

मिलिंद कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या वेगात फुगत आहे. आजूबाजूची काही गावे पिंपरी-चिंचवडमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत. शहर वाढीचा वेग लक्षात घेता येत्या दहा वर्षातच लोकसंख्या दुपटीहून अधिक होणार आहे. वाढत्या शहराची तहान भागविण्यासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे पाणी देता का पाणी, अशी विनवण्या करण्याची वेळ आली आहे.
शहरातील काही भागांत पुरेसे पाणी मिळत नसल्याची तसेच, काही हाउसिंग सोसायट्यांना नियमितपणे पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. बोअरींग तसेच, खासगी टँकरच्या पाण्यावर अनेक मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांना पाण्याची गरज भागवावी लागत आहे. (Latest Pimpri News)
शहरात अनेक भागांत तसेच, एमआयडीसी परिसरात उंच इमारती उभ्या राहत आहेत. शहरातील विरळ लोकवस्ती दाट होत चालली आहे. दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत आहे. शहराची तहान भागविण्यासाठी महापालिका प्रशासनावर पाण्याचे अतिरिक्त स्त्रोत शोधण्याची वेळ आली असून, त्याबाबत राज्य सरकारकडे विनवण्या करण्यात येत आहेत. बैठका घेतल्या जात आहेत.
लोकसंख्येचा वेग तसेच, महापालिकेत हिंजवडी, माण, मारूंजी, जांबे, नेरे, सांगवडे, गहुंजे या सात गावांचा तसेच, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील नागरी वस्तीचा भागही महापालिकेत समाविष्ट करण्याचे राज्य सरकराचे नियोजन आहे. त्यामुळे शहरात सुमारे 3 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येची भर पडणार आहे. शहराला पुरेसे पाणी मिळावे, यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे गरज निर्माण झाली आहे. अन्यथा शहरवासीयांसाठी पाणी महाग होण्याचा धोका आहे.
पाण्याची बचतही गरजेची
महापालिकेचे पिण्याचे पाणी पार्किंग, रस्ते, जिने, अंगण व वाहने धुण्यासाठी वापरले जाते. तसेच, बाग व झाडांना तेच पाणी दिले जाते. टाक्या भरून पाण्याची नासाडी होते. नादुरूस्त नळ, तोट्या, नळजोड आदींमुळे तसेच, गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. तसेच, शिळे पाणी म्हणून ते फेकून देऊन ताजे पाणी भरले जाते. या प्रकारास महापालिका प्रशासनाने लगाम लावल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होणार आहे.
शहराला सध्या दररोज 620 एमएलडी पाणी
शहरातील प्रत्येक व्यक्तीस प्रतिदिन 135 लिटर पाण्याची गरज भासते. त्यानुसार महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा केला जात आहे. सध्या पवना धरणातून दररोज 520 एमएलडी पाणी घेतले जात आहे. एमआयडीसीकडून 30 एमएलडी शुद्ध पाणी अधिक दराने विकत घेतले जात आहे. आंद्रा धरणातून म्हणजे निघोजे येथील इंद्रायणी नदी बंधारा येथून 70 एमएलडी घेतले जात आहे. असे एकूण दररोज एकूण 620 एमएलडी पाणी संपूर्ण शहराला दिले जात आहे. ते पाणी दोन दिवसातून एकदा अर्ध्या शहरात पुरविले जात आहे.
पाण्यासाठी महापालिका प्रशासनाची धडपड ?
खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून 167 एमएलडी पाणी आणण्यासाठी जॅकेवल आणि भूमिगत जलवाहिनीचे काम सुरू आहे. थेट आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी उचलण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरू आहे. गेल्या 14 वर्षापासून ठप्प असलेल्या पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाचा 400 कोटी रूपयांचा खर्च वाढून 1 हजार 15 कोटींवर पोहचला आहे. त्यासाठी कर्ज काढण्याचे नियोजन आहे. त्या प्रकल्पामुळे शहराला 100 एमएलडी अतिरिक्त पाणी मिळणार आहे.
तसेच, हिंजवडीसह सात गावे महापालिकेत समाविष्ट करताना त्या भागांसाठी पाणी वाढून द्यावे, अशी मागणी राज्य सरकारकडे लावून धरण्यात आली आहे. मुळशी धरणातून 760 एमएलडी पाणी देण्याबाबत महापालिकेने राज्य सरकारला गेल्या वर्षी प्रस्ताव दिला आहे. तसेच, मावळ तालुक्यातील ठोकरवाडी धरणातून पाणी शहराला मिळावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
पाण्याचा पुनर्वापर न करणार्या हाऊसिंग सोसायट्यांवर कारवाई
एकत्रीत बांधकाम व विकास नियमावलीनुसार (युडीसीपीआर) 20 हजार चौरस मीटरपुढील क्षेत्रफळावरील, हाऊसिंग सोसाट्यांना सांडपाण्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी सोसायट्यांना सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
त्यामुळे पिण्याचा पाण्याचा वापर कमी होणार आहे. एसटीपीमध्ये प्रक्रिया केलेले पाणी शौचालय, उद्यान, बागकाम, परिसर, पार्किंग व वाहने साफसफाईसाठी वापरण्याचा नियम आहे. त्याकडे दुर्लक्ष करणार्या 50 हाऊसिंग सोसायटीचे नळजोड तोडण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. ती कारवाई सुरू राहणार असल्याचे अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
येत्या दहा वर्षांत लोकसंख्या होणार दुप्पट
पिंपरी-चिंचवड शहर हे देशात राहण्यायोग्य शहर म्हणून ओळखले जात आहे. त्यामुळे शहर चारीबाजूने वाढत आहे. टोलेजंग इमारती उभ्या राहत असल्याने लोकसंख्या वेगात वाढत आहे. सन 2011 च्या जनजगणेनुसार शहराची लोकसंख्या 17 लाख 28 हजार इतकी होती. ती वाढून सध्याची लोकसंख्या अंदाजे 30 लाख इतकी आहे. सन 2031 मध्ये लोकसंख्या अंदाजे 52 लाख 74 हजार 781 इतकी होणार आहे. तर, सन 2041 ला लोकसंख्या तब्बल 96 लाख 3 हजार 858 इतकी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शहराला सध्यापेक्षा दुप्पटी अधिक पाण्याची गरज भासणार आहे.
वाढीव पाण्यासाठी राज्य सरकारकडे प्रयत्न सुरू
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. हा वेग कायम राहिल्यास शहराची लोकसंख्या काही वर्षात दुप्पट होऊ शकते. सीमेवरील काही गावे महापालिकेत समाविष्ट होण्याची शक्यता आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पाण्याची गरज भागविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार राज्य सरकारकडे वेळोवेळी प्रस्ताव दिले आहेत. त्याबाबत पाठपुरावा केला जात आहे, असे महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.
पाण्याचे जार तसेच वॉटर एटीएमवर नागरिकांचा भरवसा
शुद्ध पिण्यायोग्य पाणी पुरवठा केला जात असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात येत आहे. मात्र, अनेक रहिवाशी तसेच, कार्यालये, मंगल कार्यालये, आस्थापना, शैक्षणिक संस्था येथे वॉटर एटीएम तसेच, आरओ जारचे पाणी वापरले जात आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गल्लोगल्ली पाण्याचे जार विक्रेते तसेच, वॉटर एटीएम सेंटर दृष्टीस पडत आहेत. नागरिकांना आर्थिक भुर्दड सहन करून पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यावरून महापालिकेच्या पाण्यावर नागरिकांचा भरवसा नसल्याचे स्पष्ट होत आहे.