

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबई संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पाचवेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे, मात्र गेल्या मोसमात संघाला चांगली कामगिरी करता आली नाही आणि शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले. आयपीएल 2023 मध्ये, मुंबई इंडियन्स आपला पहिला सामना आरसीबी विरुद्ध खेळणार आहे, पण या हंगामापूर्वेच मुंबईला मोठा झटका बसला आहे. बुमराहनंतर त्यांचा एक स्टार खेळाडू संपूर्ण हंगामात खेळू शकणार नसल्याचे समोर आले आहे.
आयपीएल 2023 पूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. Espncricinfo च्या रिपोर्टनुसार स्टार वेगवान गोलंदाज रिचर्डसन दुखापतीमुळे IPL 2023 मध्ये खेळू शकणार नाही. दुखापतीमुळे रिचर्डसन भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतूनही बाहेर पडला होता. तो हॅमस्ट्रिंगच्या समस्येशी झुंजत आहे आणि त्याला तंदुरुस्त होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. या कारणामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेतूनही बाहेर होऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे.
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनने ट्विट केले की, 'दुखापत हा क्रिकेटचा मोठा भाग असतो. हे जरी सत्य असले तरी ही गोष्ट निराशाजनक आहे. आता मी अशा स्थितीत आहे की मला जे आवडते ते मी करू शकतो. आणखी चांगला खेळाडू होण्यासाठी मी खूप मेहनत घेतो. एक पाऊल मागे आणि दोन पाऊल पुढे. चला प्रयत्न करूया.'
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज रिचर्डसनला मुंबई इंडियन्सने दीड कोटी रुपयांना विकत घेतले होते. पंजाब किंग्जनेही त्याला खरेदी करण्यासाठी बोली लावली होती, पण मुंबई संघाने त्याला भरघोस रक्कम देऊन आपल्या संघात सामील करून घेतले. रिचर्डसने आयपीएलमध्ये एकूण 3 सामने खेळून 3 बळी घेतले आहेत. त्याचवेळी, ऑस्ट्रेलियासाठी, त्याने 3 कसोटी सामन्यात 11 विकेट, 15 एकदिवसीय सामन्यात 27 बळी आणि 18 टी-20 सामन्यात 19 बळी घेतले आहेत.
2019 मध्ये रिचर्डसनच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती, ज्यामुळे तो एकदिवसीय विश्वचषक आणि ॲशेस मालिकेतून बाहेर पडला. त्यानंतर त्याने डिसेंबर 2021 मध्ये अॅडलेडमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळला, परंतु टाचेच्या दुखापतीमुळे तो पुढील सामन्यातून बाहेर पडला. तेव्हापासून तो कसोटी क्रिकेट खेळला नाही.