वेल्हे : पुणे शहर व जिल्ह्यातील एक कोटी नागरिकांची तसेच 66 हजार हेक्टर शेतीची तहान भागवणार्या खडकवासला धरणसाखळीत यंदाच्या पावसाळ्यात जोरदार पावसामुळे साखळीच्या क्षमतेच्या दुपटीपेक्षा अधिक 59 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. 18 जूनपासून 16 सप्टेंबरपर्यंत तब्बल 30 टीएमसी जादा पाणी खडकवासलातून सोडण्यात आले आहे. यातील सर्वाधिक 24.88 टीएमसी पाण्याचा लाभ उजनी धरणाला झाला आहे. (latest Pune News)
गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात खडकवासलातून तब्बल 33.35 टीएमसी जादा पाणी मुठा नदीत सोडण्यात आले होते. त्या तुलनेत यंदा कमी पाणी सोडले आहे; मात्र यंदा अद्यापही रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यासह धरणक्षेत्रात पाऊस पडत आहे. त्यामुळे चारही धरणांतून जादा पाणी सोडले जात आहे.
खडकवासला धरण शाखेच्या शाखा अभियंता गिरीजा कल्याणकर-फुटाणे म्हणाल्या, खडकवासला धरणसाखळीतील सर्व चारही धरणे भरली आहेत. त्यामुळे जादा पाणी सोडले जात आहे.