

पिंपरी: नऊ महिन्यांचे छोटे बाळ असताना कोणतीही महिला आत्महत्या करू शकत नाही. मला काही फोटोही दाखवण्यात आले आहेत. त्यावरून स्पष्टपणे दिसते की, वैष्णवीला मारून तिचा जीव घेतला आहे. पोलिसांनीही या प्रकरणाचा आत्महत्येऐवजी हत्येच्या द़ृष्टीने तपास केला पाहिजे, अशी ठाम भूमिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
वडेट्टीवार यांनी रविवारी (दि. 25) सायंकाळी वाकडमध्ये वैष्णवी हगवणे यांच्या आई-वडिलांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हगवणे कुटुंबावर तीव्र शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, मी स्वतः हे प्रकरण तपासले आहे. काही फोटोही पाहिले आहेत. (Latest Pune News)
त्या आधारे हे स्पष्ट होते की हगवणे कुटुंब राक्षसी वृत्तीचे आहे. अशा लोकांना समाजात माफ करून चालणार नाही. त्यांना कोणतीही सहानुभूती मिळू नये. इतकेच नाही, तर त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी. महिला अत्याचाराच्या प्रकरणांबाबत राज्यातील यंत्रणांवरही त्यांनी सडकून टीका केली. महिला अत्याचारात महाराष्ट्र देशात पुढे आहे.
गेल्या पाच वर्षांत राज्यात तब्बल 66 हजार महिला बेपत्ता झाल्या आहेत. प्रत्येक दोन तास 13 मिनिटांनी एक महिला अत्याचाराला किंवा खुनाला बळी पडते. ही आकडेवारी धक्कादायक आहे. कायद्याचा धाकच राहिलेला नाही, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.
या प्रकरणातील फरार सहआरोपी नीलेश चव्हाण याला तत्काळ अटक करून त्याच्याविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. अशा प्रवृत्तींना ठेचले पाहिजे. अन्यथा, अशा घटना पुन्हा पुन्हा घडत राहतील, असा इशाराही त्यांनी दिला.
महिला आयोगावर टीका
महिला आयोगाच्या निष्क्रियतेवरही वडेट्टीवार यांनी बोट ठेवले. वैष्णवी हगवणे प्रकरणात सुरुवातीचे अनेक दिवस महिला आयोग कुठेही दिसला नाही. अशा संवेदनशील प्रकरणात आयोगाने सक्रिय भूमिका बजावली पाहिजे, पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.