दिवसाढवळ्या घरफोड्या करणाऱ्या सुमो गॅंगला अटक; गँगमध्ये तीन महिला व दोन पुरुष | पुढारी

दिवसाढवळ्या घरफोड्या करणाऱ्या सुमो गॅंगला अटक; गँगमध्ये तीन महिला व दोन पुरुष

नारायणगांव : पुढारी वृत्तसेवा

नारायणगाव बसस्थानक व परिसरात प्रवाशांना लुटणारी तसेच दिवसाढवळ्या घरफोड्या करणाऱ्या सुमो गॅंगला नारायणगाव पोलिसांना पकडण्यात यश आले. यामध्ये तीन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. त्यांच्याकडून १२ तोळे सोने, ५ हजार रोख व एक टाटा सुमो गाडी असा ८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती नारायणगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

संजय भानुदास सकट, नंदा भानुदास सकट (दोन्ही रा इंदिरा नगर श्रीरामपूर), दिगंबर सूर्यभान दारखुंडे, लिलाबाई भोलेनाथ खंदारे, रखमाबाई अचपल खंदारे सर्व (रा. सलाबतपूर, ता नेवासा, जि. अहमदनगर) असे पोलिसांनी ताब्यात घेतले असलेल्या संशयितांची नावे आहेत. हे पाचही जण पुणे ग्रामीण व नगर जिल्ह्यात गर्दीचे ठिकाणी हेरून चोऱ्या करीत होते व या प्रकारात वाढ झाली होती.

केशर आंबा प्रथमच समुद्रमार्गे अमेरिकेला; 16 हजार 560 किलो आंब्यांची निर्यात

याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी तपास करण्याबाबतच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, नारायणगाव पोलिस ठाणे हद्दीतील बसस्थानक तसेच बाजारपेठ येथे महिलांचे दागिने, लेडीज पर्स व बंद घरांची घरफोडी करणारी सुमो गॅंग ही नेवासा, श्रीरामपूर या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली.

सासवडमधील दोन कचरावेचकांच्या हत्येचा निषेध; कागद, काच, पत्रा उचलणारे कष्टकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर

त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक ताटे यांनी उप पोलीस निरीक्षक विनोद धुर्वे, पोलीस नाईक धनंजय पालवे, पोलिस जवान शैलेश वाघमारे, दत्ता ढेम्बरे, दिनेश साबळे, शामसुंदर जायभाये यांचे पथक तपासासाठी रवाना केले. पोलिसांनी नेवासा श्रीरामपूर या ठिकाणी सापळा रचून या पाचही आरोपींना ताब्यात घेतले असून या आरोपींकडून टाटा सुमो (एमएच ०५ बीयु ०२१२), सोने व रोख रक्कम असा ८ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. त्यांच्यावर नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button