

मिलिंद कांबळे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे; मात्र ही निवडणूक विधानसभा निवडणुकीप्रमाणे महायुती आणि महाविकास आघाडी अशी होणार की, स्वतंत्रपणे लढली जाणार? याची उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रत्येक प्रभागांत माजी नगरसेवक तसेच, इच्छुकांची मोठी संख्या असल्याने महायुती होणार नसल्याचे सध्याचे चित्र आहे. तसे झाल्यास महाविकास आघाडीही होण्याची शक्यता धूसर आहे.
प्रभागरचना तयार झाल्यानंतर दीड ते दोन महिन्यांत महापालिका निवडणुका होतील. मात्र, ती निवडणूक युती की आघाडीत लढली जाणार, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. महापालिकेत भाजपाचे सर्वाधिक 77 नगरसेवक होते. तर, एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे 36 नगरसेवक होते. एकत्रित शिवसेनेचे 9 नगरसेवक होते. राष्ट्रवादी व शिवसेनेचे विभाजन होऊन नगरसेवक विभागले गेले आहेत. तर, भाजपला अनेक नगरसेवकांनी सोडचिठ्ठी दिली आहे. तसेच, काही माजी नगरसेवकांनी इतर पक्षांत प्रवेश केला आहे.
मात्र, राज्यातील भाजपासह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीची सत्ता लक्षात घेता इच्छुकांचा भाजपाकडे जास्त ओढा असल्याचा दावा करण्यात येत आहे. भाजपाकडे सर्वाधिक माजी नगरसेवक तसेच, इच्छुक असल्याची सद्यस्थिती आहे. स्थानिक पदाधिकार्यांनी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. त्याबाबत वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वबळाचा नारा जाहीरपणे अनेकदा दिला आहे. त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही हिरवा कंदिल दिला आहे. या सर्व बाबींचा विचार करता फेब—ुवारी 2017 प्रमाणे यंदाही भाजपा स्वबळावर लढेल असे चित्र आहे.
महापालिकेतील दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेसकडेही माजी नगरसेवक तसेच, इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे सांगितले जात आहे. पक्ष संघटन वाढीसाठी तसेच, इच्छुकांचे समाधान करण्यासाठी स्वबळावर लढण्याची तयारी राष्ट्रवादीनेही केली आहे. पक्षाने अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझे नाव घेऊन मतदारांपर्यंत जा, असा सरळ संदेश जाहीरपणे दिला आहे. त्यामुळे शहरात राष्ट्रवादीचे पाळेमुळे पुन्हा मजबूत होण्यास मदत होणार आहे, असा विश्वास स्थानिक पदाधिकार्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
शहरात शिवसेनेचे (शिंदे गट) फारसे समाधानकारक चित्र नाही. महायुती झाल्यास पक्षाला अधिक फायदा होईल, अशी गणिते स्थानिक पदाधिकार्यांकडून मांडली जात आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्ष भाजपाकडून मिळतील त्या जागांवर समाधान मानून निवडणुकीस सामोरे जाईल, असे मागील अनुभवावरून सांगितले जात आहे.
दुसरीकडे, विधानसभा निवडणूक निकालानंतर कोमात गेलेल्या महाविकास आघाडीच्या गोठात सध्या शांतता पाहावयास मिळत आहे. महायुती झाली तर, महाविकास आघाडी होईल अन्यथा नाही, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि आप या पक्षाची शहरात मर्यादित ताकद आहे. त्यांच्यासमोर आघाडीशिवाय पर्याय नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आघाडीद्वारे निवडणूक लढण्याचा संदेश दिला आहे. त्यानुसार, निवडणूक लढली जाणार का, याची उत्सुकता आहे. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्रपणे लढेल, असे दिसत आहे.
महापालिका निवडणुकीसाठी दुसर्या पक्षात उडी घेण्यासाठी अनेक इच्छुक तयारी करून बसले आहेत. मात्र, युती व आघाडी न झाल्यास पक्षातील इच्छुकांना अधिक प्राधान्य दिले जाणार असल्याने त्यांची गोची होणार आहे. तसेच, त्यांना कोणत्या पक्षात प्रवेश करून तिकीट घ्यायचे, याबाबत संभ—माचा सामना करावा लागणार आहे. परिणामी, कुंपणावरील माजी नगरसेवक तसेच, इच्छुकांची मोठी गोची होणार आहे.
युती तसेच, आघाडी न झाल्यास प्रत्येक प्रभागांत उमेदवारीची संख्या भरमसाठ वाढणार आहे. त्यामुळे मतदारांना शहरात रंगतदार लढती पाहावयास मिळतील. मत विभाजन होऊन मातब्बर उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.