Urse Toll Plaza Issue: उर्से टोलनाक्याजवळून महामार्गावर उलट्या दिशेने वाहने; अपघाताचा गंभीर धोका

टोल वाचवण्यासाठी नो-एंट्रीतून प्रवेश करणाऱ्या टिप्परमुळे वाहतूक धोक्यात; सीसीटीव्ही असूनही नियमभंग सुरूच, कठोर कारवाईची मागणी
Urse Toll Plaza Safety Issue
Urse Toll Plaza Safety IssuePudhari
Published on
Updated on

अमित भागीवंत

उर्से: यशवंतराव चव्हाण पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाका स्थलांतरित झाल्यानंतर उर्से खिंड आणि सोमाटणे येथील एक्झिट लेनमधून वाहनांची उलट्या दिशेने होणारी घुसखोरी चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. टोलची रक्कम वाचवण्यासाठी काही वाहनचालक थेट नो-एन्ट्रीतून द्रुतगती मार्गावर प्रवेश करत असून, आता या प्रकारात अवजड टिप्परचाही समावेश झाल्याने मोठ्या अपघाताची भीती व्यक्त होत आहे.

Urse Toll Plaza Safety Issue
Pimpri Vegetable Market: पिंपरी बाजारात पालेभाज्या महागल्या; वटपौर्णिमेमुळे आंब्यांना मोठी मागणी

मावळातून पिंपरी-चिंचवड, रावेत आणि पुण्याकडे जाणारे काही वाहनचालक सोमाटणे टोल टाळण्यासाठी उर्से व सोमाटणे येथील एक्झिट लेनचा गैरवापर करतात. द्रुतगती मार्गावर विरुद्ध दिशेने प्रवेश करणारी ही वाहने भरधाव वाहतुकीसमोर अचानक आल्याने इतर वाहनचालकांची तारांबळ उडते. विशेषतः अवजड वाहने मोठे वळण घेत द्रुतगती मार्गावर चढत असल्याने काही काळ वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो.

Urse Toll Plaza Safety Issue
Pimpri NCMC Smart Card: पिंपरीत NCMC कार्ड वितरणात गोंधळ; ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास, व्यवस्थेवर संताप

या मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असले तरी नियमभंगाचे प्रकार सुरूच आहेत. अनेक टिप्परवर नंबरप्लेट नसणे किंवा ती काळ्या रंगाने झाकलेली असल्याने संबंधित वाहनांची ओळख पटवून कारवाई करणे कठीण होत आहे. त्यामुळे नियमभंग करणाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात अडचणी येत असल्याचे संबंधित यंत्रणांचे म्हणणे आहे.

दरम्यान, मंगरुळ व आंबळे परिसरातील स्टोन क्रशरमधून खडी आणि क्रश सँडची वाहतूक करणारे अनेक टिप्पर क्षमतेपेक्षा अधिक माल भरून वाहतूक करत असल्याचे दिसून येते. बहुतांश वाहनांवर आच्छादन नसल्यामुळे धूळ आणि क्रश सँड रस्त्यावर सांडते. यामुळे दुचाकीस्वारांसह इतर वाहनचालकांना त्रास होत असून, घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे.

Urse Toll Plaza Safety Issue
Pimpri Chinchwad Rain: पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागात पाणीच पाणी, वाहतूक विस्कळीत

कोविडनंतर स्थानिक स्टोन क्रशरमधील स्वतःच्या वाहनांची संख्या कमी झाल्याने बाहेरील वाहतूकदारांच्या टिप्परवर अवलंबित्व वाढले आहे. वाहतुकीदरम्यान आच्छादन वापरण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात असल्या तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे स्थानिक स्टोन क्रशर चालकांचे म्हणणे आहे. नियमभंग करणाऱ्या टिप्परचालकांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी यापूर्वीच पोलिसांकडे केली आहे.

या पार्श्वभूमीवर महामार्ग पोलिस, तळेगाव दाभाडे वाहतूक विभाग आणि आयआरबी यांनी संयुक्त मोहीम राबवून उलट्या दिशेने प्रवेश करणाऱ्या वाहनांवर तसेच नंबरप्लेटमध्ये छेडछाड करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

Urse Toll Plaza Safety Issue
Fake Degree Promotion Scam PCMC: पिंपरी-चिंचवड महापालिकेत बोगस पदव्यांवर पदोन्नती प्रकरण; तीन सदस्यीय समिती स्थापन

सोमाटणे टोल टाळण्यासाठी काही टिप्परचालक नो-एन्ट्रीतून द्रुतगती मार्गावर प्रवेश करतात. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असली तरी नंबरप्लेट झाकल्यामुळे कारवाईत अडचणी येतात. अशा वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढत आहे.

महादेव तुपारे, व्यवस्थापक, आयआरबी, सोमाटणे टोल प्लाझा

द्रुतगती मार्गावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत.

गजानन मोरे, सहाय्यक निरीक्षक, महामार्ग पोलिस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news