहेत.

शिवोलीत चौघींची टक्कर

शिवोली मतदार संघात एकूण १३ उमेदवार उभे आहेत. यात चार महिलांचा समावेश आहे. संभाजी ब्रिगेड, शिवसेना, काँग्रेस व एक अपक्ष उमेदवार अशी ही महिलांची लढत असणार आहे. काँग्रेसकडून लढणाऱ्या डिलायला लोबो यांनी निवडणुका होण्याआधीपासूनच प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांचे पारडे जाड असले तरी इतर महिलांमुळे काही प्रमाणात मत विभागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सावित्री – राखी व सेसिल – जेनिफर यांच्यात चुरस

सांगे मतदारसंघातून सावित्री कवळेकर या दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. शिवसेना, काँग्रेस, शिवसेना आणि तृणमूल काँग्रेस असा प्रवास केलेल्या राखी नाईक या देखील रिंगणात आहेत. तर दोनवेळच्या आमदार असलेल्या जेनिफर मोन्सेरात यांच्यासमोर २०१७ चा अनुभव गाठीशी असलेल्या सेसिल रॉड्रिग्ज यांचे आव्हान आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघात महिला उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार आहे.

कोणत्या पक्षातून किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

काँग्रेस – २
भाजप – ३
आप – ३
तृणमूल काँग्रेस – ४
शिवसेना – ३
महाराष्ट्रवादी गोमंतक – १
गोयंचो स्वाभिमानी पक्ष – १
रोव्हॉल्युशनरी गोवन्स पक्ष – २
अपक्ष – ६
संभाजी ब्रिगेड – २

हेही वाचा

व्हिडीओ पहा – उत्पल पर्रिकरांबाबत भाजपला काय वाटते? देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत | Goa Assembly Elections

Back to top button