अभिनेते रमेश देव अनंतात विलीन | पुढारी

अभिनेते रमेश देव अनंतात विलीन

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्यावर विर्लेपार्ले येथील पारसीवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक उमदे, सदाबहार व्यक्‍तिमत्त्व हरपल्याची भावना त्यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी मान्यवरांनी व्यक्‍त केली.

रमेश देव यांचे बुधवारी रात्री 8 च्या सुमारास मुंबईतील खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तीन दिवसांपूर्वीच त्यांनी आपला 92 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांचे पार्थिव अंधेरीतील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन देव कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिजित पानसे, अभिनेते विनय येडेकर, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, अभिनेत्री पूजा साळुंखे, रझा मुराद, किरणकुमार व मान्यवर उपस्थित होते.

अभिनेत्री पूजा साळुंखे देव यांना श्रद्धांजली वाहताना म्हणाल्या, देव काकांनी मला ‘सर्जा’ चित्रपटात अभिनेत्री म्हणून संधी दिली. माझं नाव मनीषा पवार होते. काकांनी माझं पूजा नाव ठेवून मला ओळख दिली. चित्रीकरणादरम्यानही ते खूप काळजी घेत होते. खरंच देवमाणसं आहेत, अशा भावना त्यांनी व्यक्‍त केल्या.

Back to top button