पुणे/बिबवेवाडी: मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम चौकात बुधवारी (दि. 11) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास एका मालवाहू ट्रकने दुचाकीवरील दोघांना उडविले. ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. दुचाकी चालविणारी व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेने पुन्हा एकदा शहरातील अवजड वाहनांमुळे होणार्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी ट्रकचालक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल करून चालकाला अटक केली आहे.
दीपाली युवराज सोनी (वय 29) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. तर, जगदीश पन्नालाल सोनी (वय 61) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ट्रकचालक शौकतअली पापलाल कुलकुंडी (वय 51) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार जगदीश आणि सहप्रवासी दीपाली हे बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास गंगाधाम चौकातील सिग्नलला थांबले होते. मुलांचे शाळेचे काम संपवून ते घराकडे निघाले होते. दुचाकीच्या मागे ट्रक उभा होता. सिग्नल सुटल्यानंतर दुचाकीस्वार जगदीश पुढे निघाले. त्यावेळी पाठीमागून ट्रकने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे ट्रकच्या चाकाखाली दुचाकी अडकली. चाकाखाली सापडून दीपाली यांचा जागीच मृत्यू झाला. तर, सासरे जगदीश यांच्या पायावरून चाक गेल्याने ते जखमी झाले आहेत. सोनी कुटुंब गंगाधाम चौक परिसरात वास्तव्याला असून मयत दिपाली या जगदीश यांच्या सून होत्या.
दरम्यान, शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घातली आहे. वाहतूक पोलिसांनी आदेशाचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र, तरीही ट्रकचालक, डंपरचालक, टँकरचालक पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून आले आहे. आदेशाचा भंग करणार्या अवजड वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे, असे परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, शहर परिसरात गेल्या पंधरा ते वीस दिवसांत झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत अकरा जण मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान, गतवर्षी 11 जून2024, रोजी सकाळी याच परिसरात दुचाकीस्वार महिलेचा अवजड वाहनाच्या धडकेने जागेवर मृत्यू झाला होता.
गंगाधाम ते बिबवेवाडीतील आई माता मंदिरदरम्यान तीव्र उतार आहे. गंगाधाम चौक गजबजलेला आहे. मार्केट यार्डात येणारी वाहने या मार्गाचा वापर करतात. यापूर्वी गंगाधाम चौकात गंभीर स्वरुपाचे अपघात झाले होते. त्यामुळे येथील उतार कमी करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. मात्र, अद्याप त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांना डंपर आणि ट्रक भेट देत निषेध केला.
गंगाधाम चौकात मागील वर्षभरात तीन अपघाती मृत्यू झाले आहेत. अवजड वाहनांमुळे अपघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. या वाहनधारकांकडून नियमभंग केला जातो. या सर्व पार्श्वभूमीवर आता गंगाधाम चौकात एआय अर्थात आर्टिफिशीअल इंटेलिजन्स कॅमेरा बसवून चौकातील परिस्थिीतीचे मॉनिटरींग केले जाणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. तसेच उद्या (दि.12) पोलीस आयुक्त संबंधित ठिकाणी भेट देऊन उपायोजनांबाबत सूचना करणाार आहे.