

पिंपरी: मुंबईमधील होणार्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनास सुरुवात केली आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील मराठा समाज तसेच त्या संलग्न संघटनांनी तयारी केली असून, पिंपरी चिंचवडमधील मराठाबांधव गुरुवारी (दि. 29) भक्ती शक्ती चौक निगडी येथे एकत्र आले होते. तेथून ते पुढे तळेगावच्या दिशेने मुंबईकरता मार्गस्थ झाले.
या मुंबई दौर्यात सहभागी होण्यासाठी तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पिंपरी चिंचवडमधील मराठा समाज एकवटला आहे. आरक्षणाच्या मागणीच्या अनुषंगाने आंदोलन सुरू झाले असून, विविध जिल्ह्यांतून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मनोज जरांगे 28 ऑगस्ट रोजी शिवनेरी गडावर पोहोचले होते. तेथून चाकण तळेगाव मार्गे ते मुंबईकडे रवाना झाले. (Latest Pimpri News)
या मुंबई दौर्याच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवडमधील मराठाबांधवांची नुकतीच आकुर्डी येथील खंडोबा मंदिर हॉल येथे नियोजन बैठक पार पडली. या बैठकीला शहरातील विविध भागांतून वेगवेगळ्या पक्ष, संघटनांचे पदाधिकारी तसेच मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या बैठकीत मुंबई दौर्याच्या निमित्ताने अनेक नियोजनावर चर्चा झाली. तसेच, उपस्थितांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
विविध ठिकाणी जनजागृती
मुंबई दौर्याच्या अनुषंगाने शहरातील विविध भागात होर्डिंग्ज तसेच पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. या वेळी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पत्रकारद्वारे जनजागृती करण्याची विनंती केली. आपल्या मंडळांपुढे मुंबई दौर्याचे फ्लेक्स लावण्याबाबत माहिती देण्यात आली होती.