

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर येथील हिंसाचाराच्या संदर्भात विरोधकांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना लक्ष केले. या भाषणात त्यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान पदावर असताना मिझोरामवर हवाई हल्ले करण्याचे आदेश इंडियन एअर फोर्सला दिल्याचा उल्लेख केला. ही घटना नेमकी काय होती, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न. (Aizawl Bombing)
मिझोरामला त्या काळी स्वतंत्र राज्याचा दर्जा नव्हता. मिझो हिल्स हा आसामचा भाग होता. १९६६मध्ये या भागात उग्रवादी संघटनांनी डोके वर काढले. भारतीय सैन्यात हवालदार पदावर काम केलेल्या लालडेंगा यांनी मिझोरामला स्वतंत्र राष्ट्र बनवण्यासाठी हिंसेचा मार्ग स्वीकारात मिझोराम नॅशनल फ्रंट ही संघटना उभारली. त्या काळात दुष्काळही पडला होता, आणि काही हजार नागरिकांचा त्यात मृत्यू झाला होता. मिझोराम नॅशनल फ्रंटची स्वतंत्र शस्त्रसज्ज शाखाही होती. १ मार्च १९६६ला मिझोराम राज्य स्वतंत्र देश असल्याची घोषणा लालडेंगा यांनी केली. लालडेंगा यांच्या या संघटनेला चीन, पाकिस्तान आणि भारतातील काही फुटीरतावादी मदत करत होते, असे इंडिया टुडेच्या बातमीत म्हटलेले आहे.
१ मार्च १९६६ला लालडेंगा यांनी मिझो व्यतिरिक्त सर्व नागरिकांना मिझो हिल्स परिसरातून निघून जावे, असा आदेश काढला होता. या घटना घडण्यापूर्वी काही महिन्यांपूर्वीच इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या होत्या. मिझो बंडखोर आणि भारतीय सुरक्षा दलांतील चकमकी वाढल्या होत्या. भारतीय लष्कराला मिझो हिल्स परिसरातून माघार घेण्यासाठी मिझो बंडखोरांनी ऑपरेशन जेरिको सुरू केले होते. मिझो बंडखोरांनी आसाम रायफल्सच्या छावण्यांवर हल्ले सुरू केले होते, २ मार्च १९६६ला मिझो बंडखोरांनी ऐझॉलमधील सरकारी खजिना ताब्यात घेतला, आणि काही लष्करी ठाण्यांवरही कब्जा केला. येथील सरकारी कर्मचाऱ्यांना बंधक बनवण्यात आले.
लुंगई येथील सरकारी खजिन्यातील १८ लाख रुपये मिझो बंडखोरांच्या हाती पडले होते. मिझो बंडखोरांनी टेलिफोन लाईन्सही तोडल्या होत्या, त्यामुळे बाहेरून कोणताच संपर्क होत नव्हता. बंडखोरांनी आसाम रायफल्सच्या एक छावणीवर हल्लाकरून ८५ भारतीय जवानांना बंदी बनवल्याचे बीबीसीने दिलेल्या एका बातमीत म्हटलेले आहे. या ८५ जवानांतील दोघांनी स्वतःची सुटका करून घेत या हल्ल्याची बातमी वरिष्ठांपर्यंत पोहोचवली. भारतीय लष्कराने हेलिकॉप्टरच्या मदतीने सैनिक आणि शस्त्रास्त्रे उतरवण्याचा प्रयत्न केला होता, पण तो यशस्वी झाला नाही. मिझो बंडखोरांच्या तुफान गोळीबारात भारतीय लष्कराला जमिनीवर उतरवणे शक्य होत नव्हते.
त्यानंतर ५ मार्च १९६६ला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हवाई कारवाईचे आदेश दिले. चार विमानांतून सुरुवातीला मशिन गन्स आणि नंतर बॉम्ब वर्षाव करण्यात आला. १३ मार्चपर्यंत सुरू असलेल्या कारवाईत बंडखोरांचे कंबरडे मोडले. मिझो बंडखोरांनी म्यानमार आणि तत्कालिन पूर्व पाकिस्तानात आश्रय घेतला. १३ मार्चला या परिसरात भारतीय लष्कराने प्रवेश केला. या कारवाईत १३ नागरिकांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर आपल्याच नागरिकांविरोधात हवाई दलाचा वापर केल्याची टीका इंदिरा गांधी यांच्यावर झाली होती. पुढे जवळपास दोन दशके मिझोराममध्ये बंडखोरांच्या कारवाया सुरू राहिल्या. १९७५मध्ये लालडेंगा आणि रॉच्या अधिकाऱ्यांची भेट झाली होती, त्यानंतर शांतता प्रक्रियेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. लालडेंगा आणि तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांची १५ फेब्रुवारी १९८५ला भेट झाली. त्यातून पुढे २० फेब्रुवारी १९८७ला स्वतंत्र मिझोराम राज्याची स्थापना झाली, त्यानंतरच्या निवडणुकांतून लालडेंग मिझोराम राज्याचे मुख्यमंत्री झाले.