

चाकण: पतीशी पटत नसल्याने एक महिला दोन मुलांना घेऊन उत्तर प्रदेशातून प्रियकराच्या मदतीने पुण्यात आली; मात्र तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन प्रियकराने तिला मारहाण करून तिचा खून केला. या महिलेला वाचविण्यासाठी तिचा मुलगा आणि मुलगी मध्ये पडले असताना त्यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी या प्रियकराला अटक केली आहे.
अंतिमा पांडे (वय 36, सध्या रा. खराबवाडी, ता. खेड, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. महाळुंगे पोलिसांनी सचिन रामआसरे यादव (वय 23, मूळ रा. अलाहाबाद, उत्तर प्रदेश, सध्या रा. चाकण, ता. खेड) याला अटक केली आहे. ही घटना खराबवाडीतील एका भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या खोलीत मंगळवारी (दि. 5) रात्री साडेआठ वाजता घडली. (Latest Pimpri News)
अंतिमा पांडे हिचे पतीशी पटत नसल्याने ती आपल्या 15 वर्षांची मुलगी व 12 वर्षांच्या मुलासह पुण्यात आली होती. सचिन रामआसरे याने तिला एका कंपनीत नोकरी दिली होती. त्यांच्यात प्रेमसंबंध होते. अंतिमा पांडे ही घराबाहेर गॅलरीत उभे राहून इतर पुरुषांकडे पाहते, असा सचिन तिच्यावर संशय घेऊन
सतत भांडण करून तिला मारहाण करायचा. 15 दिवसांपूर्वी त्याने अंतिमा हिला लाकडी लाटणे व पीव्हीसी पाइपने जबर मारहाण केली होती.मंगळवारी (दि. 5) दिवसभर तो अंतिमा हिच्या घरी होता. त्याने अंतिमा हिच्यावर संशय घेऊन पुन्हा भांडण केले.
सायंकाळी त्याने तिला प्लॅस्टिकचे स्टूल, लाकडी लाटणे, पीव्हीसी पाइप, लाकडी काठीने दोन्ही पाय, दोन्ही हात व डोक्यावर मारहाण केली. तिच्या पोटाला चाकू लावून आज तुला जीवे मारतो, असे म्हणून धमकी देत तिला मारून टाकले. या वेळी झालेल्या झटापटीत मुलगा प्रिन्स आणि मुलगी पलक यांनी आईला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनाही दमदाटी केली व पाठीत लाकडी लाटण्याने जबर मारहाण केली. दोघांना दमदाटी करत गप्प राहण्यास सांगितले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी जाऊन सचिन यादव याला पकडले. मुलीच्या फिर्यादीवरून त्यांनी आरोपी यादव याला अटक केली आहे.