पिंपरी-चिंचवड: लग्नानंतर सातत्याने सुरू असलेली हुंड्याची मागणी, मानसिक आणि शारीरिक छळ, शिवीगाळ आणि मारहाण, यामुळे एका विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना मोशीतील बोर्हाडेवस्ती भागात घडली आहे. ही घटना 17 जुलै रोजी घडली असून, किरण धामोदर (वय 30) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
किरण यांच्या आत्महत्येने वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, मृत किरण यांचे वडील संजय हरिभाऊ दोड (58, रा. जवळखेड बु., ता. अकोट, जि. अकोला) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Latest Pimpri News)
त्यानुसार पोलिसांनी किरण यांचे पती आशिष दीपक धामोदर (32, रा. बोर्हाडेवस्ती, मोशी, मूळ रा. गावकावसा, अकोला) यास अटक केली आहे. तसेच, सासू सुनंदा दीपक धामोदर (50) आणि सासरे दीपक तुकाराम धामोदर (60, रा. गावकावसा, ता. अकोट, जि. अकोला) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून विवाहितेकडे वेळोवेळी विविध कारणांनी हुंडा म्हणून पैसे मागितले. वडिलांनी परिस्थिती पाहून सुमारे पाच लाख रुपये दिले. मात्र, तरीही आरोपी समाधान न मानता मोटारसायकलसह अधिक पैशांची मागणी करू लागले.
पैशांच्या मागणीस नकार दिल्यामुळे किरणला शारीरिक मारहाण, शिवीगाळ, मानसिक त्रास आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. दरम्यान, या त्रासाला कंटाळून किरणने अखेर 17 जुलै रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेनंतर तिच्या वडिलांनी पोलिसांकडे सविस्तर तक्रार दिली आहे.
पतीच्या वाढदिवशीच मृत्यूला कवटाळले
पतीचा वाढदिवस असल्याने किरणने त्याच्यासाठी केक आणला होता. त्यावेळी पतीचा मित्रपरिवारही उपस्थित होत. मात्र, केक कापल्यानंतर किरकोळ कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. या क्षुल्लक कारणाने तणाव निर्माण झाला. मनात अस्वस्थता दाटल्याने किरणने थेट बेडरूममध्ये जाऊन गळफास घेतला.
पतीने आरडाओरड करून शेजार्यांना मदतीसाठी बोलावले, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे अवघ्या काही तासांपूर्वी आनंदी घर अचानक दुःखाच्या छायेत बुडाले. किरणने पतीच्या वाढदिवसालाच मृत्यूला आलिंगन दिल्याची वेदनादायक घटना सर्वांना हादरवून गेली.