

पुणे : ‘एक जिल्हा एक दस्तनोंदणी’ करताना अनेक गैरप्रकार होत असल्याचे दिसून आले आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाच्या महसूल विभागाने दस्तनोंदणी करताना दुय्यम निबंधकांनी काळजी घ्यावी तसेच कोणताही दस्त करताना कागदपत्रांची अतिशय काटेकोरपणे तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करावी, असेही सूचित करण्यात आले आहे. (Pune News Update)
राज्य शासनाने 100 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये ‘एक राज्य एक नोंदणी’ हा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार 1 मेपासून जिल्हास्तरावर ’एक जिल्हा एक नोंदणी’ या कार्यक्रमाची अंमलबजाणी करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अशाप्रकारे दस्त करताना अनेक गैरप्रकार समोर आल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये दस्तनोंदणी करतेवेळे बनावट व्यक्तीस उभे करून दस्तनोंदणी करून घेणे, मृत व्यक्ती जिवंत असल्याचे दाखवून दस्तनोंदणी करणे, शेतकर्यांच्या विशेषत: डोंगरी भागातील मोठ्या प्रकल्पांलगत असलेल्या जमिनी शेतकर्यांची फसवणूक करून खरेदी व विक्री करणे, एकाच कुटुंबातील मालमत्तेचे हिस्से निश्चित झालेले नसताना एका भावाने कुटुंबातील हिस्से विकणे, सामाईक मालकीच्या इमारतीत एकाच हिस्सेदाराने लीज डीड करणे, रेरा नोंदणीकृत नसणारे बेकायदा बांधकामातील सदनिका व प्लॉट विक्री करणे, 7/12 व इतर अधिकारात सरकारचे नाव असताना दस्तनोंदणी करणे, देवस्थानच्या जमिनी पुजारी/गुरव यांच्या नावावर असल्याने त्याचे बेकायदा दस्त करणे, याशिवाय इतर अनेक गैरप्रकार होत आहेत.
हे गैरप्रकार रोखण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हधिकारी यांनी विविध दस्तनोंदणी कार्यालयात कार्यरत असलेल्या दुय्यम निबंधकांना दस्त करताना कमी मुद्रांक शुल्क आकारणी होणार नाही व शासनाचा महसूल बुडणार नाही, याची काळजी घ्यावी, सह जिल्हा निबंधक वर्ग-1 यांनी दुय्यम निबंधक कार्यालयांची तपासणी करून 15 दिवसांत शासनाला अहवाल सादर करावा, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.