राशीन पुढारी वृत्तसेवा :
कर्जत पोलीस स्टेशनचा पोलीस हवालदार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. भांबोरा येथील ३७ वर्षीय तक्रारदाराने याबाबत लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती. अण्णासाहेब बाबुराव चव्हाण, वय ५२, पोलीस हवालदार, नेमणूक- राशीन दुरक्षेत्र, कर्जत पोलीस स्टेशन, रा. लक्ष्मीनगर, मांडवगण रोड, श्रीगोंदा असे अटक केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
चव्हाण याने ६ जून रोजी कर्जत पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ३० हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार यांनी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर येथे तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरून ६ जून २०२२ रोजी कर्जत येथे केलेल्या लाच मागणी पडताळणीमध्ये आरोपीने तक्रारदार यांच्याकडे ३० रुपयांची मागणी करुन तडजोडीअंती २० हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले.
मंगळवारी राशिन येथे केलेल्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी अण्णासाहेब चव्हाण याने लाचेची २० हजार रुपयांची रक्कम पंचासमक्ष तक्रारदाराकडून भिगवण रोडवरील खरात हॉस्पिटलसमोर स्विकारली. त्यात त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपीविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
लाच लुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पर्यवेक्षण अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर यांनी काम पाहिले. सापळा पथकात पोलीस हवालदार संतोष शिंदे, पोलीस नाईक रमेश चौधरी, विजय गंगुल. पोलीड अंमलदार वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस नाईक राधा खेमनर, संध्या म्हस्के, चालक पोलीस हवलदार हरुन शेख, राहुल डोळसे हे सहभागी झाले.