लोणावळा : लोणावळा-पवनानगर-पौड राज्यमार्गावरील डोंगरपठारावर पर्यटकांचे आकर्षण असलेली दुधिवरे खिंड ही अत्यंत धोकादायक झाली आहे. खिंडीत कोणत्याही क्षणी मोठी दरड कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील काही वर्षांपासून सातत्याने कोसळणार्या दरडींमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन खिंडीतून प्रवास करावा लागत आहे. तर, खिंडीच्या दोन्ही बाजूंकडील तीव्र उतार व नागमोडी वळणाचा रस्ता हा साईडपट्ट्याअभावी वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनला आहे. यामुळे या रस्त्याने प्रवास करताना स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
या रस्त्याने प्रवास करताना नजर हटल्यास व नियंत्रण सुटल्यास मोठा अपघात अटळ आहे. खिंडीतील धोकादायक दरडी युद्धपातळीवर हटवून खिंडीच्या रुंदीकरणासह रस्त्यालगतच्या साईडपट्ट्यांचे मजबुतीकरण तसेच अत्यावश्यक ठिकाणी लोखंडी सुरक्षा दुभाजक लावण्याची मागणी अनेक वर्षांपासून नागरिक करत आहे. मात्र, अद्याप संबंधित प्रशासनाने या गंभीर समस्येला गांभीर्याने घेतलेले नाही. तसेच खिंडीत अद्याप कोणतेही सूचना फलक लावले नसल्याने पर्यटक येथे जीवाची पर्वा न करता बिनधास्त छायाचित्र व सेल्फी काढतात.
लोणावळ्यापासून आठ किलोमीटर अंतरावर लोहगड, विसापूर किल्ला व पवनाधरणाकडे जाताना लोणावळा- पवनानगर-पौड या राज्य मार्गावर दुधिवरे गावच्या हद्दीत दुधिवरे खिंड आहे. ही खिंड डोंगर पठारातून गेलेली असून, अतिशय अरुंद व सुमारे दोनशे फुटांपेक्षा उंच आहे. खिंडीच्यावर मोठ मोठी झाडे व वृक्ष आहेत. लोणावळा आणि पवनाधरण परिसराच्या मध्यभागी उंच डोंगर पठारावर ही खिंड असल्याने या परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असते.
यामुळे मागील काही वर्षांपासून ही खिंड अत्यंत धोकादायक बनली आहे. या खिंडीत तिन्ही ऋतूत विशेषतः पावसाळ्यात सैल झालेले दगड गोटे व ढिसूळ मुरूम-माती, लहान मोठी झाडे झुडपे यांच्यासह लहान मोठ्या दरडी सातत्याने कोसळतात. यामुळे या खिंडीतून गेलेला मार्ग बंद होतो. कोणत्याही क्षणी दरड कोसळेल याची भीती स्थानिकांना असते. या भितीच्या गर्तेतच नागरिक जीव मुठीत घेऊन व राम नामाचा जप करत खिंडीतून प्रवास करतात.
या खिंडीचा परिसर हा वनविभागाच्या अखत्यारीत असून, लोणावळा-पवनानगर-पौड रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्याने देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. असे असतानाही या मार्गाच्या देखभाल व दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे या ामार्गावरील धोकादायक व खचलेल्या साईडपट्ट्या, आवश्यक त्या ठिकाणी लोखंडी सुरक्षा दुभाजक बसविण्यात आले नाही. खिंडीच्या दोन्ही बाजूकडील रस्ता हा अरुंद असून, डोंगर दर्यातून गेलेला आहे. त्यातच पावसामुळे खचलेल्या साईडपट्ट्या, डोंगर पठारावरून ढासळलेला राडारोडा, डोंगर पठार व दर्यातून वाहणार्या धबधब्यांचे पाणी जाण्यासाठी पाण्याच्या पाटांचा अभाव आहे. यामुळे धबधब्यांच्या पाण्याचा प्रवाह अनेकदा रस्त्यावरून वाहत असताना वाहतुकीस धोका निर्माण होतो. अरुंद असलेल्या मार्गालगतच्या गतवर्षीच्या पावसाळ्यात खचलेल्या व वाहून गेलेल्या साईडपट्ट्यामुळे या परिसरातून प्रवास करणे व वाहने चालविणे अत्यंत धोकादायक आहे.
या मार्गावर काही ठिकाणी साईडपट्ट्याच नसल्याने या ठिकाणी जर नजर हटल्यास व नियंत्रण सुटल्यास संबंधित वाहने थेट मार्गालगतच्या दरीत 25 ते 30 फूट खोल जाऊन अपघात घडू शकतो. असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप कोणतीही उपाययोजना केली नाही. एखाद्या घटनेत नागरिक व पर्यटकांचे जीव गेल्यावर संबंधित प्रशासनाला जाग येणार का? आता तरी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभागाने नागरिक व प्रवाशांच्या सुरक्षेचा गांभीर्याने विचार करून आपल्या विभागांतर्गत तांत्रिक मुद्दे बाजूला करून खिंड व रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
लोणावळा-खंडाळ्यानंतर पर्यटकांच्या सर्वात पसंतीचे आवडते पर्यटन केंद्र म्हणजे पवनाधरण परिसर होय. पवनाधरण परिसराला लाभलेल्या विपुल निसर्ग संपदेसह शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि कल्पकतेची किनार लाभली आहे. शिवरायांनी उभारलेले लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोणा हे गडकिल्ले, प्राचीन बौद्धकालीन लेण्या, विस्तीर्ण पवना व मळवंडीठुले ही जलाशये, पावसाळ्यात हिरवाईने नटलेले पवनेचे खोरे आणि येथील उंच डोंगर द-यातून कोसळणारे धबधबे हे पर्यटकांना मोहिनी घालत आहे. दुधिवरे येथील प्रतिपंढरपूर, पवना जलाशयातील बोटिंग क्लब यामुळे मागील काही वर्षांपासून पर्यटकांमध्ये या परिसराचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढली आहे. तसेच ही खिंड सध्या पर्यटकांचे सेल्फी व प्री वेडिंग (लग्नापूर्वीचे) फोटो काढण्याचे आकर्षणाचे ठिकाण बनले आहे. अनेक पर्यटक खिंडीत अत्यंत धोकादायक ठिकाणी सेल्फी व फोटो सेक्शन करतात. सध्या खिंड अत्यंत धोकादायक बनल्याने कोणत्याही क्षणी खिंडीत दरड कोसळे याचा भरवासा नाही. यामुळे पर्यटकांनी खिंडीत थांबवून सेल्फी व फोटो न काढता आपला प्रवास आणि पर्यटन सुरक्षित करावे.