

पिंपरी: माण, हिंजवडी ते शिवाजीनगरला जोडणार्या पुणे मेट्रो लाईन 3 प्रकल्पातील मेट्रोच्या वेगाची चाचणी सुरू आहे. चाचणी दरम्यान टप्प्याटप्प्याने गाडीचा वेग वाढविण्यात येणार आहे. मंगळवार (दि. 22) मेट्रोची वेग चाचणी घेण्यात आली.
चाचणी दरम्यान भासणार्या त्रुटी, अडचणी दूर केल्या जाणार आहेत. दरम्यान, डिसेंबरपर्यंत काही स्टेशन्स सुरू करण्याबाबत चाचपणी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर ही चाचणी घेतली जाणार आहे. (Latest Pimpri News)
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), टाटा आणि सीमेन्स समुहाच्या नेतृत्वाखालील पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड यांच्यातील सार्वजनिक- खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल अंतर्गत विकसित केलेला हा प्रकल्प प्रगतीपथावर आहे.
या कामास 25 नोव्हेंबर 2021 रोजी सुरुवात झाली. कामाची मुदत मार्च 2026 पर्यंत आहे. दरम्यान, डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याबाबत मुख्यमंत्री तथा पीएमआरडीए अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सूचना केल्या आहेत. सध्या स्थानकांची कामे सुरू असून, त्या समांतरच मेट्रोची वेगाची चाचणी घेण्यात येत आहे.
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान 23 स्थानके उभारण्यात आली आहेत. मेट्रोचा चार रेकचा आधुनिक सेट असून, डब्बे वातानुकूलित असतील; तसेच एकूण प्रवासी क्षमता अंदाजे एक हजार इतकी असेल.
सध्या मेट्रोची चाचणी सुरू असून, गाडीचा वेग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे. मंगळवारी मेट्रो ताशी 40 किलो मीटर वेगाने धावली.
- रिनाज पठाण, मुख्य अभियंता (पीएमआरडीए)