

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्गज टेक आणि ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनने (Amazon) नुकतीच १८ हजार नोकरकपातीची ( layoffs) घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या कामगार आयुक्त कार्यालयाने ॲमेझॉनला नोटीस बजावली आहे. कर्मचाऱ्यांना कामावरून काढणे तसेच कर्मचाऱ्यांना स्वतःहून सोडून जाण्यासाठी दिलेली ऑफर याबाबत चर्चा करण्यासाठी १७ जानेवारी रोजी बैठक बोलावली असल्याचे नोटिसीतून सूचित करण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त बिझनेस टुडेने दिले आहे.
पुण्यातील सहाय्यक कामगार आयुक्तांनी जारी केलेल्या नोटीसमध्ये असे लिहिले आहे, "तुमचे आस्थापन/फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केल्याबाबत १७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता सहाय्यक कामगार आयुक्त जीएस शिंदे यांच्या दालनात संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे."
आयटी कर्मचारी संघटना नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट (NITES) ने केलेल्या तक्रारीनंतर कामगार आयुक्त कार्यालयाने ॲमेझॉनला समन्स बजावले आहे. कंपनीचा व्हॉलन्टरी सेपरेशन प्रोग्रॅम आणि नोकरकपातीचा निर्णय हा औद्योगिक विवाद कायद्याचे उल्लंघन करणारा आहे, असा दावा NITES ने तक्रारीतून केला आहे.
NITES कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा यांनी बिझनेस टुडेशी बोलताना सांगितले की, "औद्योगिक विवाद कायद्यांतर्गत असलेल्या प्रक्रियेनुसार नियोक्ता पूर्वपरवानगीशिवाय मस्टर रोलवर असलेल्या कर्मचार्यांना कामावरुन काढून टाकू शकत नाही."
अशाच प्रकारची एक नोटीस Amazon ला नोव्हेंबरमध्ये बंगळूरमधील कामगार आयुक्त कार्यालयाने बजावली होती. नोव्हेंबर २०२२ मध्ये Amazon ने Amazonian Experience and Technology टीममधील काही भारतीय कर्मचार्यांना व्हॉलन्टरी सेपरेशनची ऑफर दिली होती.
नुकतेच ॲमेझॉनने १८ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकणार असल्याचे म्हटले होते. गेल्या आठवड्यात ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जॅसी म्हणाले होते की काही कर्मचार्यांना व्हीएसपी ऑफर देण्यात आली आहे आणि एकूणच कंपनीमधील १८ हजार जणांना कामावरुन काढून टाकले जाणार आहे. १८ जानेवारीपासून संबंधित कर्मचार्यांना यांची माहिती देण्यास सुरुवात केली जाईल.
जगातील दिग्गज ई कॉमर्स कंपनी ॲमेझॉनमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरकपात सुरु आहे. एका रिपोर्टनुसार, ॲमेझॉनने जाहीर केलेल्या जागतिक नोकरकपातीचा भाग म्हणून ॲमेझॉन इंडिया (Amazon India) देशातील १ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करणार आहे. यामुळे १ हजार कर्मचाऱ्यांना घरी जावे लागणार आहे, असे वृत्त CNBC TV-18 ने सुत्रांच्या हवाल्याने याआधी दिले होते.
हे ही वाचा :