पिंपळे गुरव : पिंपळे गुरव परिसरातील सृष्टी चौकात मंगळवारी सकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. कार, दुचाकी, बस, ट्रक यांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याने प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
पिंपळे गुरवमधील सृष्टी चौक हा वाहनांच्या वर्दळीने नेहमीच गजबजलेला असतो. वाहतूककोंडी वाढण्यामागील चौकाच्या कडेला असलेल्या चहाच्या टपर्या, पंक्चरची दुकाने व स्वीट मार्टसारख्या दुकानांमध्ये जाण्यासाठी नागरिकांना वाहने थेट रस्त्यावरच पार्क करून जावे लागते. त्यातच पुढे असलेल्या शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ पालक स्वतःची वाहने रस्त्यावर उभी करून विद्यार्थ्यांना शाळेत सोडायला, आणायला जातात, यामुळे सकाळी, सायंकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी व गोंधळ निर्माण होतो. या मोठ्या समस्यांमुळे नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. (latest Pune News)
आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास सृष्टी चौकामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. या ठिकाणी चारही बाजूंनी येणार्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
विशेषत: शाळा कॉलेज व कार्यालय गाठण्याच्या घाईत असलेल्या नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला. अनेकांचा तासभर वेळ वाहतूक कोंडीत गेल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.
वाहतूक कोंडीमुळे शालेय बसप्रवासी वाहने तसेच इतर वाहनांना बराच वेळ वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले. पादचारी नागरिकांनाही रस्ता ओलांडणे अवघड झाले होते. वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले. जवळजवळ तासाभरानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार दररोज या चौकात आम्हाला अर्धा तास अडकावे लागते. पोलिसांची उपस्थिती असली की परिस्थिती काहीशी सुरळीत होते, पण कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
...या उपाययोजनांची गरज
शाळेने पालकांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करावी.
सकाळी, सायंकाळी गर्दीच्या वेळेस वाहतूक पोलिस कर्मचार्यांची नियुक्त करावी.
बेकायदा रिक्षा थांबा हटवणे.
बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करणे.
नो पार्किंगचे फलक लावणे.
सिग्नल यंत्रणा बसवावी