एका टी-20 सामन्यात 515 धावांचा पाऊस, पीएसएलमध्ये महाविश्वविक्रम!

एका टी-20 सामन्यात 515 धावांचा पाऊस, पीएसएलमध्ये महाविश्वविक्रम!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान सुपर लीगमध्ये फलंदाजांकडून गोलंदाजांची कुटाई होणे हे नित्याचे झाले आहे. रावळपिंडी येथील सपाट खेळपट्टीवर असाच एक टी-20 सामना झाला ज्यात दोन्ही संघांनी मिळून 40 षटकांत 515 धावा केल्या. हा टी-20 क्रिकेट इतिहासातील विश्वविक्रम बनला आहे.

पाकिस्तान सुपर लीगचा 28 वा सामना शनिवारी क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि मुलतान सुलतान यांच्यात खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुलतान संघाने निर्धारित 20 षटकात 3 गडी गमावून 262 धावा केल्या. पाकिस्तानच्या भूमीवर कोणत्याही टी-20 सामन्यातील एका डावातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. सलामीवीर उस्मान खानने मुलतानला या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 12 चौकार आणि 9 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने 43 चेंडूत 279.07 च्या स्ट्राइक रेटसह 120 धावांची तुफानी खेळी केली. उस्मानने 36 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. पीएसएलमधील हे सर्वात जलद शतक ठरले. यादरम्यान क्वेटा ग्लॅडिएटर्सचा कैस अहमद टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज बनला. त्याने 4 षटकात 2 विकेट घेतल्या पण 77 धावा दिल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना क्वेटा ग्लॅडिएटर्सची सुरुवात चांगली झाली नाही. मागील सामन्यात 145 धावांची तुफानी खेळी करणारा जेसन रॉय अवघ्या 6 धावांवर बाद झाला. यानंतर मार्टिन गप्टिलने 14 चेंडूत 37 धावा केल्या आणि ओमेर युसूफने 36 चेंडूत 67 धावांची खेळी करत संघाला केवळ सांभाळलेच नाही तर लक्ष्याकडे वेगाने नेले. यानंतर इफ्तिखार अहमदनेही 31 चेंडूत 53 धावांची धडाकेबाज खेळी केली, मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. क्वेटाचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 253 धावाच करू शकला आणि सामना 9 धावांनी गमावला. यादरम्यान, मुलतान सुलतानच्या अब्बास आफ्रिदीने हॅटट्रिक घेतली. या पराभवासह क्वेटा ग्लॅडिएटर्सचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला.

टी-20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एका संघाला लक्ष्याचा पाठलाग करताना 250 हून अधिक धावा करूनही पराभव पत्करावा लागला आहे. याआधी, एका सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम टायटन्स आणि नाइट्स संघाच्या नावावर होता. सीएसए टी-20 चॅलेंजमध्ये या दोन्ही संघांनी 2022 मध्ये एकूण 501 धावा केल्या होत्या. टायटन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 271 धावा केल्या होत्या, तर लक्ष्याचा पाठलाग करताना नाईट्सला 20 षटकांत 230 धावांपर्यंत मजल मारली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news