

वर्षा कांबळे
पिंपरी : दहावीनंतर एच.एस.सी. व्होकेशनल अथवा एमसीव्हीसी हा व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहेत. हे अभ्यासक्रम उद्योग क्षेत्राच्या व्यावसायिक गरजा लक्षात घेऊन बनविण्यात आले आहेत. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा वाढता कल आहे; मात्र गेली दहा वर्षे हा अभ्यासक्रमासाठी शिक्षकांची भरती केलेली नाही. त्यामुळे कार्यरत शिक्षक अतिरिक्त होत आहेत. तरीही शासनाकडून रिक्त पदांवर भरती केली जात नसून, शासनाकडून हा अभ्यासक्रम बंद करण्याचा घाट घातला जात आहे. (Pimpari Chinchwad News)
देशातील बेरोजगारी दूर व्हावी, या उद्देशाने डॉ. कोठारी आयोगाच्या शिफारशींनुसार 11 वी व 12वीच्या धर्तीवर व्यवसाय अभ्यासक्रमांची अथवा व्होकेशनल अभ्यासक्रमांची सुरुवात सन 1989-90 मध्ये झाली. त्यावर्षी 30 अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली होती.
या अभ्यासक्रमांची 12 वी ची परीक्षा उच्च माध्यमिक मंडळातर्फे, मुंबई बोर्ड घेण्यात येते. इतर शाखांप्रमाणेच या परीक्षेची गुणपत्रिका व बोर्ड प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना दिले जाते. 12 वीनंतर विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षाला तसेच कला शाखेच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेता येतो.
टेक्निकल ग्रुपचा विद्यार्थी उत्तीर्ण झालेल्या विषयाच्या डिप्लोमाच्या द्वितीय वर्षात प्रवेश घेऊ शकतो. उदा. इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश घेऊ शकतो.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च 2025 मध्ये घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाइन घोषित झाला. इयत्ता 11 वी वर्गाचे विज्ञान, वाणिज्य व कला शाखेची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया बुधवार दिनांक 21 मेपासून सुरू झालेली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एकूण चार शाखा असून त्यामध्ये विज्ञान, वाणिज्य, कला आणि एच. एस. व्ही. सी. (उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम)/ एम. सी. व्ही. सी. (किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम) या शाखांचा समावेश आहे.
अभ्यासक्रम प्रात्यक्षिकाभिमुख असल्याने थिअरीसाठी वेगळे आणि प्रात्यक्षिकासाठी वेगळे शिक्षक नेमलेले असतात. या शाखेत मराठी, इंग्रजी, पायाभूत अभ्यासक्रम 100 गुणांचे तर संबंधित अभ्यासक्रमाचे तीन विषयांची थिअरी आणि त्यांचे प्रात्यक्षिके 80+80+40 अशा एकूण 200 गुणांचे विषय असतात. 40 गुण हे वर्षभर केलेली प्रात्यक्षिके आणि वही, आस्थापना भेटी, 40 दिवसांचे ऑन द जॉब ट्रेनिंग आणि प्रोजेक्टसाठी असतात. एच.एस.सी.बोर्ड परीक्षा एकूण सहाशे गुणांची असते. हे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना अनेक आस्थापना व कंपनीत टेक्निशियन म्हणून नोकरीही मिळते. मात्र, शिक्षकांची कमतरता असल्याने एकाच शिक्षकाला प्रात्यक्षिकही घ्यावे लागते आणि थिअरी देखील महत्त्वाची ठरते.
इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, ऑटामोबाईल टेक्नॉलॉजी, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, लॉजिस्टिक अॅण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट, मार्केटिंग अकौंटिग, फायनन्शियल ऑफिस मॅनेजमेंट, बँकींग, फायनन्शियल सर्व्हिसेस, इन्शुरन्स, हॉर्टीकल्चर, क्रॉप सायन्स,डेअरी टेक्नॉलॉजी, फिशरी टेक्नॉलॉजी, ऑप्थॉल्मीक टेक्निशियन, रेडिओलॉजी टेक्निशियन, मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन, चाईल्ड,ओल्डऐज अॅण्ड हेल्थकेअर सर्व्हिस, फुड प्रॉडक्शन, टुरिझम अॅण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट इत्यादी.
एमसीव्हीसी अर्थात एच.एस.व्ही.सी. शाखेचे अभ्यासक्रम कृषी, तांत्रिक, वाणिज्य, डेअरी, मत्स्य व पॅरामेडिकल अशा सहा गटांचे एकूण 30 अभ्यासक्रम विविध महाविद्यालयात अनुदानित व विनाअनुदानित पद्धतीने सुरू आहेत. अभ्यासक्रमनिहाय 30 ते 40 विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रवेश दिला जातो. हे अभ्यासक्रम व्यवसायाभिमुख असून यामध्ये जास्तीत जास्त भर हा प्रात्यक्षिकांवर दिलेला आहे. विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावी व बारावी वर्गातील प्रात्यक्षिक कौशल्य आत्मसात करून स्वयंरोजगार करावा म्हणून या शाखेची निर्मिती करण्यात आलेली आहे. आजपर्यंत अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतःचे छोटे-मोठे व्यवसाय सुरू केलेले आहेत.