

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेचा प्रारूप सुधारित विकास आराखड्याच्या विरोधात (डीपी प्लॅन) सत्तेमध्ये असलेल्या महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने महापालिका भवनावर गुरुवारी (दि. 7) महामोर्चा काढला. मात्र, महापालिकेत आयुक्तच हजर नसल्याने निवेदन न देता संताप व्यक्त करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा निर्धार करीत, मोर्चा माघारी फिरला.
महापालिकेचा डीपी विरोधात तब्बल 50 हजार नागरिकांनी हरकती दाखल केल्या आहेत. भूमिपुत्र, शेतकरी, छोटे कारखानदार, गोरगरीब, सामान्य नागरिकांच्या अपेक्षा व गरजा पूर्ण करण्यास हा डीपी अपयशी ठरल्याचा आरोप करीत, डीपीतील गंभीर त्रुटी, अनियमितता व जनविरोधी धोरणांविरोधात आवाज उठविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज महापालिका भवनावर महामोर्चा काढण्यात आला. (Latest Pimpri News)
शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी कॅम्पातील शगुन चौकातून हा मोर्चा निघाला. मोर्चात विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, शाम लांडे, डब्बू आसवानी, प्रभाकर वाघेरे, संतोष बारणे, प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, मयूर कलाटे, राजू बनसोडे, विक्रांत लांडे, समीर मासुळकर, माजी नगरसेविका, पदाधिकारी, व्यापारी व नागरिक सहभागी झाले होते.
आयुक्त हे विभागीय आयुक्तांच्या बैठकीस गेल्याने ते हजर नव्हते. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांना निवेदन न देता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
विधानसभा उपाध्यक्षांचा अवमान झाल्याने संताप
मोर्चा महापालिका भवनात आल्यानंतर आयुक्तांना निवेदन देण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे तसेच, प्रमुख पदाधिकारी आले होते. मात्र, आयुक्त हजर नसल्याने उपाध्यक्ष पदाचा प्रोटोकॉल राखला गेला नाही. त्या प्रकाराने बनसोडे चांगलेच संतापले. बनसोडे यांच्यावर महापालिकेच्या पायर्यांवर बसून आयुक्तांचा निषेध करण्याची वेळ आली. मी या प्रकरणाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणार आहे. आयुक्त राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
डीपीत अनेक चुकीची आरक्षणे
विकास आराखड्याच्या नावावर महापालिकेचे प्रशासक मनमानी पद्धतीने कारभार करत आहेत. दाट लोकवस्ती असलेल्या भागांवर चुकीचा आरक्षण टाकून महापालिका हे नागरिकांची घरे बुलडोजर चालवून जमीनदोस्त करण्याचा धोका आहे. महापालिकेने तयार केलेला विकास आराखडात अनेक चुकीचे आरक्षण टाकण्यात आले आहे, असे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले.
अन्यायकारक डीपीविरोधात रस्त्यावर
जुन्या डीपीतील 800 हून अधिक आरक्षणे डीपीत ठेवली आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथील भीमसृष्टी मैदानावर टाकलेल्या पोलिस स्टेशन, महापालिका उपयोग व बस टर्मिनसच्या आरक्षणास विरोध आहे.
झोन क्षेत्रात, पवना, इंद्रायणी व मुळा नदीच्या निळ्या आणि लाल पूररेषांमधील ना विकास क्षेत्रात, कचरा डेपोच्या 100 मीटर बफर झोनमध्ये बांधकामाला प्रतिबंध असतानाही, येथे शाळा, रुग्णालये, हॉकर्स झोनसारखी आरक्षणे प्रस्तावित केली आहेत. पूररेषांच्या आखणीमध्ये बदल केला आहे. गेली 35 वर्षे प्रलंबित असलेला रिंग रोडचा मार्ग डीपीत दाखविला आहे.
पिंपरी कॅम्प मार्केट या दाट लोकवस्तीत प्रशस्त रस्त्यांचे आरक्षणे टाकली आहेत. या अन्यायकारक डीपीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे, असे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सांगितले.