

पिंपरी: गणेशोत्सवात पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने पुण्यातील गणेश मंडळाचे आकर्षक देखावे पाहण्यासाठी जातात. त्याकरिता मेट्रोच्या वेळेत वाढ करण्यात येणार आहे. येत्या शनिवारी (दि.30) ते शुक्रवारी (दि.5) या सात दिवसात मेट्रो रात्री दोनपर्यंत धावणार आहे. तर, विसर्जनाच्या दिवशी शनिवारी (दि.6) मेट्रो रात्रभर सुरू राहणार आहे.
पिंपरी-चिंचवड व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने पुण्यात गणेश दर्शनासाठी तसेच, मंडळाचे देखावे पाहण्यासाठी जातात. मेट्रोने आता थेट स्वारगेटपर्यंत जाता येते. त्यात पुणे शहरातील जिल्हा न्यायालय, कसबा पेठ, मंडई व स्वारगेट असे पुणे शहरातील मध्यवर्ती भागांतील मेट्रो स्टेशन आहेत. (Latest Pimpri News)
या स्टेशनच्या सभोवताली शहरातील प्रमुख गणपती मंडळे आहेत. त्यामुळे नागरिकांनी गणेशोत्सवाच्या काळात मध्यवस्तीतील वाहतूक कोंडी टाळून थेट मंडई, कसबा पेठ व स्वारगेट या भागात पोहचता येणार आहे.
गणेशोत्सवात मेट्रो शुक्रवार (दि.29) पर्यंत सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत नियमित वेळेनुसार धावणार आहे. त्यानंतर शनिवार (दि.30) ते पुढील शुक्रवार (दि.5) पर्यंत मेट्रो सकाळी 6 ते रात्री 2 या वेळेत सुरू राहणार आहे. अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जनाच्या दिवशी शनिवारी (दि. 6) मेट्रो रात्रभर धावणार आहे. पुढील रविवार (दि.8) पासून मेट्रो सकाळी 6 ते रात्री 11 यावेळेत नियमितपणे सुरू राहील.
नवी वेळ :
27 ते 29 ऑगस्ट : सकाळी 6 ते रात्री 11,
30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर : सकाळी 6 ते रात्री 2,
6 ते 7 सप्टेंबर : सकाळी 6 ते दुसर्या दिवशी रात्री 11